News Flash

“समाजाच्या सेवेसाठी तुमचं शौर्य अतुलनीय”, राजेश टोपेंचं डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना भावनिक पत्र

करोनाने राज्यात थैमान घातलं असताना सर्व डॉक्टर आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी जीवाची बाजी लावून सध्या रुग्णालयांमध्ये दिवसरात्र मेहनत करत आहेत

करोनाने राज्यात थैमान घातलं असताना सर्व डॉक्टर आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी जीवाची बाजी लावून सध्या रुग्णालयांमध्ये दिवसरात्र मेहनत करत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डॉक्टर तसंच आरोग्य क्षेत्रालील सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानणारं एक भावनिक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी एखाद्या लढाईत आघाडीवरचा सैनिक झोकून देऊन नेटाने बाजी लढवत असतो तसे तुम्ही आतापर्यंत धीराने कोरोना विरुद्ध लढता आहात अशा शब्दांत त्यांचं कौतुक केलं आहे. तसंच आपणही आपल्या प्रकृतीची काळजी घ्या अशी विनंतीही केली आहे.

काय लिहिलं आहे पत्रात ?

प्रति.
डॉक्टर्स, आरोग्य क्षेत्रातील सहकारी,
माझ्या प्रिय भगिनी आणि बंधूंनो,
करोनाचे जगभरात थैमान सुरू असताना मार्चच्या पहिल्या आठवड्यात या विषाणूचा आपल्या राज्यात शिरकाव झाला आणि तेव्हापासून आपण मंडळी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करताय. तुमच्या या कार्याला सलाम. तुमच्या तत्पर सेवेमुळे आणि अविरत मेहनतीमुळे आतापर्यंत राज्यातील ३९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन व आभार!

करोनाचा शिरकाव सुरू झाल्यापासून आपण सर्वप्रथम त्याला सामोरे गेला आहात. सर्वात आधी तुम्ही मंडळींनी या युद्धाला सामोरे जाण्यासाठी नेतृत्व केलं. त्याचप्रमाणे एखाद्या लढाईत आघाडीवरचा सैनिक झोकून देऊन नेटाने बाजी लढवत असतो तसे तुम्ही आतापर्यंत धीराने कोरोना विरुद्ध लढता आहात. समाजाच्या सेवेसाठी हे अतुलनीय शौर्य तुम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून न थकता दाखवत आहात. हे अभिनंदनीय आहे.

तुम्ही दाखवत असलेल्या धीरामुळे रुग्णांना तर मानसिक बळ मिळतेच परंतु आम्हालाही त्यामुळे काम करण्याचं पाठबळ व प्रोत्साहन मिळत आहे. समस्त देशवासिय आपापल्या घरात कुटुंबियांसमवेत असताना आपण मात्र कर्तव्य भावनेतून कुटुंबापासून, आप्तस्वकीयांपासून दूर जात, सेवाभाव जपत आहात. खरं तर आपलं कौतुक करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडत आहेत.

पुन्हा मी आपणा सर्वांना त्रिवार मानाचा मुजरा करतो, कोरोनाला हरविण्यासाठी आपली लढाई अशीच सुरू ठेवू या. ‘मीच माझा रक्षक’ हा संदेश आपण सर्वसामान्यांना दिला आहे. आपणही आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्ला देतानाच आपल्या काही सूचना असतील तर माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा.

पुनश्च एकदा आपले अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 6:29 pm

Web Title: coronavirus health minister rajesh tope letter to doctors and health workers sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : अलिबागमध्ये सुरू आहे व्हिडिओद्वारे दूरस्थ योगवर्ग
2 लॉकडाउन : परिस्थितीचा फायदा घेणारी लोकं म्हणजे मयताच्या टाळूवरचं लोणी खाणारे; अजित पवारांचा संताप
3 करोनाग्रस्तांची वाढणारी संख्या ही धोक्याची घंटा- अजित पवार
Just Now!
X