राज्यावर सध्या करोनाचं संकट असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे मातृनिधनाचं दुःख बाजूला सारून पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. दुःख कितीही मोठं असलं तरी केवळ तीन दिवसांचाच दुखवटा पाळण्याचा निर्णय टोपे कुटुंबाने घेतला. “मी माझ्या कार्यात रुजू होणं हीच मातोश्रींना खरी श्रद्धांजली ठरेल,” अशी भावना राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश टोपे यांचे लोकांसोबत संवाद साधतानाचे फोटो ट्विट केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “बुधवारी शरद पवार यांनी राज्याच्या एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत चव्हाण सेंटरमध्ये पक्षाच्या सर्व मंत्र्यांची बैठक ठेवली होती. राजेश टोपे या बैठकीला अनुपस्थित असणार असं सर्वांनी गृहित धरलं होतं. पण राजेश टोपे आवर्जून बैठकीला उपस्थित राहिले”.

“मराठवाड्यात सर्वसामान्य घरात मर्तिकानंतर साधारणतः १४ दिवसांचा कठोर दुखवटा पाळण्याची पद्धत आहे. पण आपल्या मतदारसंघातील लोकभावना बाजूला सारून कर्तव्यपूर्ततेसाठी राजेश टोपे यांनी अवघ्या तीन दिवसांचा दुखवटा पाळून पुन्हा कार्यरत होणं हा मराठवाड्यातील जनतेसाठी एक नवा पायंडा आहे,” असंही राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे.

“या नव्या पायंड्यातून राजेश टोपे यांनी अनेक गोष्टी अधोरेखित केल्या. पुरोगामित्वाचे पुढचे पाऊल तर पडलेच, पण प्रसंगी वैयक्तिक भावनांना अव्हेरून मनावर दगड ठेवून लोकसेवेसाठी कसे समर्पित व्हावे हे सिद्ध केलं. जनतेप्रती असलेली निष्ठा व कर्तव्यदक्षता त्यांनी पुन्हा सिद्ध केली,” असंही राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे.

राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचं प्रदीर्घ आजारानं १ ऑगस्टला निधन झालं. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्या ७४ वर्षांच्या होत्या. जवळपास गेल्या दीड महिन्यापासून पासून त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पण अखेर उपचारादरम्यानच शारदाताईंनी अखेरचा श्वास घेतला.