सणासुदीच्या दिवसांत फुलांच्या मागणीत घट; शेतकरी, विक्रेते चिंतेत

विरार : वसई- विरारमध्ये पश्चिम पट्टय़ात मोठय़ा प्रमाणात फूल शेती केली जाते. या शेतीवर उदरनिर्वाह करणारे शेकडो शेतकरी या परिसरात आहेत. पण सध्या करोना महामारीमुळे त्यांना मोठय़ा आर्थिक झळा सोसाव्या लागत आहेत. श्रावण महिन्यापासून दर वर्षी फुलबाजारात मोठी तेजी पाहायला मिळते. पण यावर्षी करोनाने या बाजाराला मंदीची झालर लावल्याने शेतकरी आणि विक्रेता वर्ग चिंतेत सापडला आहे.

करोना महामारीमुळे वाहतुकीची साधने मर्यादित असल्याने घाऊक बाजारात फुलांची उपलब्धता कमी होऊन फुलांचे दर वधारत आहेत, तर दुसरीकडे ग्राहक नसल्याने बाजार थंडावले आहेत. फुल विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रावण महिन्यापासून विविध सणांना सुरुवात होते. श्रावण महिन्यात पूजा, विधी करण्यासाठी तसेच  व्रतवैकल्यातही मोठय़ा प्रमाणात फुलांचा समावेश होतो. यामुळे या  महिन्यात फुलांना मोठी मागणी असते. पण या वर्षी सार्वजनिक तसेच घरगुती उत्सवावर करोनाचे विरजण पडल्याने ग्राहकांनी बाजारपेठांकडे पाठ फिरवली आहे. त्याचबरोबर विशेष पद्धतीचे हार बनविणारे कुशल कारागीर हे टाळेबंदीत गावी गेल्याने उपलब्ध कारागिरांनी आपले दर वाढीवले आहेत. यामुळे नाईलाजाने हाराच्या किमती वाढल्या आहेत.

करोनाचा फटका शेतकऱ्यांनासुद्धा बसल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांकडून फुले खूप कमी प्रमाणात मिळतात यामुळे विक्रेत्यांना फुले उपलब्ध होत नाहीत. विरारमधील फुल विक्रेता मुन्ना देसाई यांनी माहिती दिली की, दरवर्षी पेक्षा यावर्षी मागणी खूपच घटली आहे. सार्वजनिक आणि घरगुती गणेश उत्सव आणि नुकताच दहीहंडी सन साध्या पद्धतीने होत असल्याने अजून कोणत्याही मंडळाच्या आगावू नोंदी झाल्या नाहीत. दरवर्षी या काळात आम्हाला थोडीशीही उसंत नसते. पण यावर्षी आम्हीच ग्राहकांकडे जाऊन मागणी करत आहोत. अनेक फुल विक्रेते पारंपरिक कौटुंबिक पद्धतीने हा व्यवसाय करत आहेत. पण आता सर्वावर उपासमारीची वेळ आली आहे.   स्थानिक तसेच परदेशी फुलांची आवक घटल्याने घाऊक बाजारातील फुले महागली आहेत. यासाठी हारांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. बाजारात असलेल्या फुलांच्या तुटवडय़ामुळे सर्व प्रकारच्या फुलांच्या किमतीत मागील वर्षीपेक्षा दुपटीने वाढ झाली आहे.

फुलांचे घाऊक बाजारातले

दर किलोप्रमाणे

* झेंडू – १०० ते २०० रुपये

* शेवंती पांढरी – ६० ते ८०

* मोगरा –  ४०० ते ५००

* काकडा  – १०० ते १२०

* शेवंती पिवळी – ११० ते १२५

* अस्टर – १५ ते २५