जगभरात थैमान घालणाऱ्या ‘करोना’नं महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. पुण्यात एकाच दिवशी पाच करोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या डॉक्टरांचे विशेष पथक लक्ष ठेवून असून, महाराष्ट्रासमोर उभ्या राहिलेल्या नव्या संकटाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (बुधवारी) बैठक बोलवण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्रात करोना आला कसा… तर एका ट्रिपमुळे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडंच दक्षता घेतली जात आहे. भारतातही केंद्र सरकारन खबरदारीचे उपाय हाती घेतले आहेत. लोकांमध्ये याविषयी जनजागृती केली जात आहे. विमानतळावरही तपासणी केली जात आहेत. अशी सगळी खबरदारी घेतली जात असतानाही महाराष्ट्रात करोनाचे विषाणू दाखल झाले.

४० लोकांचा एक ग्रुप दुबईमध्ये फिरण्यासाठी गेला होता. ते १ मार्च रोजी भारतात परतले. दुबई करोना बाधित शहरांच्या यादीत नाही. त्यामुळे मायदेशी परतल्यानंतर त्यांचं विलगीकरण करण्यात आलं नाही. करोना संदृश्य लक्षण दिसू आल्यानं त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीत अहवालात त्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आणि पुण्यात खळबळ उडाली. त्यांच्यावर पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर राज्याच्या आरोग्य विभागानं बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरू केला.

या दाम्पत्याचं कुटुंबीय, मित्र परिवार तसेच त्यांचे कार्यालयीन ठिकाणी असलेल्या सर्वांची तपासणी करण्याचं काम सुरू झालं. त्यांच्या कुटुंबातील तिघांचे नमुने घेण्यात आले. त्यात त्यांच्या मुलीला करोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. हे दाम्पत्य ज्या ओला टॅक्सीने मुंबईवरून पुण्याला आले. त्या टॅक्सीवाल्याची माहिती घेण्यात आली. त्या व्यक्तीला सोमवारी रात्री दवाखान्यामध्ये दाखल करून घेण्यात आले आहे. त्यालाही करोनाची लागण झाल्याचं अहवालातून स्पष्ट झालं आहे. या विमानात दाम्पत्यासोबत असलेल्या एका सहप्रवाशालाही करोनाची लागण झाली असून, पाचही जणांवर पुण्यात उपचार सुरू आहे. करोनानं महाराष्ट्रात पाऊल ठेवलं असून, बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.