घरापासून दूर सातासमुद्रापलीकडे करोनाच्या जीवघेण्या संकटामुळे लॉकडाउन व मग घरातच बसून कामाचे आदेश. असा एकाकीपणाचा तिहेरी विळखा अनुभवणाऱ्या तीन युवतींनी करोनाच्या संकटातून  देशाला वाचवायचा असेल तर घरातच बसण्याचे भारतीयांना आवाहन केले आहे.

लंडनपासून एक तासाच्या हवाई अंतरावर असणाऱ्या आर्यलॅडमधील डब्लीन येथील तीन भारतीय युवतींची करोनाने केलेली कोंडी अस्वस्थ करणारी आहे. व्यवस्थापन व अभियांत्रिकी शिकून बुध्दीमत्तेच्या जोरावर बहुराष्ट्रीय कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत या युवतींनी स्वत:चा अनुभव सांगत भारतीयांना कळकळीचे आवाहन केले आहे. मधुरा गिरिष काशीकर (वर्धा), रोहिणी यादव (पूणे) व जान्हवी पाराशर (चंदीगड) या सध्या करोनाच्या संकटाच्या कोडींत सापडल्या आहेत. वर्षातून एकदा मायदेशी जाण्याची सुट्टी मिळाली असतांनाच करोनाचे मळभ दाटून आले आणि घरी जाण्याच्या त्यांच्या आनंदावर पाणी फेरले गेले.

आर्यलॅडमध्ये १३ मार्च ते १९ एप्रिल लॉकडाउन आहे. पण तरीही काही दिवस कंपनीत जाणे सुरू होते. आता मात्र कंपनीने वर्क फ्रॉम होम सुरू केल्यानंतर तिघींना सक्तीने घरातच थांबावे लागत आहे. शासनाने ठराविक वेळासाठी इंडियन मॉल सुरू ठेवले आहेत. त्यावेळी या तिघींनी आवश्यक ते साहित्य घरी आणून ठेवले होते. मात्र आता पुढे जुळवाजुळव करणे आलेच,  कारण मॉलची वेळ मर्यादित करण्यात आली आहे,  असे मधुरा सांगते.

आणखी वाचा- बळीराजा संकटातही आला धावून; लॉकडाउनमध्ये अडकलेल्यांना वाटणार दोन एकरातील केळी

आर्यलॅडमध्ये करोनाची ३ हजार २३५ प्रकरणे आढळली. त्यापैकी पाच व्यक्ती ठीक झाल्या आहेत. मृतांचा आकडा ७१वर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर तेथील सरकारने सोशल डिस्टंसिंग आता दोन मीटर अंतराचे केले आहे. तिघींनाही घरूनच काम करावे लागत असले तरी कंपनीने अधिकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी घेतली आहे. घरूनच काम करतांना कुटुंबाची आठवण आल्यास संवाद साधण्यासाठी काम काही वेळासाठी बाजूला ठेवता येते. मानसिक आरोग्याची विचारपूस होते. कामात खंड पडल्यास त्याबाबत वरिष्ठांना सुचित केल्या जाते.

आणखी वाचा- जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील : अजित पवार

आम्ही बाहेर देशातून आलेलो, कुटुंबापासून दूर म्हणून आमची मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाकडून आस्थेने विचारपूस केली जाते. अडचणीबद्दल सातत्याने चौकशी केली जाते. हा खूप मोठा दिलासा असल्याचे रोहिणीला वाटते. अन्नाची घरपोच सेवा बंद झाली आहे. आता आम्ही घरची जेवण तयार करून खातो. आम्हा तिघींनाच एकमेकीची संगत आहे. लोकसंख्या कमी आहे,  लोकं सुचनांचे पालन करतात,  ठराविक काळात सुरू असलेल्या मॉलसमोरील मार्किंग केलेल्या जागेतच ग्राहक थांबतात. विदेशातून शिकण्यास आलेल्या व अर्धवेळ नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोयीचे काम दिल्या जाते. तिघी म्हणतात आता घरी कधी परतणार, याची हुरहुर लागली आहे. भारतीय विमान वाहतूक लवकरात लवकर सुरू व्हावी म्हणून त्या प्रार्थना करतात. विदेशात अडकलेल्या भारतीयांनी घरी परत यावे, म्हणून कुटुंबासोबत असलेल्या भारतीयांनी करोनाचा सामना करतांना सर्व पथ्ये कसोशीने पाळावी, अशी विनंती त्या फेसबुकच्या माध्यमातून करीत असतात.