बीड – टाळेबंदीचा फायदा घेत ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. सामान्य वाहनधारकांना इंधन बंदी केल्यानंतर आता त्यातही काळाबाजार होऊ लागल्याच्या चित्रफित समाज माध्यमात प्रसारित होऊ लागल्या आहेत. रॉकेल मिश्रीत पेट्रोल चक्क दीडशे रुपये लिटर विकले जात असून दुप्पट भाववाढ केल्याने संबंधित विक्रेत्यांवर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.

बीड जिल्ह्यात करोना विषाणूमुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्वच बाजारपेठा बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवा,प्रसार माध्यम आणि प्रशासनास पेट्रोल, डिझेल विक्री करण्याची परवानगी आहे असून सर्वसामान्य वाहनधारकांना इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या बीड आणि गेवराईतील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर कारवाई करून ते बंद करण्यात आले आहेत. मात्र ग्रामीण भागात सर्रास  टपरी,किराणा दुकानावर १५० रुपये लिटरने पेट्रोल आणि डिझेलची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.जिल्ह्यातील माऊली नगर ( ता. माजलगाव ) येथील एक चित्रफित समाज माध्यमात प्रसारित होऊ लागली आहे.

एक तरुण एका पेट्रोल विक्री करणाऱ्यास पेट्रोलमध्ये रॉकेल मिश्रीत केल्यामुळे त्याची गाडी बंद पडली असल्याने जाब विचारत आहे. तसेच पेट्रोल १५० रुपयाने विकत घेतल्याचेही बोलत आहे. त्याच वेळी दुसरा मोटरसायकल स्वारही त्या ठिकाणी पेट्रोल घेत असल्याचे दिसून आले. एका तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद केला असून ती चित्रफित समाज माध्यमातून प्रसारित केल्याने खळबळ उडाली आहे. टाळेबंदीत जिल्हा प्रशासनाने पेट्रोल, डिझेल विक्रीवर बंदी घातल्याचा फायदा घेत बेकायदेशीररित्या चढ्या भावाने इंधन विक्री होत असल्याचे समोर आले आहे. पेट्रोलच्या या काळ्याबाजारामुळे प्रशासनापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या पेट्रोल माफियांवर प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

किरकोळ विक्रेत्यांकडे इंधन कोठून आले ?

बीड जिल्ह्यात टाळेबंदी आहे. जिल्हा प्रशासनाने संचारबंदीत गर्दी होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवा वगळता सामान्य वाहनांना इंधनबंदी केलेली आहे. मात्र ग्रामीण भागातील टपरी, किराणा दुकान अशा किरकोळ विक्रेत्यांकडे पेट्रोल , डिझेल आलेच कोठून ? याची चौकशी होणे आवश्यक आहे. संचारबंदी शिथिलतेच्या वेळेनंतर पाच मिनिटे जास्त झाले तरी परवानगी पत्र असतांनाही पंप चालक इंधन देण्यास नकार देतात मग ग्रामीण भागात चढ्या भावाने विक्री करण्यास त्यांना इंधन कोठून येते असा प्रश्न उपस्थित होत असून त्या भागातील पंपाचीची तपासणी व्हायला हवी अशी मागणी होऊ लागली आहे.