करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न असताना बाधितांची संख्या मात्र वाढत चालली असल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीला संथ असलेल्या करोनाच्या संसर्गानं महिनाअखेरीस उसळी घेतली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दुपटीनं वाढली. दुसरीकडं मृत्यूदरही वाढला असून महाराष्ट्रातील परिस्थिती काळजी करण्यासारखी बनली आहे. देशात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण आणि झालेल्या मृत्यूची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे १४ एप्रिलनंतरही राज्यातील लॉकडाउन कायम राहणार असल्याची शक्यता असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसे संकेत दिले आहेत.

Live Blog

21:44 (IST)07 Apr 2020
रायगडमधील करोनाबाधितांचा आकडा २०वर; दोघांची प्रकृती चिंताजनक

रायगड जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा २०वर पोहोचला आहे. यात पनवेल महानगर पालिका हद्दीतील १६ तर उलवे परिसरातील ४ जणांचा समावेश आहे. यातील दोघांची प्रकृत्ती चिंताजनक आहे. श्रीवर्धन तालुक्यातील पाच जणांना पनवेल उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

21:43 (IST)07 Apr 2020
वसईत करोनाग्रस्तांची संख्या २४वर

वसई जिल्ह्यात करोनाग्रस्तांची संख्या २४वर पोहोचली आहे. यामध्ये वसई शहरात १४, नालासोपाऱ्यात ७ तर विरारमध्ये ४ बाधित रुग्ण आत्तापर्यंत आढळले आहेत. तर तीन करोनाबाधितांचे मृत्यू झाले आहेत.

21:41 (IST)07 Apr 2020
निजामुद्दीनहून महाराष्ट्रात आलेल्या ५० ते ६० लोकांचे फोन बंद, पोलिसांकडून शोध सुरु

दिल्लीतील निजामुद्दीन या ठिकाणी झालेल्या तबलिगी जमतीचा झालेल्या कार्यक्रमात सहभागी झालेले ५० ते ६० जण महाराष्ट्रात परतले आणि त्यांनी त्यांचे मोबाइल बंद केले आहेत. पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा तूर्तास सापडत नाही. मात्र पोलीस राज्यभरातल्या विविध ठिकाणी या सगळ्यांचा शोध घेत आहेत. ५० ते ६० जण हे मोबाइल फोन बंद करुन लपण्याचा प्रयत्न करत आहेत असं महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने म्हटलं आहे.

20:47 (IST)07 Apr 2020
पुण्यात संचारबंदीची होणार कडक अंमलबजावणी; दोनच तास राहणार दुकानं खुली

पुणे शहरातील करोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील चार भागांमध्ये संचारबंदीची कडक अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातला अध्यादेशही निघाला असून आज (दि.७) रात्री ७ वाजल्यापासून १४ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच या काळात रुग्णालयं आणि मेडिकल्स वगळता इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकानं केवळ दोनच तास खुली राहणार आहेत. सविस्तर बातमी वाचा

20:17 (IST)07 Apr 2020
मुंबईतले करोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू

मुंबईकरांची काळजी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. कारण गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईतल्या करोनाग्रस्तांची संख्या ही ४९० वरुन थेट ५९० झाली आहे. तर मागील चोवीस तासांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या चाळीसवर पोहचली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

19:52 (IST)07 Apr 2020
मिरा भाईंदरमध्ये करोनाचा पहिला बळी; आज सापडले नवे पाच रुग्ण

मिरा रोड येथील पूजा नगर परिसरात राहणाऱ्या एका ५० वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर शहरात आज एकाच दिवशी पाच नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मिरा भाईंदर शहरातील रुग्णांची एकूण संख्या आता २२ झाली आहे.

19:48 (IST)07 Apr 2020
देशभरात ५०८ नवे रुग्ण पॉझिटिव्ह, करोनाग्रस्तांची संख्या ४७८९, तर १२४ मृत्यू

देशभरात करोनाचे ५०८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासात समोर आलेली ही संख्या आहे. गेल्या २४ तासांमध्ये १३ मृत्यू झाले आहेत. तर करोनाग्रस्तांची संख्या ही आता ४७८९ वर पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत करोनाची लागण झाल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या १२४ झाली आहे.

19:21 (IST)07 Apr 2020
करोनाची लढाई जिंकण्यासाठी तीन मीटरचे सुरक्षित अंतर ठेवा-राजेश टोपे

करोनाचे संकट टाळण्यासाठी तीन मीटरचे अंतर राखा असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. राजेश टोपे यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या संदर्भातला व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. याच व्हिडीओद्वारे त्यांनी हे आवाहन केलं आहे. मी गर्दीच्या ठिकाणी जाणार नाही, मीच माझा रक्षक, मी घरात थांबणार आणि करोनाला हरवणार हे प्रत्येकाने जपले तर आपण करोना विरोधातली लढाई जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

19:08 (IST)07 Apr 2020
अभिनेता पुरब कोहली व त्याच्या कुटुंबीयांना करोनाची लागण

अभिनेता पुरब कोहली व त्यांच्या कुटुंबीयांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित पुरबने याबद्दलची माहिती दिली. सुरुवातीला ताप व सर्दीची लक्षणे दिसली आणि नंतर डॉक्टरांशी संपर्क केला असता COVID 19 ची लागण झाल्याचे समजले, असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं. वाचा सविस्तर बातमी..

19:06 (IST)07 Apr 2020
शिवभोजन थाळी योजनेचा तालुकास्तरावर विस्तार; पाच रुपयांत मिळणार जेवण

महाविकास आघाडीच्या सरकारकडून जिल्ह्यांच्या ठिकाणी सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी योजनाचा विस्तार आता तालुकास्तरावरही करण्यात येणार आहे. राज्यातील लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे मोठ्या शहरांबरोबरच निमशहरांमध्येही बेघर, गरीब आणि स्थलांतरीत लोकांचे अन्नावाचून हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

17:53 (IST)07 Apr 2020
राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागरही होम क्वारंटाइन

राज्यात लॉकडाउन आणि संचारबंदी असतानाही नियमांचा भंग करुन शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर दोन दिवसांपूर्वी मुंबईहून बीड शहरात परतले होते. मुंबईहून आल्यामुळे त्यांना होम क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, याचा फटका त्यांचे पुतणे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनाही बसला आहे. त्यांनाही होम क्वारंटाइन राहण्याचे प्रशासनाने बजावले आहे. क्षीरसागर काका-पुतणे कुटुंबासह एकाच बंगल्यात राहतात.

17:06 (IST)07 Apr 2020
करोनाशी लढण्यासाठी अरविंद केजरीवाल यांची मोठी योजना, सांगितला 5T प्लान

राजधानी दिल्लीत करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी दिल्ली सरकार काय पावलं उचलत आहे याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकार करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एका विशेष योजनेवर काम करत आहे ज्याला त्यांनी 5T असं नाव दिलं आहे. यामध्य टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, टीमवर्क आणि ट्रॅकिंग अॅण्ड मॉनिटरिंग यांचा समावेश आहेत. (सविस्तर बातमी)

17:05 (IST)07 Apr 2020
करोना व्हायरसच्या संकटात शेअर बाजारातून Good News

संपूर्ण जग करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत असताना शेअर बाजारातून एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकत मंगळवारी २,४७६ अंकांची वाढ झाली असून दिवअखेर निर्देशांक ३० हजार अंकाच्या पुढे बंद झाला. वाचा सविस्तर बातमी.

16:11 (IST)07 Apr 2020
देशात करोनाच्या रुग्णांची संख्या ४४२१ वर

देशात करोनाच्या रुग्णांची संख्या ४४२१ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात ३५४ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात आठ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ११७ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ३२६ जणांवर उपचार करुन त्यांना घऱी पाठवण्यात आलं आहे.

15:49 (IST)07 Apr 2020
कुर्ला झोपडपट्टीतही कोरोनाचे रुग्ण

धारावी झोपडपट्टीमध्ये करोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कारण, कर्ला झोपडपट्टीतही करोनोचे रूग्ण आढळले आहेत. एल वार्डात एकूण १४ करोनाचे रूग्ण असून त्यापैकी आठ रूग्ण झोपडपट्टीतील आहेत.

15:44 (IST)07 Apr 2020
देवेंद्र फडणवीस यांचं उद्धव ठाकरेंना पत्र

करोनामुळे राज्यात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभुमीवर तात्काळ निर्णय घेण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे निदर्शनास आणून दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा असल्याचंही म्हटलं आहे. (सविस्तर पत्र वाचण्यासाठी)

15:27 (IST)07 Apr 2020
पुण्यात आणखी तीन करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

पुणे शहरात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात चिंतेची बाब म्हणजे मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. मंगळवारी तीन नव्या रुग्णांचा ससून रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या तीनही रुग्णांना विविध आजार होते. यामुळे पुण्यात आत्तापर्यंत ८ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

15:13 (IST)07 Apr 2020
Coronavirus: मोदी सरकारने आणखी कठोर पावलं उचलण्याची गरज-सोनिया गांधी

सध्या सगळा देश करोना नावच्या महाभयंकर संकटाशी सामना करतो आहे. ही वेळ कोणत्याही राजकारणाची नाही तर एकमेकांना साथ देण्याची आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही या आशयाचं ट्विट केलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात पाच प्रमुख मुद्द्यांचा उल्लेख आहे. मोदी सरकारने करोनाशी लढण्यासाठी आणखी कठोर निर्णय घ्यायला हवेत असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे 

15:13 (IST)07 Apr 2020
ही राजकारणाची वेळ नाही - खा. सुप्रिया सुळे

ही राजकारणाची वेळ नाही. एकमेकांच्या हाताला धरून महाराष्ट्र व देश या संकटावर मात कसा करेल ती ही वेळ आहे त्यामुळे घरीच रहा. आजची देशसेवा हीच आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. आज त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
सविस्तर वाचा -

15:02 (IST)07 Apr 2020
जपानमध्ये आणीबाणी जाहीर


करोना व्हायरसच्या संकटामुळे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी मंगळवारी आणीबाणी घोषित केली आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांनी आर्थिक पॅकेजही जाहीर केले आहे. जपानमध्ये सध्या करोनाचे ४५६३ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये डायमंड प्रिंसेस जहाजावरील ७०० प्रवाशांचा समावेश आहे.

14:51 (IST)07 Apr 2020
करोनाबाधित शहरात लॉकडाऊन वाढवला पाहिजे : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई- पुण्यासह राज्याच्या अनेक भागात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे हे लक्षात घेता राज्यातील करोनाबाधित शहरात लॉकडाऊनचा काळ वाढवला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मांडली. अर्थात केंद्र सरकारशी व मंत्रिमंडळातील चर्चेनंतर याबाबतचा निर्णय होईल, असेही त्यांनी सांगितले.

14:41 (IST)07 Apr 2020
WhatsApp युजर्सना झटका, मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी आता नवीन मर्यादा

सोशल मीडियावर करोना व्हायरसबाबत पसरणाऱ्या अफवांमुळे लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp ने मोठा निर्णय घेतलाय. WhatsApp ने मेसेज फॉरवर्ड करण्याला नवीन मर्यादा घातली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर आतापर्यंत एखादा मेसेज एकावेळी पाच जणांना फॉरवर्ड करता येत होता. पण आता कंपनीने यामध्ये बदल केला आहे. सतत फॉरवर्ड होणारे मेसेजेस रोखण्यासाठी नवीन मर्यादा कंपनीने घातली आहे. (वाचा सविस्तर)

13:58 (IST)07 Apr 2020
“मी जितेंद्र आव्हाड बोलतोय, मी बोलतोय ते तुम्हाला पाळावंच लागेल”

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकार महत्त्वाचे निर्णय घेत असताना दुसरीकडे लोकप्रतिनीधीदेखील आपापल्या मतदारसंघात लोकांची भेट घेत त्यांना घरीच थांबण्याचं आवाहन करत आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडदेखील वारंवार कळवा-मुंब्रा येथील रहिवाशांना घराबाहेर पडू नका, काळजी घ्या अशी विनंती करत आहेत. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी लोक नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत. यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी लोकांना घराबाहेर पडलात तर १४ दिवस जेलमध्ये टाकण्याची तरतूद करण्यात आली असल्याची ताकीद दिली आहे. (सविस्तर बातमी)

13:56 (IST)07 Apr 2020
वर्ध्यात आठवडाभर बाहेरील जिल्ह्यांतून भाजी पुरवठा बंद

वर्धा जिल्ह्याच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा जिल्ह्यांमधून वर्ध्यात येणारा भाजीपाला पुरवठा थांबवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. दरम्यान, जिल्ह्यात येणाऱ्या भाजीपाल्याची वाहतूक बंद करण्यात आल्याने भाज्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. विदर्भात अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. सविस्तर वृत्त वाचा

13:53 (IST)07 Apr 2020
औषधांचा पुरवठा करु, राजकारण करु नका


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन औषधावरुन इशाऱ्याची भाषा केल्यानंतर भारतानेही सुनावलं आहे. “भारत आपल्या शेजारी देशांना व करोना व्हायरसमुळे सर्वाधिक त्रस्त असलेल्या देशांना जीवनावश्यक औषधांचा पुरवठा करेल" वाचा सविस्तर बातमी

13:36 (IST)07 Apr 2020
भाजपा नेते आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

चैत्री यात्रेला पंढरपुरात विठ्ठलाची पूजाअर्चा करून कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपा नेते आमदार सुजितसिंह ठाकूर व विठ्ठल मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्याविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.

13:32 (IST)07 Apr 2020
कौतुकास्पद! चार वर्षांच्या मुलाने सायकलसाठी जमवलेले ९७१ रुपये दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

करोनाचं संकट दिवसेंदिवस गहिरं होताना दिसतं आहे. देशभरात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. अशात हाल होत आहेत ते हातावर पोट असलेल्या कामगारांचे. या कामगारांना मदत व्हावी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा वापर केला जातो आहे. या सहाय्यता निधीला भरभरुन दान दिलं जातं आहे. सगळ्याच राज्यांमध्ये हे दान दिलं जातं आहे. अशात आंध्रप्रदेशातल्या एका चार वर्षांच्या मुलाने सायकलसाठी जमवलेले ९७१ रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दान केले आहेत. हेमंत असं याच वर्षांच्या मुलाचं नाव आहे चार वर्षांच्या हेमंतचं सगळीकडे कौतुक होतं आहे. ANI ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

13:21 (IST)07 Apr 2020
खासदारांप्रमाणे आमदारांची पगार कपात व्हावी - अनिल परब

खासदारांप्रमाणे आमदारांची पगार कपात व्हावी अशी मागणी शिवसेना मंत्री अनिल परब यांनी केली आहे. संकटात आमदार आणि खासदार यांनी पुढे आलं पाहिजे. मंत्रीमंडळ यासंबधी निर्णय घेईल असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.  

12:58 (IST)07 Apr 2020
Coronavirus : जगभरातील कलाकार एकत्र; ‘डब्ल्यूएचओ’ला करणार आर्थिक मदत

चीनपासून उगम पावलेल्या करोना विषाणूचा आतापर्यंत संपूर्ण जगात संसर्ग पसरला आहे.त्यामुळे बऱ्याच शहरांमध्ये लॉकडाउन करण्यात आला आहे. याचकारणास्तव प्रत्येकालाघरात राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे. करोनाविरोधातील लढ्याला आर्थिक बळ देण्यासाठी बॉलिवूडमधील कलाकार मदत करत असताना आता जगभरातील कलाकारही पुढे आले आहेत. हे कलाकार एका कार्यक्रमाच्या माध्यमातून निधी उभारणार असून तो जागतिक आरोग्य संघटनेला देणार आहे. पुढे वाचा...

12:56 (IST)07 Apr 2020
Coronavirus : एमपीएससीच्या स्पर्धा परीक्षा काही काळासाठी स्थगित

राज्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,  राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा संयुक्त परीक्षा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहीर केला आहे.

12:52 (IST)07 Apr 2020
बुलढाणा जिल्ह्यात आणखी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह

बुलढाणा जिल्ह्यात आणखी दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यतील करोनाबधितांची संख्या ११ वर पोहोचली आहे.

12:45 (IST)07 Apr 2020
मुंबईची लोकल ट्रेन इतक्यात सुरू होणं कठीण?

सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या लॉकडाउनचा कालावधी निदान काही ठिकाणी वाढवला जाईल अशी शक्यता असतानाच, मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल ट्रेनही कदाचित एवढ्यात सुरू होणार नाही असे संकेत मिळत आहेत. देशामध्ये ८० टक्के करोनाबाधित सुमारे ६२ जिल्ह्यांमध्ये केंद्रीत झाले असल्याचे नुकतेच स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वाधिक रूग्ण व संशयित मुंबई व पुण्यासारख्या महानगरांमध्ये आढळले आहेत, व त्यांच्या संख्येत दिवसांगणिक वाढ होताना दिसत आहे.सविस्तर बातमी वाचा

12:31 (IST)07 Apr 2020
"मातोश्रीबाहेरील तो चहावाला परदेशातून आला होता पण..."; निलेश राणेंची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या वांद्रे येथील मातोश्रीबाहेरील चहावाल्याला करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी हे वृत्तसमोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ सुरु झाली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चहावाला राहत असलेल्या इमारतीमधील चार जणांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तसंच काही सुरक्षा रक्षक जे या चहावाल्याच्या स्टॉलवर गेले होते त्यांना पूर्वकाळजी म्हणून अलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आता थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ कोरनाचा रुग्ण अढळून आल्याने भाजपाचे नेते निलेश राणे यांनी राज्यातील सरकारच्या कारभारावरच उपहासात्मक टीका केली आहे.येथे वाचा सविस्तर वृत्त

12:26 (IST)07 Apr 2020
उन्हाळयात करोनाचा विषाणू मरणार का?

भारतात सध्या उकाडा वाढत असून काही भागांमध्ये तापमान ३० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. पुढच्या दोन आठवडयात उत्तर भारतात तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या उष्ण वातावरणात करोना व्हायरसचा विषाणू जगणार नाही, असे म्हटले जाते. पण खरोखरच हे शक्य आहे का? वाचा सविस्तर बातमी.

12:24 (IST)07 Apr 2020
भारताने २४ औषधांच्या निर्यातीवरील हटवले निर्बंध


भारताने २४ औषधं आणि औषध निर्मिती घटकांच्या निर्यातीवर असलेले निर्बंध उठवले आहेत. सरकारक़डून ही माहिती देण्यात आली आहे. भारत जेनेरिक औषधांचा जगातील सर्वात मोठा पुरवठादार देश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाच्या पुरवठयावरुन इशारा दिला होता. वाचा सविस्तर बातमी.

12:12 (IST)07 Apr 2020
हनुमान जयंतीला पर्वत आणायला जाऊ नका, घरातच थांबा – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्ब-ए-बारात तसंच हनुमान जयंतीला घराबाहेर पडू नका असं आवाहन राज्यातील जनतेला केलं आहे. “लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानानं औषधी झाडासह संपूर्ण पर्वत उचलून आणल्याचं वर्णन रामायणात आहे. आज जनतेला करोनापासून वाचवण्यासाठी हनुमानासारखे पर्वत उचलण्याची नाही तर घरातच थांबण्याची गरज आहे,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. मुस्लीम बांधवांनीही शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, घरातंच थांबावं असंही त्यांनी म्हटलं आहे. (सविस्तर बातमी)

12:04 (IST)07 Apr 2020
भारताने संकटकाळात मदत करावी - राहूल गांधी

भारतानं सर्वच राष्ट्रांना त्यांच्या संकटाच्या काळात मदत केलीच पाहिजे. पण, सर्वात आधी जीवनरक्षक औषधं भारतीयांना उपलब्ध करून द्यायला हवी.

11:59 (IST)07 Apr 2020
मुंबई : मणिपूरच्या महिलेवर थुंकला दुचाकीस्वार, एफआयआर दाखल

देशभरात सर्वत्र करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी बाळगली जात असताना मुंबईतील सांताक्रुझ येथे मणिपूरच्या एका महिलेवर एक अज्ञात बाइकस्वार थुंकल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्हीद्वारे अज्ञात बाइकस्वाराचा कसून शोध घेतला जात आहे. (वाचा सविस्तर)

11:44 (IST)07 Apr 2020
इतरांच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या पोलिसांसाठी सिद्धार्थ चांदेकरने दिला मोलाचा सल्ला

देशावर करोना विषाणूचं सावट असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यामुळे निर्थक कारणासाठी रस्त्यावर फिरणाऱ्यांवर चाप बसावा यासाठी ठिकठिकाणी पोलीस गस्त घालत आहे. विशेष म्हणजे दिवस-रात्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर असणाऱ्या पोलिसांचे अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आभार मानले असून त्यांना काळजी घेण्यास सांगितलं आहे. पुढे वाचा...

11:41 (IST)07 Apr 2020
राज्यात आज २३ नवे करोनाग्रस्त

राज्यात आज नवीन २३ करोनाचे रुग्ण मिळाले आहेत. यामध्ये सांगली १, पिंपरी-चिंचवड ४. अहमदनगर ३, बुलढाणा२, मुंबई १०, ठाणे १ आणि नागपूर २. राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ८९१ झाला आहे.