जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आई- मुलगा व अन्य एक तरुण अशा तिघांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेले तीन दिवस एकही रुग्ण नसलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात करोनाचे 3 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, करोनाबाधित असलेली महिला मुंबई पोलीस दलात सेवेत असल्याची माहिती देखील मिळाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामधील करोनाबाधितांची एकूण संख्या आता सात झाली आहे. आतापर्यंत एकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दहाजण उपचारानंतर बरे झालेले आहेत.

आणखी वाचा- चिंताजनक : औरंगाबादेत पुन्हा 17 पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या 500 च्या उंबरठ्यावर

कोल्हापूर येथे आज पहाटे  करोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यानुसार ग्रामीण रुग्णालय आजरा येथून पाठविण्यात आलेले दोन रुग्णांचे स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 41 वर्षाची महिला आणि 19 वर्ष वयाच्या पुरुष रुग्णाचा समावेश आहे. अन्य एका रिपोर्ट नुसार ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे घेण्यात आलेला एका रुग्णाचा रिपोर्ट  सुद्धा पॉझिटिव्ह आला आहे.

आणखी वाचा- प्रतिबंधित क्षेत्र सर्वसामान्यांसाठीच?

मागील चोवीस तासांत देशभरात 3 हजार 320 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 95 जणांचा करोनाने बळी घेतला आहे. देशभरातील करोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 59 हजार 662  वर पोहचली आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 39 हजार 834 रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 17 हजार 847 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 हजार 981 जणांचा समावेश आहे.