मुंबईत उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ

मुंबई  :  राज्यात रविवारी करोनाचे २२,५४३ नवे रुग्ण आढळले असून, गेल्या २४ तासांत ४१६ जणांचा मृत्यू झाला. उपाचाराधीन रुग्णांमध्ये मुंबईने ठाणे जिल्ह्य़ाला मागे टाकले आहे.

राज्यात सध्या २ लाख ९० हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. पुणे जिल्हा ७७,६२४, मुंबई ३०,२७१, ठाणे जिल्हा २९,५३१, नागपूर जिल्हा २१,५२२, नाशिक १२,८६० रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यातील मृतांचाही आकडा वाढत असून, आतापर्यंत २९,५३१ जणांचा मृत्यू झाला.

दिवसभरात रायगड ९१७, नाशिक शहर ७१३, नगर जिल्हा ८१२, जळगाव जिल्हा ११२०, पुणे शहर २२९४, पिंपरी-चिंचवड १००४, उर्वरित पुणे जिल्हा ११२६, सातारा ९१२, सोलापूर ६२०, सांगली जिल्हा ११००, औरंगाबाद जिल्हा ६८५, नागपूर १५३४ नवे रुग्ण आढळले.

मुंबईत दिवसभरात २,०८५ जणांना करोनाची बाधा

’ गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा काळ सरासरी ५६ दिवसांपर्यंत खाली घसरला आहे. तर रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाणही ७७ टक्क्य़ांवर आले आहे. रविवारी दिवसभरात दोन हजार ८५ रुग्णांना करोनाची बाधा झाली असून ४१ रुग्णांचा मृत्यू झाला.

’ गणेशोत्सवानिमित्त झालेली गर्दी, संसर्ग वाढत असलेल्या ग्रामीण भागातून मुंबईत येणारी मंडळी, तसेच पालिकेने वाढविलेले करोना चाचण्यांचे प्रमाण अशा विविध कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. आतापर्यंत मुंबईतील एक लाख ६९ हजार ६९३ जणांना करोनाची बाधा झाली. त्यातील एक लाख ३० हजार ९१८ रुग्ण करोनामुक्त झाले, तर आठ हजार १४७ करोनाबाधितांना प्राण गमवावे लागले आहेत.

’ दोन आठवडय़ांपूर्वी मुंबईतील उपचाराधीन रुग्णांची संख्या २० हजारांच्या आत होती. मात्र वाढती रुग्णसंख्या आणि करोनामुक्त होण्याचे प्रमाण तुलनेत कमी झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. आजघडीला ३० हजार २७१ रुग्ण उपचार घेत आहेत. इमारतींमध्ये मोठय़ा संख्येने करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. परिणामी, टाळेबंद इमारतींची संख्या सात हजार ९८३ वर पोहोचली आहे.

ठाणे जिल्ह्यात २४ तासांत १,९३० करोनाबाधित

ठाणे : जिल्ह्यात रविवारी १ हजार ९३० रुग्ण आढळून आले, त्यामुळे एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख ४६ हजार १०२ इतकी झाली आहे. दिवसभरात २८ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ३ हजार ९२१ इतकी झाली आहे.

रविवारी आढळलेल्या रुग्णांत कल्याण-डोंबिवली शहरातील ५४९, नवी मुंबईतील ३६८, ठाणे शहरातील ३४७, ठाणे ग्रामीणमधील २६२, मीरा-भाईंदरमधील १७५, बदलापूर शहरातील ८६, उल्हासनगर शहरातील ७३, अंबरनाथ शहरातील ३९ आणि भिवंडी शहरातील ३१ जणांचा समावेश आहे. तर, मृतांमध्ये कल्याण-डोंबिवलीतील ७,  मीरा-भाईंदरमधील ७, नवी मुंबईतील ५, ठाणे शहरातील ४, उल्हासनगर शहरातील २, अंबरनाथ शहरातील २ आणि ठाणे ग्रामीणमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्य़ात आठवडाभरात ३६,१७६ रुग्ण

पुणे : पुणे शहर, पिंपरी आणि जिल्ह्य़ात ५ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या एका आठवडय़ात तब्बल ३६,१७६ करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील एकूण रुग्णसंख्या शनिवारी २,२०,६९२ वर पोहोचली. या सात दिवसांमध्ये दररोज पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच उर्वरित जिल्ह्य़ात मिळून चार हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.

५ सप्टेंबरला पुणे जिल्ह्य़ातील दिवसभरातील रुग्णसंख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडत ४०५० पर्यंत वाढ नोंदवली. त्यानंतर सलग आठवडाभर जिल्ह्य़ातील रुग्णसंख्या चार हजारांच्या वर जात असल्याचे चित्र आहे. पुणे, पिंपरी महापालिका क्षेत्रांबरोबरच ग्रामीण भागांतील वेगाने होणारा करोनाचा फै लाव ही यातील मुख्य चिंतेची बाब ठरत आहे. या सात दिवसांमध्ये १५,६०३ रुग्ण पुणे शहरात आढळले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका भागात ९३०५ रुग्णांची नोंद झाली आहे. उर्वरित जिल्ह्य़ातील रुग्णवाढ ११,२६८ एवढी आहे. त्यामुळे सुरुवातीला केवळ शहरांपुरताच मर्यादित असलेला करोनाचा संसर्ग ग्रामीण भागात फैलावण्यास सुरुवात झाल्यामुळे त्याला रोखण्याचे मोठेच आव्हान आरोग्य यंत्रणांसमोर उभे राहिले आहे. आठवडय़ाच्या कालावधीत जिल्ह्य़ात ६४३ रुग्ण करोनाने दगावले आहेत.