News Flash

…आणि गरीब रुग्णांचे प्राण वाचवा; देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

राज्यातील मृत्यांच्या आकडेवारीवर व्यक्त केली चिंता

राज्यात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येबरोबरच करोनामुळे होणाऱ्या मृत्यूसंख्येवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी वाढत्या मृत्यूला आळा घालण्यासंदर्भात सरकारला सल्ला दिला असून, याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. “राज्यात दर दिवशी सरासरी २० हजार करोना रुग्णांची भर पडत आहे. ४५० बळी दररोज जात आहे,” असं म्हणत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात तातडीने निर्देश देण्याची विनंती केली आहे.

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. “राज्यात दर दिवशी सरासरी सुमारे २० हजार करोना रुग्णांची भर पडत आहे. सरासरी ४५० ने दररोज बळीसंख्या वाढते आहे. अशात रेमडेसिवीर हे उपचारातील एक महत्वाचे औषध असल्याने त्याचा पुरवठा सुरळीत राहील, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये त्याची उपलब्धता नसल्यानं गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्य सरकार उपलब्धतेचे कितीही दावे करीत असले तरी रूग्णालयांकडून मात्र टंचाईचेच कारण रूग्णांना सांगितले जात आहे. त्यामुळे रूग्णालयांकडून रूग्णांना थेट केमिस्टकडे ते खरेदी करण्यासाठी जाण्यास सांगितले जात आहे. याची किंमत लक्षात घेता, ते सामान्यांच्या आवाक्यात नाही. परिणामी त्यांचे मृत्यू होण्याचेही प्रमाण वाढले आहे,” असं फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे.

“रेमडेसिवीरच्या खरेदीसाठी राज्य सरकारने मध्यंतरी प्रक्रिया राबविली. परंतु ती प्रक्रिया सदोष असल्याने अनेक जिल्ह्यातून खरेदी केलेला औषध साठा परत करावा लागला, असं वृत्त माध्यमांमध्ये आले आहे. रेमडेसिवीर अभावी रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. खरेदी योग्य झाली नसल्याने याच्या उपलब्धतेचा गुंता आणखी वाढला. परिणामी प्रचंड तुटवडा निर्माण झाला. यामुळे रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असून, त्यामुळे गरिबांचे सर्वाधिक हाल होत आहेत. अनेकांनी तर याचा गोरखधंदा सुरू केला आहे. एकीकडे गरीब रूग्णांचे मृत्यू आणि दुसरीकडे रेमडेसिवीरची काळाबाजारी ही स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे नवीन खरेदी प्रक्रिया राबवून जिल्हा प्रशासनांना हा साठा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच सर्व गरीब रुग्णांना सरकारी तसेच खासगी रुग्णालयात सुद्धा रेमडेसिवीर मोफत उपलब्ध करून देण्यात यावे. याबाबत तातडीने आपण निर्देश प्रशासनाला द्यावेत आणि गरिब रूग्णांचे प्राण वाचवावे,” असं फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 6:04 pm

Web Title: coronavirus in maharashtra devendra fadnavis write uddhav thackeray covid death bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 वंचित बहुजन आघाडीची बिहार निवडणुकीत उडी; ‘या’ आघाडीसोबत लढवणार निवडणूक
2 “… की आता मुंबई, महाराष्ट्राचा अवमान करणाऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही गदा आली?”
3 कमालीचे प्रांजळ व तटस्थ महात्मा गांधींना राज ठाकरेंचं अभिवादन