मुंबई, पुण्यापाठोपाठ मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातही करोनानं हातपाय पसरण्यास सुरु केलं आहे. शहरात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना रविवारी एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सातारा परिसरातील रहिवाशी असलेल्या या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी करोनासदृश्य लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर या व्यक्तीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आलं होतं. रविवारी उपचारदरम्यान मृत्यू झाला.

इतर शहरांपाठोपाठ औरंगाबद शहरात करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं औरंगाबादमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बीड बायपास लगत असलेल्या सातारा परिसरातील व्यक्तीला करोनासदृश्य लक्षणं आढळून आल्यानं तीन एप्रिलला सायंकाळी घाटीत दाखल करण्यात आलं होतं. ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी मुंबईहून घरी परतली होती. त्यानंतर त्यांना अशी लक्षणं दिसून आली. दरम्यान घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी चाचणी करण्यात आली. रिपोर्टमध्ये करोना झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच रविवारी या व्यक्तीचा मृत्यू झाला. सध्या औरंगाबाद शहरात तब्बल सात रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुण्यात २४ तासात दोन बळी-

मुंबईपाठोपाठ पुण्यातही करोनाग्रस्त रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. पुण्यात करोनामुळे चोवीस तासात आणखी तीन बळी गेले आहेत. करोनासदृश्य लक्षणं आढळून आल्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या करोनाबाधित ६० वर्षीय महिलेचा आणि ४८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर ६९ वर्षीय करोनाबाधित वृद्ध महिलेचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.