मुंबई : राज्यात काही ठिकाणी डाॅक्टर, नर्सिंग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना करोनाचा उद्रेक झाल्यानंतर संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी सरकारकडे करण्यात आल्या आहेत. मानवतेच्या दृष्टीने हे अत्यंत चुकीचे असून, नियमबाह्यही आहे. घरमालकांनी आणि सोसायट्यांनी आरोग्य यंत्रणेचे महत्व लक्षात घेऊन सहकार्य करावे. अन्यथा साथरोग नियंत्रण कायद्यानुसार संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शासनाने दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या करोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डाॅक्टर, नर्सिंग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत. हे करताना त्यांना विषाणुची बाधा होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व काळजी त्यांच्यामार्फत तसेच प्रशासनामार्फत घेतली जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून इतरांना संसर्गाचा कोणताही धोका नाही. असे असतानाही काही घरमालक, हाऊसिंग सोसायट्या त्यांच्याकडे भाड्यानं राहणारे डाॅक्टर, नर्सिंग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना घर खाली करण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हे पूर्णतः चुकीचे असून संबंधित घरमालक, हाऊसिंग सोसायट्या यांनी असे करु नये, असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. एखादा घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटी असे करत असल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असं प्रशासनानं म्हटलं आहे.

भाड्याच्या घरात राहणारे डाॅक्टर, नर्सिंग कर्मचारी व इतर आरोग्य कर्मचारी यांना असा अनुभव आल्यास त्यांनी आपल्या क्षेत्रातील पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असं आवाहनही प्रशासनानं केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus in maharashtra govt will take action against landlord if misbehave with doctor nurs bmh
First published on: 26-03-2020 at 20:08 IST