राज्यातील काही जिल्ह्यातील परिस्थिती करोनामुळे चिंताजनक बनली असून, सांगली जिल्ह्यातही करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यासंदर्भात पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर पाटील यांनी संवाद साधत जिल्ह्यातील नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. तसेच पुन्हा लॉकडाउन करण्याचा इशाराही दिला आहे.

जयंत पाटील यांनी ट्विटरवरून सांगली जिल्ह्यातील नागरिकांशी संवाद साधला. जयंत पाटील म्हणाले,”गेल्या काही दिवसात सांगली जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. मी कालच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. प्रशासन सर्व खबरदारी घेत आहे. जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी. आपण गर्दीत जाऊ नका, गर्दी करू नका, सोशल डिस्टनसिंगचे पालन करा ही नम्र विनंती,” असं आवाहन पाटील यांनी केलं.

“आपल्याला करोना होणारच नाही, असं डोक्यात ठेवून काही जण गर्दी करत आहेत. त्यामुळे रोगाचा फैलाव वाढत आहे. आपल्या जिवाला जपा, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा. प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. मात्र त्यात तुमचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमचे सहकार्य अपेक्षित आहे,” असं पाटील म्हणाले.

“परिस्थिती जर नियंत्रणात आली नाही, तर आम्हाला नाईलाजाने पुन्हा लॉकडाऊनची घोषणा करावी लागेल. त्याने कारखाने बंद होतील. रोजगार जाईल. ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांची अडचण होईल. आर्थिक फटका बसेल. त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करा, नियमांचे पालन करा, काळजी घ्या,” असा इशारा जयंत पाटील यांनी सांगलीकरांना दिला आहे.