News Flash

तिसरी लाट रोखण्यासाठी नवा कित्ता; गावकऱ्यांना गांधीवादी डॉक्टरकडून धडे

शहरातून काही आणायचे झाल्यास गावातील एकच व्यक्ती गावाबाहेर पडणार

सेवाग्राम आश्रम (संग्रहित छायाचित्र)

-प्रशांत देशमुख

करोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा अंदाज गृहित धरून ही लाट वेशीवरच थोपवण्यासाठी सेवाग्राम परिसरातील तीस गावांमध्ये आवश्यक वस्तूंबाबत स्वावलंबनाचे धडे गांधीवादी डॉक्टरांकडून देण्याचा उपक्रम पूढे आला आहे. कधीकाळी ज्या खेड्यांमध्ये महात्मा गांधींची पावले पडली, त्याच गावांमध्ये करोनाप्रसार रोखण्यासाठी नवीन कित्ता गिरवल्या जाणार आहे. सेवाग्रामच्या महात्मा गांधी आर्युविज्ञान महाविद्यालयाच्या कस्तूरबा रूग्णालयाचे जेष्ठ गांधीवादी व औषधीतज्ञ डॉ. उल्हास जाजू यांनी याबद्दल माहिती दिली.

सेवाग्रामच्या महात्मा गांधी आर्युविज्ञान महाविद्यालयाच्या कस्तूरबा रूग्णालयामार्फत ग्रामीण स्वास्थ विमा योजना राबविल्या जाते. एका कुटूंबातून बारा पायली ज्वारीचा हप्ता घेवून कुटूंबाला संपूर्ण आरोग्य सेवा मोफत दिल्या जाते. धान्य शक्य नसल्यास अडीचशे रूपये आकारल्या जाते. या परिसरातील तीस गावे सहभागी आहेत. १९९१ पासून त्याचे नियोजन करणारे जेष्ठ गांधीवादी व औषधीतज्ञ डॉ. उल्हास जाजू योजनेचे नियोजन करतात. याच माध्यमातून त्यांनी काही गावांना दुध उत्पादनात स्वयंपूर्णही केलं आहे. “करोनाच्या पार्श्वभूमीवर गावातील स्वास्थ टिकावे तसेच गावांचा कमीतकमी संपर्क शहराशी यावा म्हणून त्यांनी लोकसहभागासह ग्राम स्वराज्य उपक्रम गावकऱ्यांपुढे ठेवला. गावाची स्वत:ची स्वनियोजित यंत्रणा तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. शासनावरील करोनाविषयक अवलंबित्व टाळणे व शहरातून कोणतीही वस्तू खरेदी न करता गावातच वस्तूरूपात विनिमय करण्याचे उद्दिष्ट्य आहे. करोनाविषयक स्वास्थ यंत्रणा सांभाळण्याची जबाबदारी युवकांना मिळेल. संपूर्ण गावानेच शेतीवर आधारित उदनिर्वाहाचा मार्ग शोधावा म्हणून प्रयत्न सुरू झाले आहे. ग्रामसभेची भूमिका ग्रामपंचायतने स्वीकारणे अपेक्षित असल्याने हे शक्य होणार आहे,” असं डॉ. जाजू यांनी सांगितलं.

“गावपातळीवर उसापासून गूळ, तूरडाळ, चणाडाळ, लोणची, सरबत, धने, मिरची पावडर तसेच भाजीपाला उत्पादन वर्षभराच्या संकटाला डोळ्यापूढे ठेवून केल्या जाईल. शहरी माणूस या वस्तूसाठी मागेल ती किंमत मोजायला आज तयार आहे. जीवनावश्यक गरजा गावातच भागवायच्या व उर्वरित शहरात पाठवायच्या. त्यासाठी गावातच विक्री केंद्र उभे होत आहे. गावाच्या वेशीवर गावातील माणूस उभा राहून शहरातील नागरिकांना विक्री करेल. शहरातून काही आणायचे झाल्यास गावातील एकच व्यक्ती गावाबाहेर पडेल. शहरातून परतल्यावर घरी किंवा शेतघरात त्याला विलगीकरणात ठेवल्या जाईल. आजाराची लक्षणं दिसल्यास गावातच संस्थेचे डॉक्टर विद्यार्थी पोहोचतील. प्राणवायूची गरज असेल, तेव्हाच दवाखान्यात दाखल केल्या जाईल. प्राथमिक उपचाराचे धडे युवकांना देणे सुरू झाले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेला जून अखेरी ओहोटी लागेल. तिसऱ्या लाटेचे सावट ऑक्टोंबरपासून पसरण्याची शक्यता आहे. ती प्रामुख्याने बालकांना बाधित करेल,” अशी शक्यता व्यक्त करीत डॉ. जाजू म्हणाले की, “त्या दृष्टीने या गावात ग्राम स्वावलंबनाचे व करोनामुक्तीचे कार्यक्रम अंमलात आणण्याचा प्रयत्न आहे. मुखपट्टी, विलगीकरण, बाहेरचा प्रवास व तत्सम खबरदारी घेण्याची आचारसंहिता डोळ्यापूढे आहे. आता गावांचा प्रतिसाद महत्वाचा ठरतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“बाजारातून आणाव्या लागणाऱ्या वस्तू शक्यतो गावातच तयार करण्याचा प्रारंभी प्रयत्न होईल. गृह उद्योगांमार्फत कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करणे, तयार करणे शक्य नसलेल्या वस्तू इतरांसोबत वस्तू विनिमय करीत साध्य करण्याचा प्रयत्न होणार आहे. जीवनावश्यक गरजा गावातच परस्पर सहयोगाने भागविण्याचा व बाजारमुक्ती साधण्याचा संकल्प ग्रामसभेत मांडल्या जाणार आहे. त्यामुळे स्वावलंबी होण्यासोबतच अधिकचे चार पैसे कुटूंबाला मिळण्याची शक्यता वाढेल. दैनंदिन जीवनात रोख रूपयांची गरज कमी करण्याचा त्यामागे हेतू आहे,” अशी माहिती डॉ. जाजू दिली. दुध व गूळ उत्पादनात काही गावांनी चांगलीच मजल मारली. आता या दोन खेरीज अन्य उत्पादन शक्य झाल्यास करोनाला हद्दपार करणे शक्य होईल. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भाग भाजला. तिसऱ्या लाटेत झळ पोहोचू नये म्हणून तीस गावात सुरू झालेला जागर लक्षवेधी ठरणार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 4:49 pm

Web Title: coronavirus in maharashtra kasturba hospital sevagram wardha ulhas jaju bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Video : आरटीपीसीआर टेस्ट करताना स्टिक नाकात तुटली; डॉक्टरला बेदम मारहाण
2 “बाळासाहेब म्हणाले होते, कोकणसाठी सरकारचे कान पिळेन; आज त्यांच्याच सुपुत्राने तोंडाला पानं पुसली”
3 कटूपणा घेण्याची माझी तयारी; मुख्यमंत्र्यांचं लॉकडाउनबद्दल सूचक विधान
Just Now!
X