राज्यात काही दिवसांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे घरात बसून सुरक्षित राहण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच जण करत आहेत. लोकांनी घरात राहुन करोनाचा संसर्ग थांबवावा, असं आवाहन करण्यासाठी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटीही समोर आल्या. यात महाराष्ट्र पोलिसही मागे राहिलेले नाहीत. पण, महाराष्ट्र पोलिसांनी असं आवाहन करतानात प्रसिद्ध शायर मिर्झा गालिब यांचा मार्ग स्वीकारला आहे. शायरीचा आधार घेत पोलिसांनी लोकांना घरात राहण्याचं आवाहन सुरू केलं आहे.

राज्यात मंगळवारी एकूण ८२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या ३०२ झाली आहे. करोना निदानासाठी प्रयोगशाळांचे जाळे विस्तारण्यात आले असून आयसीएमआरच्या अनुमतीने सध्या राज्यात १० शासकीय आणि १३ खाजगी अशा एकूण २३ प्रयोगशाळा करोना निदानासाठी सिध्द झाल्या आहेत. यातील खाजगी प्रयोगशाळांकडील अहवालांचे मूल्यमापन करुन त्यानंतर त्यांचे अहवाल अंतिम करण्यात येत आहेत. करोनाला आळा घालण्यासाठी सरकारकडून पावलं टाकली जात आहेत. विशेष म्हणजे हे थांबवण्यासाठी लोकांना घरात राहण्याचं आवाहन केलं जातं आहे.

लोकांनी घरीच राहावं हे सांगण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी मात्र वेगळा आणि लोकांना भावणारा पर्याय निवडला आहे. शेरो-शायरी करत पोलिसांनी हे आवाहन करणं सुरू केलं आहे.
‘हमको मालूम है ‘वायरस’ की हक़ीक़त लेकिन
ख़ुद को ‘सेफ़’ रखने को ग़ालिब ये ‘मकान’ अच्छा है ‘
या शायरीतून धोक्याचा इशारा देत पोलिसांनी लोकांना स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी घरच चांगला पर्याय असल्याचं म्हटलं आहे.

देशातील रुग्णसंख्या १४९८

देशातील करोनाबळींची संख्या मंगळवारी ४५ झाली. करोनाचा संसर्ग झालेल्यांनी १४९८चा आकडा गाठला असून यात ४९ विदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर, करोनाची लागण झालेल्यांपैकी १२६ लोक आतापर्यंत बरे झाले आहेत.