वसई-विरारमध्ये करोना कहर सुरूच; चौदा दिवसांत ९०४ नवीन करोना रुग्णांची नोंद 

वसई : मागील काही दिवसांपासून वसई-विरार शहरात करोनाचा कहर अधिकच वाढू लागला आहे. मागील चौदा दिवसांत ९०४ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर फक्त ४९९ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. असे असताना उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत उपचाराधीन रुग्णांचा आकडा हा ७८९ वर जाऊन पोहोचला आहे.

वसई-विरार शहरात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे शहरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. करोनाबाधितांच्या संख्येने वर्षभरात ३१ हजारांहून अधिकचा टप्पा पार केला आहे. सद्य:स्थितीत एकूण करोनाबाधितांची संख्या ही ३१ हजार ५४५ एवढी झाली आहे. त्यातील ९४.६२ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात करोना रुग्णवाढीचे प्रमाण कमी होते, परंतु १० मार्चनंतर करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढल्याचे चित्र दिसून आले आहे. मागील काही दिवसांपूर्वी सरासरी ३० ते ३५ रुग्ण आढळून येत होते. तेच प्रमाण मागील चार दिवसांपासून ७० ते ८० घरात जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे करोनातून मुक्त होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याआधी एकूण करोनामुक्तांचे प्रमाण हे ९६ टक्के होते तेच आता ९४ टक्के इतके झाले आहे. म्हणजेच २ टक्क्यांनी करोनामुक्तांच्या संख्येत घट झाली आहे. १० मार्च रोजी उपचाराधीन रुग्णांची संख्या ही ४०० इतकी होती ती २३ मार्चपर्यंत ७८९ इतकी झाली आहे. ३८९ उपचाराधीन रुग्ण वाढले आहेत, तर १७ मार्चपर्यंत एकही मृत्यू नव्हता. १८ ते २३ मार्चदरम्यान ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

वसईत १९८ नवे करोना रुग्ण; एकाचा मृत्यू

वसई : वसई-विरार शहरातील करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. वसईत बुधवारी १९८ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले. मागील दोन ते तीन महिन्यांत प्रथमच एवढय़ा मोठय़ा संख्येने रुग्ण आढळून आले आहेत. बुधवारी ४० रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. वसई विरार महापालिकेच्या हद्दीत बुधवारी १९८ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यात १२३ पुरुष व ७५ महिलांचा समावेश आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३१ हजार ७४३ एवढी झाली आहे. मृतांची संख्या ९०७ इतकी झाली आहे. तसेच आज ४० रुग्ण करोनामुक्त होऊन परतल्याने करोनामुक्त रुग्णांची संख्या २९ हजार ८९० वर गेली आहे. अजूनही ९४६ रुग्ण उपचाराधीन आहेत.