करोनामुळे फिलिपाइन्सला उच्च शिक्षणासाठी गेलेली मुलं अडकून पडली आहेत. यामध्ये अनेक मराठी मुलांचाही समावेश आहे. ही सर्व मुलं मलेशियामधील क्वालालंपूर विमानतळावर अडकून पडली आहेत. या मुलांची संख्या ३०० च्या आसपास आहे. भारतात परतण्यासाठी विमान उपलब्ध नसल्याने ही सर्व मुलं विमानतळावरच अडकून पडली आहेत. या सर्व मुलांसमोर भारतात कसं परतायचं हा मोठा प्रश्न आहे.

अडकलेल्या मराठी मुलांपैकी एक असणाऱ्या शर्वरी कुंभार हिचे वडील सुदाम कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, “परिस्थिती खूप भीतीदायक आहे. महाराष्ट्रातील मुलांचं विमान मनिला शहरातून निघालं आहे. हे विमान मलेशियामधील विमानतळावर येईल. आधीच तिथे २०० मुलं अडकलेली आहेत. अजून त्यांना कोणतीही हेल्पलाइन देण्यात आलेली नाही. त्यांना आणण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. ती सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. माझ्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक ठिकाणी चेक अप झालेलं आहे. पुढे काय होईल याबद्दल अद्याप काही सांगण्यात आलेलं नाही”.