News Flash

पंढरपूरचे अर्थकारण बिघडले

मात्र करोनामुळे सुरुवातील टाळेबंदी, मंदिरे बंद. दुसरी लाट पुन्हा टाळेबंदी.

|| मंदार लोहोकरे
करोनाकाळातील निर्बंधांमुळे कोट्यवधींची उलाढाल थंडावली

पंढरपूर   : करोनाचा फटका पंढरीतील चैत्री, आषाढी, कार्तिकी, माघी आणि नवीन मराठी या वर्षातील चैत्री आणि आत्ताची आषाढी अशा सहा वारींना बसला आहे. करोना संसर्ग वाढू नये म्हणून मोजक्याच भाविकांसह वारी करण्यास मुभा देताना पंढरपुरात संचारबंदी लागू केली. त्याचा परिणाम पंढरपूरच्या अर्थकारणावर  झाला. मंदिर परिसर आणि शहरातील व्यापार ठप्प झाला आहे. त्यामुळे एकीकडे करोना काही संपेना आणि पंढरीत वारी काही भरेना अशी अवस्था झाली आहे. मात्र, सरकार एकीकडे उद्योग, अर्थगतीला चालना देत असतानाच तीर्थक्षेत्र परिसरातील व्यापाऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी के ली जाऊ लागली आहे.

ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता शेकडो मैल पायी चालत येत समतेची आणि बंधुत्वाची परंपरा वारकरी संप्रदाय शेकडो वर्षाची परंपरा जोपासत आहेत. वारकरी संप्रदायात चैत्र, आषाढी, कार्तिकी, माघी या चार वारीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या चार वारीपैकी एका वारीला तरी पंढरीला येण्याचा नेमस्त राज्यातील वारकरी जोपासतो. चार वारी आणि दर महिन्याची एकादशीला लाखो भाविक पंढरीत येतात. दोन चार दिवस येथील धर्मशाळा, मठ, मंदिर परिसरातील घरात राहून वारी पोहच करतो. वारीच्या काळात लाखो भाविक येतात. त्यामुळे अनेक छोटे-मोठे व्यापारी,परगावचे व्यापारी वेगवेगळे व्यवसाय, व्यापाराच्या माध्यमातून चार पैसे मिळवतात. मंदिर परिसरात चोवीस तास भाविकांसाठी दुकाने वारीकाळात सुरू राहत. त्यामुळे पालिकेचा कर, दुकान भाडे, इतर खर्च एका वारीला निघून जात असे.

मात्र करोनामुळे सुरुवातील टाळेबंदी, मंदिरे बंद. दुसरी लाट पुन्हा टाळेबंदी. करोनाचा संसर्ग वाढला की पुन्हा टाळेबंदी. यामुळे मोठ्या शहरासह तीर्थक्षेत्र ठिकाणी व्यापाऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला. इतर शहरातील व्यापार पुन्हा सुरू झाला. मात्र तीर्थक्षेत्र असलेल्या गावात मात्र अजून व्यापाराला चालना मिळाली नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे एक तर करोना रुग्ण आणि दुसरे संचारबंदी, मंदिर तर बंदच आहे. त्याचा परिणाम अर्थकारणावर झाला आहे. आषाढी वारीला अंदाजे ३०० ते ४०० कोटी रुपयांची उलाढाल होते. इतर तीन वारीला मिळून अंदाजे ६०० ते ७०० कोटी उलाढाल धरली तर मोठा आर्थिक फटका व्यापारी आणि पंढरपूरच्या अर्थकारणावर बसला असे दिसून येईल.

करोनाचे संकट संपेना. दुसरी लाट झाली की आता संभाव्य तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने तीर्थक्षेत्र विकासासाठी कोट्यवधी रुपये दिले. अर्थात यात त्या शहराचा विकास झाला का? हा प्रश्न अनुत्तरित  राहतो. त्या धर्तीवर तीर्थक्षेत्री करोनामुक्तीसाठी स्वतंत्र आरोग्य यंत्रणा राबवावी. १०० टक्के लसीकरण, १०० टक्के करोना चाचणी कराव्यात अशी मागणी होत आहे.

पंढरपुरात सलग सहा वारी भाविकाविना संपन्न झाल्या. त्याचा परिणाम इथल्या व्यापाऱ्यांना बसला आहे. त्यात श्री विठ्ठलाचे मंदिर बंद आहे. त्यामुळे येणारा भाविक कळसाचे दर्शन घेतो. मोजकाच प्रसाद आदी वस्तू खरेदी करतो आणि माघारी जातो. कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. एकीकडे सरकार उद्योगधंदे यांना चालना देत आहेत. अर्थगती कायम राहावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्याच धर्तीवर तीर्थक्षेत्र असलेल्या गावातील व्यापाऱ्यांना मदत द्यावी.

बाबाराव महाजन, व्यापारी संघटनेचे नेते

करोनाचा संसर्ग वाढू नये आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून कठोर नियम बंधकारक केले. येथील नागरिक, व्यापारी, इथे येणारे भाविक यांनी नियमांचे पालन केले तर करोनामुक्त होऊ. -सचिन ढोले, विभागीय उपअधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 12:05 am

Web Title: coronavirus infection pandharpur economy corona hit akp 94
Next Stories
1 रुग्णसंख्या वाढत असताना नियमांची पायमल्ली
2 आदिवासी विकासमंत्र्यांच्या जिल्ह्यात खावटी वाटपात गोंधळ
3 ठाणे डान्स बार प्रकरणी चार कार्यक्षेत्रीय अधिकारी निलंबित!
Just Now!
X