राज्यात दररोज करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. जळगावमध्ये शनिवारी रात्री करोनाचा रूग्ण आढळला आहे. जळगाव येथील तीन संशयितांचे नमुने शनिवारी पुण्याला पाठण्यात आले होते. त्यापैकी एका व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

जळगाव जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून तीन जणांचे अहवाल आज (ता.28) सायंकाळी प्राप्त झाले. यातील ४५ वर्षीय व्यक्तीचे नमुने पॉझिटीव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्या रूग्णास जिल्हा रूग्णालयातील आयसोलेट कक्षात ठेवण्यात आले आहे. त्या व्यक्तीच्या कुटूंबाचीही तपासणी होणार असून तपासणी करून त्यांना आयसोलेट करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक चव्हाण यांनी दिली.

जळगाव शहरातील मेहरून भागातील 45 वर्षीय तरुणाने शनिवारी सामान्य रुग्णालयात तपासणी केली असता त्याचे घशातील द्रवाचे नमुने पुणे येथे पाठवण्यात आले होते. आज संध्याकाळी उशीरा हे नमुने पॉझिटिव आल्याने त्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मेहरूण भागात ज्या ठिकाणी तो राहतो त्या त्या भागाला सनेटायझर करण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक चव्हाण म्हणाले की, प्रादुर्भाव झालेल्या या रुग्णाच्या परिसराला सॅनेटायझर करण्याच्या सूचना महानगरपालिकेला दिल्या आहेत. जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी पोलिसांद्वारे सदरहू रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात आणण्याच्या सूचना केल्या आहेत. जळगाव शहरात पहिला कोरोना रुग्ण सापडल्यामुळे खळबळ माजली आहे जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर देश १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन आहे. करोनाचा प्रादुर्भाव हा संसर्गाद्वारे होतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि शक्यतो घराबाहेर पडू नका असं आवाहन केंद्र आणि राज्य सरकारतर्फे करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील करोनाबाबत किंवा इतर महत्त्वाच्या विषयांबाबत जेव्हा बैठका घेतात तेव्हा सोशल डिस्टन्सिंग पाळताना दिसतात. त्यासंदर्भातले फोटोही व्हायरल झाले आहेत. आता महाराष्ट्रातली रुग्णसंख्या १९३ वर गेली आहे. त्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाने अधिकाधिक काळजी घेणं गरजेचं आहे.