कल्याण-डोंबिवलीमधील करोनाग्रस्तांची ंसंख्या आठवर पोहचली आहे. मात्र आठजणांपैकी एका तरुणाने विलगीकरणात न राहता एक हजार लोकांची उपस्थिती असणाऱ्या लग्नाला लावलेल्या हजेरीमुळे शहराच्या महापौरांना त्यांच्या पतीसहीत होम क्वॉरंटाइन (घरातच विलगीकरण) होण्याची वेळ आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेला राहणाऱ्या एका तरुणाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. देशामध्ये करोनाचे रुग्ण अढळू लागले त्याच काळात हा तरुण तुर्कस्तानवरुन भारतात परत आला. पर्यटनासाठी तुर्कस्तानला गेलेला हा तरुण भारतात दाखल झाल्यानंतर विमानतळावर त्याच्या हातावर क्वाड्रन्टाइनचा शिक्का मारण्यात आला होता. सरकारी अधिकाऱ्यांनी त्याला १४ दिवस घरात राहण्यास सांगितलं होतं. मात्र हा मुलगा काही दिवसांपूर्वी एका लग्न समारंभाला आणि हळदी समारंभाला उपस्थित राहिल्याची माहिती आता समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा तरुण ज्या लग्नाला उपस्थित होता त्या लग्नाला हजारहून अधिक लोकं उपस्थित होते. या एक हजार लोकांमध्ये कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनिता राणेही उपस्थित होत्या. शिवसेनेच्या महापौर असणाऱ्या राणे यांना त्यांच्या कुटुंबियांसहीत आता १४ दिवसांसाठी घरातच विलगीकरणात राहण्याचा सल्ला पालिकेने दिला आहे.

या तरुणाला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याने ही गोष्ट आपल्या मित्रांना मेसेज करुन, ‘मला करोना झाला आहे. मी रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे,’ अशी माहिती कळवली. या तरुणाच्या गैरजबाबदार वागण्यामुळे महापालिका यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मागील काही दिवसांमध्ये हा तरुण डोंबिवलीमधील ज्या ज्या भागांमध्ये जाऊन आला आहे तिथे महापालिकेच्या मार्फत फवारणी केली जात आहे. तसेच हा तरुण राहत असलेल्या आणि तो ज्यांच्या संपर्कात आला आहे अशा लोकांची तपासणी केली जात असल्याची माहिती नगससेवकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अद्याप आठ करोना रुग्ण अढळले आहेत. यापैकी दोघेजण पूर्णपणे बरे झाले असले तरी त्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. कल्याण डोंबिवलीमधील नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन महापालिकेने केलं आहे.