एकीकडे राज्यावर करोनाचं संकट असताना अमरावतीमधील एक संतापजनक घटना समोर आली आहे. करोना चाचणीसाठी आलेल्या २४ वर्षीय तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी कारवाई करत कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञाला अटक केली आहे. अल्पेश देशमुख असं अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे.

बडनेरा मार्गावरील एका मोठ्या व्यापारी प्रतिष्ठानमध्ये काम करणारा एक कर्मचारी २४ जुलै रोजी करोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं. पीडीत तरुणी तिथेच काम करत होती. यामुळे त्याच्या संपर्कातील सर्वांनीच कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला होता.

तिथे काम करणारे २० कर्मचारी मंगळवारी बडनेरातील मनपाच्या मोदी हॉस्पिटलमध्ये चाचणीसाठी गेले होते. यामध्ये काही महिला कर्मचारीही होत्या. दरम्यान एका २४ वर्षीय तरुणीच्या नाकातून स्वॅब घेतल्यानंतर त्या ठिकाणी स्वॅब घेण्यासाठी कार्यरत कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञाने गुप्तांगाचा स्वॅब घ्यावा लागतो, असे सांगून स्वॅब घेतला.

वास्तविकता कोविड चाचणीसाठी नाक, घसा या दोनच ठिकाणचे स्वॅब घेतले जातात. ही बाब लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी या प्रयोगशाळा तंत्रज्ञाविरुध्द बलात्कार, विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली.

“ज्या अमरावतीने आपल्या देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती दिली त्या अमरावीतमध्ये अशी घटना घडणं धक्कादायक आहे. महिलांचा सन्मान झालाच पाहिजे. संबंधित प्रयोगशाळा तंत्रज्ञावर कारवाई करण्यात आली आहे. सोबतच इतकी कडक कारवाई केली जाईल की पुन्हा असं कृत्य करण्याचा विचार कोणी करणार नाही. महिलांसोबत अशा पद्धतीचं गैरवर्तन सहन केलं जाणार नाही,” अशा शब्दांत महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.