देशात करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या बुधवारी ६५२ झाली असून बाधितांची संख्या २० हजार ४७१ इतकी झाली. मंगळवारच्या तुलनेत बळींच्या संख्येत ४९ ने तर संसर्ग झालेल्यांच्या संख्येत १९८६ ने वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. करोनाच्या सक्रीय प्रकरणांची संख्या १५ हजार ८५९ इतकी आहे. ३९५९ लोक बरे होऊ त्यांनी सुटी देण्यात आली आहे. तर एक रुग्ण स्थलांतरित झाली आहे. आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी १९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत.

Live Blog

21:56 (IST)23 Apr 2020
पुण्यात आज आढळले १०४ करोनाचे नवे रुग्ण, चौघांचा मृत्यू

आज पुणे शहरात १०४ नवे रुग्ण आढळले. त्यामुळं शहरातील एकूण रुग्णांची संख्या ८७६ इतकी झाली आहे. दरम्यान, दिवसभरात चौघांचा मृत्यू झाला आहे. तर १४ दिवसांच्या आयसोलेशननंतर करोनाचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने ८ जणांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आजपर्यंत १३० जण करोनामुक्त झाले आहेत.

21:48 (IST)23 Apr 2020
पुणे शहरात करोनाबाधित भागातील अतिरिक्त निर्बंध शिथिल

करोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने निश्चित केलेल्या बाधित भागात पोलिसांनी लागू केलेले अतिरिक्त निर्बंध गुरूवारी (२३ एप्रिल) मध्यरात्रीपासून शिथिल करण्यात येणार आहेत. पुढील आदेश येईपर्यंत हे निर्बंध शिथिल ठेवण्यात येणार आहेत. त्यानुसार जीवनावश्यक वस्तू तसेच किराणा माल विक्रीची दुकाने सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत खुली ठेवण्यात येणार आहेत. सविस्तर वृत्त वाचा

21:45 (IST)23 Apr 2020
महाराष्ट्रात नवे ७७८ करोना रुग्ण, एकूण संख्या ६ हजार ४०० च्या वर

आज महाराष्ट्रात ७७८ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ६ हजार ४२७ वर गेली आहे. आज  ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८४० रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ हजार ३६९ नमुन्यांपैकी ८९ हजार ५६१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६४२७ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख १४ हजार ३९८ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून ८ हजार ७०२ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

21:24 (IST)23 Apr 2020
पुणे विभागात १,०३१ कोरोनाबाधित; ६५ रुग्णांचा मृत्यू - विभागीय आयुक्त

पुणे विभागात करोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ही संख्या आात १,०३१ वर पोहोचली आहे. यांपैकी १७२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

20:28 (IST)23 Apr 2020
नवी मुंबईत एकाच दिवसात वाढले १२ रुग्ण

नवी मुंबईत एकाच दिवसात करोनाचे १२ रुग्ण वाढले. त्यामुळे शहरात करोनाबधितांची संख्या पोहोचली ९७ वर पोहोचली आहे. रुग्णांची संख्या वाढतच असल्याने ठिकठिकाणी पोलिसांकडून संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.

19:32 (IST)23 Apr 2020
सोलापूरात आढळले नवे ६ करोनाबाधित रुग्ण

सोलापुरात करोनबाधित रूग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. कालपर्यंत जिल्ह्यात ३३ रूग्ण होते, त्यात आज सायंकाळपर्यंत ६ रूग्ण वाढले. यातील बहुसंख्य रूग्ण हे झोपडपट्टी व दाट लोकवस्तीच्या भागातील आहेत.

19:14 (IST)23 Apr 2020
बीड जिल्हा पुन्हा सतर्क; सहा गावे पूर्णवेळ बंद

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन काटेकोरपणे अंमलबजावणी करीत असतानाच शेजारील जिल्ह्यात करोनाबाधित रुग्ण आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आष्टी तालुक्यातील सहा गावे पूर्णवेळ बंद करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर जामखेडच्या (जि. अहमदनगर) दिशेने आष्टी आणि पाटोदा तालुक्याकडे येणारे सर्व रस्तेही १४ दिवसांसाठी बंद करण्यात आले आहेत.

19:08 (IST)23 Apr 2020
देशभरातल्या करोनाग्रस्तांची संख्या २१ हजार ७०० च्या वर, २४ तासात ३४ मृत्यू

गेल्या २४ तासात १२२९ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण देशभरात आढळले आहेत. तर ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील करोनाग्रस्तांची संख्या २१ हजार ७०० झाली आहे. आत्तापर्यंत ४ हजार ३२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर करोनाची लागण झाल्याने आत्तापर्यंत ६८६ जणांचा मृत्यू देशभरात झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

18:16 (IST)23 Apr 2020
मालेगावमध्ये आढळले ९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे आज नऊ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे मालेगाव महापालिकेतील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११० वर पोहोचली. तर नाशिक जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२४ वर पोहोचली. मालेगावात आजवर ९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

17:26 (IST)23 Apr 2020
करोनाविरुद्ध लढ्यात आवश्यक वस्तूंवरील जीएसटी माफ करा

आमदार क्षितीज ठाकूर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मागणी

17:26 (IST)23 Apr 2020
Coronavirus: ना लॉकडाउन, ना सोशल डिस्टन्सिंग, तरीही स्वीडन करतोय करोनावर मात; जाणून घ्या...

करोनाचं संकट आल्यानंतर एकीकडे शेजारी देशांनी सीमा, शाळा, हॉटेल, उद्योग बंद ठेवले असताना स्वीडनने मात्र याउलट मार्ग निवडला आहे. आपल्या देशातील लोकांचं आयुष्य नेहमीप्रमाणे सर्वसामान्य कसं राहील यासाठी स्वीडन प्रयत्न करत आहेत. स्वीडनने ‘हर्ड इम्युनिटी’ची योजना आखली आहे. यानुसार लोकांमध्ये रोग प्रतिकारकशक्ती निर्माण करण्यासाठी व्हायरसचा फैलाव होऊ द्यायचा. मात्र यामधून हाय रिस्क असणारे म्हणजेच वृद्ध लोकांना वगळायचं. स्वीडनची ही योजना सध्या वादग्रस्त ठरत असून चर्चेचा विषय आहे. स्वीडनमधील साथीच्या रोगाच्या विशेषज्ञांनी मात्र आपली ही योजना काम करत असून लवकरच ‘हर्ड इम्युनिटी’ योजना राजधानी स्टॉकहोल्म येथे वापरली जाणार असल्याचं सांगितलं आहे. (सविस्तर वृत्त)

17:20 (IST)23 Apr 2020
Good news: मागच्या १४ दिवसात ७८ जिल्ह्यांमध्ये करोनाचा एकही नवीन रुग्ण नाही

सध्या करोना व्हायरसमुळे संपूर्ण देश चिंतेमध्ये आहे. एकाबाजूला करोनाची लागण झालेल्या रुग्णांची वाढती संख्या तर दुसऱ्याबाजूला अर्थव्यवस्था ठप्प असल्याने रोजगाराची चिंता. देश अशा दुहेरी संकटाचा सामना करत असताना एका दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. वाचा सविस्तर बातमी.

17:20 (IST)23 Apr 2020
वर्क फ्रॉम होमसाठी ३ मे पर्यंत मोफत इंटरनेट?; तो व्हायरल मेसेज खरा की खोटा जाणून घ्या

देशातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात येत असल्याची घोषणा १४ एप्रिल रोजी केली. २५ मार्च पासून सुरु असणारा लॉकडाउन १४ एप्रिलला संपणार होता. मात्र देशातील करोनाग्रस्तांची वाढती संख्या आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा कालावधी वाढवण्यात आला. असं असलं तरी या कालावधीमध्ये सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचे प्रमाण वाढलं आहे.येथे वाचा सविस्तर वृत्त

17:19 (IST)23 Apr 2020
गेल्या काही दिवसांत १५ करोना बाधित रुग्ण सापडलेल्या बदलापूरकरांसाठी दिलासादायक बातमी

करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १६ जणांचा अहवाल निगेटीव्ह, वाचा सविस्तर

17:17 (IST)23 Apr 2020
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पत्नीही करोनाविरुद्ध लढ्यात उतरल्या आहेत

राष्ट्रपती भवनात सविता कोविंद शिवणयंत्रावर मास्क शिवण्याचं काम करत आहेत. वाचा सविस्तर बातमी

17:02 (IST)23 Apr 2020
कल्याण-डोंबिवलीकरांसाठी कोव्हिड-१९ तपासणीसाठी स्वतंत्र लॅब

करोना अर्थात कोव्हिड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत करोनाची तपासणी अधिकाधिक संख्येने व्हावी, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीसाठी स्वतंत्र तपासणी लॅब असावी अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी करोना तपासणीची स्वतंत्र लॅब उभारण्यासाठी निधी देण्यास मंजुरी दिली आहे.

17:02 (IST)23 Apr 2020
कल्याण-डोंबिवलीकरांसाठी कोव्हिड-१९ तपासणीसाठी स्वतंत्र लॅब

करोना अर्थात कोव्हिड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत करोनाची तपासणी अधिकाधिक संख्येने व्हावी, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीसाठी स्वतंत्र तपासणी लॅब असावी अशी मागणी करण्यात आली होती. यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी करोना तपासणीची स्वतंत्र लॅब उभारण्यासाठी निधी देण्यास मंजुरी दिली आहे.

16:27 (IST)23 Apr 2020
Coronavirus: १५ ऑक्टोबरपर्यंत हॉटेल, रेस्तराँ, रिसॉर्ट बंद?; जाणून घ्या त्या व्हायरल मेसेजमागील सत्य काय

करोनामुळे देशातील हॉटेल आणि रेस्तराँ ऑक्टोबर २०२० पर्यंत बंद राहणार आहेत असा मेसेज सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. तुम्हाला जर हा मेसेज खरा वाटत असेल तर तुम्ही एकदा पर्यटन मंत्रालयाने जारी केलेलं स्पष्टीकरण वाचवण्याची गरज आहे. पर्यटन मंत्रालयाने अशा प्रकारचा कोणताही आदेश दिलेला नाही. मंत्रालयाने सोशल मिडियावर व्हायरल होणारे हॉटेल आणि रेस्तराँ बंद ठेवण्याबद्दलचे मेसेज हे पूर्णपणे चुकीचे आणि तथ्यहीन आहेत असं म्हटलं आहे. इतकचं नाही तर मंत्रालयाने यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रारही केली आहे.येथे वाचा सविस्तर वृत्त

15:47 (IST)23 Apr 2020
कल्याण-डोंबिवलीतील करोना रुग्णांची संख्या शंभराहून अधिक

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आज कोरोनाचे नवे ११ रुग्ण आढळले. कल्याणमध्ये सहा, डोंबिवलीत चार आणि टिटवाळयात एक रुग्ण आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात करोनाचे एकूण १०८ रुग्ण आहेत.

15:42 (IST)23 Apr 2020
"महाराष्ट्राचं रूतलेलं अर्थचक्र सुरु काढण्यासाठी..."; अर्थव्यवस्थेसंदर्भात राज ठाकरेंचे उद्धव यांना पत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी महाराष्ट्राचं रुतलेलं अर्थचक्र पुन्हा सुरु करण्यासाठी काही निर्णय घ्यावेच लागतील असं म्हटलं आहे. प्रामुख्याने सामान्यांची गरज लक्षात घेता हॉटेल व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यासंदर्भातील मागणी राज यांनी या पत्रामधून केली आहे. राज ठाकरे यांनी ट्विटवरुन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या पत्राचे फोटो ट्विट केले आहेत.येथे वाचा सविस्तर वृत्त

15:39 (IST)23 Apr 2020
"महसुलासाठी वाईन शाॅपचा विचार करा"; राज ठाकरेंचा राज्य सरकारला सल्ला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून राज्यामध्ये महसुलाचा ओघ सुरु करण्याच्या दृष्टीने राज्यातील 'वाईन शॉप्स' सुरु करायला काय हरकत आहे? असा सवाल केला आहे. राज यांनी उद्धव यांना लिहिलेल्या पत्रामध्ये राज्याचे अर्थचक्र पुन्हा सुरु करण्यासंदर्भातील काही मुद्दे उपस्थित केले आहेत. यामध्ये त्यांनी हॉटेलबरोबरच 'वाईन शॉप्स' सुरु करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने विचार करावा अशी मागणी राज यांनी केली आहे. टाळेबंदीच्या आधी दारूची दुकानं सुरूच होती म्हणून आता कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारने निर्णय घ्यावा, असंही राज म्हणाले आहेत. येथे वाचा सविस्तर वृत्त

15:22 (IST)23 Apr 2020
विकास दरात होणार मोठी घट, फिचने दिली चिंता वाढवणारी बातमी

करोना व्हायरसमुळे आधीच अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. आता फिच या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने चिंतेत भर घालणारी बातमी दिली आहे. फिचने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी भारताच्या विकास दरात आणखी घट वर्तवली आहे. वाचा सविस्तर बातमी.

15:21 (IST)23 Apr 2020
सोलापुरात आज करोनाबाधित नवे चार रूग्ण आढळलेे

सोलापुरात आज करोनाबाधित नवे चार रूग्ण आढळून आले. मागील 11 दिवसांत रूग्णांची एकूण संख्या ३७ झाली आहे. यात तीन मृतांचा समावेश आहे.

13:55 (IST)23 Apr 2020
‘टाळेबंदी’नंतर परप्रांतीय मजूरांना घरी जाण्यासाठी विशेष गाड्या सोडा; उपमुख्यमंत्र्यांची मागणी

"केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीची मुदत ३ मे रोजी संपत आहे. टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरु झाल्यास, महाराष्ट्रात ठिकठिकाणी थांबलेले परप्रांतीय मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची व त्यामुळे गर्दी उसळून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने मुंबई व पुणे येथून देशाच्या विविध भागात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडाव्यात व त्यासाठीचे नियोजन आधीच करावे," अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहिले असून परप्रांतीय मजुरांच्या मुद्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली आहे.

13:53 (IST)23 Apr 2020
न्यू यॉर्क शहरात दोन मांजरींना करोना व्हायरसची लागण

अमेरिकेत माणसांच्या बरोबरीने प्राण्यांनाही करोना व्हायरसची लागण झाली आहे. न्यू यॉर्क शहरातील दोन मांजरींचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दोन्ही मांजरींना श्वसनाचा सौम्य त्रास होत आहे. लवकरच त्या करोनामधून पूर्णपणे बऱ्या होतील. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

13:39 (IST)23 Apr 2020
"मला दोन बायका आहेत, या घरुन त्या घरी जायला पास मिळेल का?"; अजब मागणीवर पोलीस म्हणतात...

संयुक्त अरब अमिरातीमध्येही (युएई) करोनाचे करोनाचे आठ हजारहून अधिक (गुरुवारी २३ एप्रिल २०२० पर्यंत) रुग्ण अढळून आले आहेत. युएईमध्ये ५० हून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर देशामधील अनेक भागांमध्ये लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या असून अत्यावश्यक कामासाठी बाहेर जायचे असल्यास पोलिसांकडून विशेष पास घ्यावा लागणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. अशातच एका व्यक्तीने पोलिसांना एक आगळावेळा प्रश्न विचारुन गोंधळात टाकल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या गोंळवणाऱ्या प्रश्नावर पोलिसांनाही भन्नाट उत्तर दिलं असून सध्या या प्रश्नाची सोशल नेटवर्किंगवर चर्चा आहे.येथे वाचा सविस्तर वृत्त

13:36 (IST)23 Apr 2020
भाजपा धार्मिक पूर्वाग्रहांचा व्हायरस पसरवतेय; सोनिया गांधींचा आरोप

गेल्या तीन आठवड्यांपासून करोना व्हायरसचा होणार फैलाव आणि त्याचा वेग चिंता वाढवणारा असल्याचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारला देण्यात आलेल्या सल्ल्यांवर पक्षपाती आणि अत्यंत वाईट पद्धतीने पाऊलं उचलली जात असल्याचंही सोनिया गांधींनी म्हटलं आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर सोनिया गांधी यांची आज पक्षातील काही प्रमुख नेत्यांसोबत बैठक पार पडली. करोनाचा फैलाव कमी करत नियंत्रण मिळवण्यामध्ये सरकार अयशस्वी झाल्याची टीका यावेळी सोनिया गाधी यांनी केली. (सविस्तर वृत्त)

13:24 (IST)23 Apr 2020
‘लसीमधून पैसा कमवण्याची ही वेळ नाही’, ऑक्सफर्ड लस प्रकल्पातील भारतीय भागीदाराचं मत

“करोना व्हायरसला रोखण्यासाठी बनवण्यात येणाऱ्या लसीमधून पैसा कमावण्याची ही वेळ नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लस पोहोचवणे, त्यांना ही लस उपलब्ध करुन देणे ही वेळेची गरज आहे” असे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले. वाचा सविस्तर बातमी.

13:03 (IST)23 Apr 2020
मालेगावमधील संगमेश्वर येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर दगडफेक

बंदोबस्तावरील पोलिसांवर दगडफेक करण्याचा प्रकार मालेगावामधील संगमेश्वर येथे मोसम नदीवरील अल्लमा पुलावर सकाळी घडला.आधी बंदोबस्तावरील पोलिसांशी काही लोकांनी हुज्जत घातली. त्यानंतर जमलेल्या जमावातील काहींनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली.काही वेळातच जादा कुमक आल्याने जमावाने पळ काढला.

12:54 (IST)23 Apr 2020
धक्कादायक! मिरजमध्ये लॉकडाउनमध्ये अडकलेल्या तरुणीला दारु पाजून सामूहिक बलात्कार

सांगलीमधील मिरज येथे तरुणीवर सामूहिक बलात्कार कऱण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉकडाउन असल्यने तरुणी मिरजमध्येच अडकली होती. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपींनी अटक केली आहे. (सविस्तर वृत्त)

12:45 (IST)23 Apr 2020
Drone Footage: लॉकडाउनदरम्यान समुद्रकिनारी घेत होता सनबाथ, पोलिसांना ड्रोन कॅमेरात दिसला आणि...

सध्या इटलीमध्ये लॉकडाउनचा कालावधी सुरु आहे. ९ मार्च पासून सुरु झालेला इटलीतील लॉकडाउन किमान ४ मे पर्यंत सुरु राहणार आहे. मात्र त्यानंतर हा लॉकडाउन शिथिल करण्यासंदर्भात पंतप्रधान गिसीपी काँटे निर्णय घेणार असल्याचे समजते. सध्या तरी इटलीमधील पोलीस नागरिकांनी घरातच थांबून लॉकडाउनचे पालन करावे यासंदर्भात सर्व प्रयत्न करत आहेत. लोकांनी घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टन्सींगचा भंग करु नये यासंदर्भातील गोष्टींवर नजर ठेवण्यासाठी अगदी ड्रोन्सचाही वापर पोलिसांकडून केला जात आहे. याच पहाणीदरम्यान नुकतीच पोलिसांना एक व्यक्ती समुद्रकिनाऱ्यावर सनबाथ घेताना दिसून आली. येथे वाचा सविस्तर वृत्त

12:20 (IST)23 Apr 2020
करोनाला रोखण्यासाठी बनवलेली लस ८० टक्के यशस्वी ठरेल, ब्रिटनमधील संशोधकांचा दावा

लस हाच करोना व्हायरसला रोखण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे करोना व्हायरसवर परिणामकारक ठरणारी लस विकसित करण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे. काही देशांमध्ये करोनाला रोखण्यासाठी बनवण्यात आलेल्या लसीच्या मानवी चाचण्या सुरु झाल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी.

12:19 (IST)23 Apr 2020
हा जगातल्या सगळ्यात बलाढ्य अर्थव्यवस्थेवरील हल्ला; ट्रम्प यांचा चीनवर निशाणा

अमेरिकेत करोनाने थैमान घातला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर आहे. अमेरिकेत करोनामुळे आतापर्यंत ४७ हजाराहून जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर करोनाची लागण झालेल्यांची संख्या आठ लाखांच्याही पुढे आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी हा आपल्या देशावर झालेला हा हल्ला असल्याचं सांगत चीनवर निशाणा साधला आहे. “आमच्यावर हल्ला झाला आहे. हा एक हल्ला होता. हा फक्त एक फ्लू नाही आहे. १९१७ नंतर कोणीही अशी परिस्थिती पाहिलेली नाही,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. (सविस्तर वृत्त)

11:52 (IST)23 Apr 2020
मुंबई: दोन महिन्याच्या चिमुकलीने करोनाला हरवलं; आई आणि तीन वर्षाची बहिणही झाले करोनामुक्त

मुंबईमध्ये करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. असं असतानाच या भितीच्या वातावरणामध्ये काही सकारात्मक बातम्या समोर येत आहे. अशीच एक बातमी सैफी रुग्णालयामधून समोर आली आहे. येथील एक महिला आणि तिच्या दोन मुलींना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. करोनावर मात करुन जवळजवळ दोन आठवड्यांनंतर या तिघी आपल्या घरी परतल्या. यापैकी सर्वात छोटी मुलगी अवघ्या दोन महिन्यांची असून तिची बहीण तीन वर्षांचीची आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

11:42 (IST)23 Apr 2020
शाहरुखच्या ऑफिसचं विलगीकरण केंद्रात रुपांतर; पाहा व्हिडीओ

करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान पुढे आले आहेत. यामध्येच त्यांनी विलगीकरणासाठी आपल्या कार्यालयाची इमारत महापालिकेला दिली आहे. शाहरुखचं हे ऑफिस विलगीकरणासाठी तयार झालं असून इमारतीच्या आत कशा प्रकारची सोय करण्यात आली आहे. याचा एक व्हिडीओ गौरी खानने शेअर केला आहे. पुढे वाचा...

11:28 (IST)23 Apr 2020
धुळ्यात सात नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले

धुळ्यात सात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत..सात पैकी सहा रुग्ण धुळे शहरातील तर एक रुग्ण शिरपूरमधील आहे.जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 8 वरून 15 वर गेली आहे.  एकट्या धुळे शहरात 12 रुग्ण, शिंदखेडा 01, साक्री 01, शिरपूर 01 असे एकूण 15 रुग्ण आहेत

11:24 (IST)23 Apr 2020
पुण्यातील हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेत सर्वाधिक 171 बाधित रुग्ण

पुणे शहरात करोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. काल अखेर पर्यंत शहरात 772 बाधित रुग्ण आढळले असून त्यामध्ये भवानी पेठेतील 171 रुग्ण आढळले आहे. यामुळे चिंतेची बाब असल्याचे म्हटले जात आहे.

11:02 (IST)23 Apr 2020
नागपुरात १५ जण करोनामुक्त

नागपुरातील मेयो रुग्णालयातील एम्प्रेस सिटी येथील रहिवासी असलेला रुग्ण करोनामुक्त झाला आहे. बुधवारी रात्री तपासणी अहवालातून हे स्पष्ट झाले. आज दुपारी १.३० वाजता त्याला मेयो रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. यासोबत नागपुरातील करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १५ होईल. 

10:49 (IST)23 Apr 2020
Coronavirus: इटलीमध्ये २५ हजारहून अधिक दगावले; तरी 'या' कारणामुळे लॉकडाउन शिथिल करण्याचा विचार सुरु

अमेरिकेबरोबरच युरोपीयन देशांनामध्ये करोनाचा मोठा प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यातही इटली, स्पेनसारख्या देशांना करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. इटलीमध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकडेवारीने २५ हजारांचा टप्पा ओलांडला. मात्र बुधवारी उपचार घेऊन बरे होऊन डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या २ हजार ९०० हून अधिक आहे. त्यामुळेच उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी कमी झाल्याने इटलीला थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

10:45 (IST)23 Apr 2020
२१ हजार ७९७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

२३ एप्रिल सकाळी ९ वाजेपर्यंत ४ लाख ८५ हजार १७२ जणांचे नमुने तपासण्यात आले असून २१ हजार ७९७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत – आयसीएमआरची माहिती