राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ वर पोहोचली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत राज्यातील आकडेवारीची माहिती दिली आहे. यानुसार सोमवारी महाराष्ट्रात नवे ७७१ करोना रुग्ण आढळले. तर ३५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सोमवारी ३५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण २६४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान टाळेबंदीची मुदत वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानुसार महाराष्ट्र सरकारने सोमवारपासून टाळेबंदीबाबत सुधारित अधिसूचना जाहीर केली असून, मुंबई महानगर प्रदेश, पुणे-पिंपरी-चिंचवड, मालेगाव महानगरपालिका क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात टाळेबंदी अंशत: शिथिल केली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे आणि ठाणे ही प्रमुख शहरे बंदच राहणार आहेत.

देशभरात एकूण रुग्णांची संख्या ४२,८३६ इतकी झाली असून गेल्या २४ तासांमध्ये २,५३३  रुग्णांची भर पडली आहे. २९,४५३ रुग्ण वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. तर, २४ तासांमध्ये ८३ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यू १३८९ झाले आहेत. रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण वाढत असले तरी त्याची तीव्रता कमी झाली आहे. १२ दिवसांमध्ये रुग्ण दुप्पट होत आहेत. टाळेबंदी लागू करण्यापूर्वी हे प्रमाण तीन टक्के होते, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी सोमवारी दिली.

Live Blog

22:46 (IST)05 May 2020
नाशिक जिल्ह्यात करोनाचे ४६ रुग्ण

नाशिक जिल्ह्यात आज करोनाचे नवीन ४६ रूग्ण आढळले. यात नाशिकचे ३, मालेगाव आणि येवला येथील प्रत्येकी १७ जणांचा समावेश आहे. देवळाली कँम्प येथे ७, सिन्नर आणि सटाणा येथे प्रत्येकी १ रूग्ण आढळून आला. आतापर्यंत एकूण रूग्णसंख्या ४२४ झाली आहे 

22:39 (IST)05 May 2020
मुंबईत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता सगळी दुकानं बंद, मद्यविक्रीही बंद

मुंबईत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता सगळी दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी यासंदर्भातले आदेश दिले आहेत. यामधे मुंबईत मद्यविक्रीची घाऊक आणि किरकोळ दुकानं बंद राहतील असंही सांगण्यात आलं आहे. काही वेळापूर्वीच हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने लॉकडाउन जरी १७ मेपर्यंत वाढवला असला तरीही काही प्रमाणात दुकानं उघडण्यासाठी सूट दिली होती. यामध्ये वाईन शॉप्स आणि इमारतीत असलेल्या दुकानांचे शटर वर गेले होते. मात्र आता नव्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांशिवाय सगळं काही बंद राहणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील दुकानांना काही प्रमाणात सूट दिल्यानंतर, शहरात अनेक ठिकाणी नियमांची पायमल्ली झाल्याच्या घटना घडल्या होत्या..त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून या निर्णय घेण्यात आलाय..

21:36 (IST)05 May 2020
कोल्हापूर : इचलकरंजीतील बालक करोनामुक्त, आजचे अहवाल दिलासादायक

इचलकरंजी शहरातील करोनाची लागण झालेला बालक मंगळवारी बरा झाला. करोनामुक्त झालेल्या या बालकाला आज फुलांचा वर्षाव करीत डिस्चार्ज देण्यात आला. इचलकरंजीतील कोले मळा येथील एका वृद्धाला करोनाची लागण झाली होती. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या चार वर्षाच्या नातवाला करोनाची लागण झाली होती. त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याची चाचणी घेण्यात आली असता नकारात्मक आली. सविस्तर बातमी वाचा

21:25 (IST)05 May 2020
नवी मुंबईत आज ४७ रुग्ण वाढले; एकूण रुग्णसंख्या ३९५ वर

नवी मुंबईमध्ये आज ४७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे इथल्या एकूण रुग्णांची संख्या ३९५वर पोहोचली आहे. दरम्यान, पनवेलमध्ये मंगळवारी आठ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. इथे आतापर्यंत १३९ करोनाबाधित रुग्ण आढळले असून ९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ४८ रुग्ण उपचारानंतर ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. सध्या पनवेल पालिका क्षेत्रात ५२ प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

21:17 (IST)05 May 2020
महाराष्ट्रात करोनाचे नवे ८४१ रुग्ण, ३४ मृत्यू, संख्या १५ हजार ५०० च्या वर

महाराष्ट्रात करोनाचे ८४१ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची रुग्णसंख्या १५ हजार ५२५ इतकी झाली आहे. मुंबईची रुग्णसंख्या ९ हजार ७०० च्या पुढे गेली आहे तर महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही १५ हजार ५०० च्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रासाठी ही चिंता वाढवणारी बातमी आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

21:17 (IST)05 May 2020
मुंबईत ६३२ नवे करोना रुग्ण, २६ मृत्यू, संख्या ९ हजार ७०० च्याही पुढे

मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे ६३२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासांमध्ये २६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ९ हजार ७५८ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत मुंबईत करोनाची लागण होऊन ३८७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

21:00 (IST)05 May 2020
चंद्रपूरच्या करोना रुग्णाला नागपूरला हलविले; पत्नी, मुलांची चाचणी निगेटिव्ह

जिल्ह्यामध्ये फक्त एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे. या रुग्णाला कोविडशिवाय अन्य आजाराच्या विशेष तपासणी करीता सायंकाळी नागपूरला हलविण्यात आले आहे. रुग्णाच्या संपर्कातील ४४ नागरिकांचे स्वॅब नागपूरच्या कोरोना तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते, त्यांपैकी २४ नमुने निगेटीव्ह आले आहेत. यामध्ये रुग्णाची पत्नी, मुलगी व मुलाचा अहवाल देखील निगेटिव्ह आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिली आहे.

20:47 (IST)05 May 2020
सोलापुरात करोनाचे नवे दहा रूग्ण; वृध्द महिलेचा मृत्यू

सोलापुरात मंगळवारी दिवसभरात करोनाबाधित दहा नवे रूग्ण आढळून आले. तर एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण करोनाबाधित रूग्णसंख्या १३५ वरून १४५ वर पोहोचली आहे. तर मृतांचा आकडाही नऊपर्यंत गेला आहे. दरम्यान, आतापर्यंत करोनावर मात केलेल्या २४ रूग्णांना घरी पाठविण्यात आले आहे.

20:39 (IST)05 May 2020
रायगडमध्ये दिवसभरात ९ रुग्ण वाढले; जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १५५ वर

रायगड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात करोनाचे ९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या १५५ वर पोहोचली आहे. अलिबाग तालुक्यातही करोनाचा शिरकाव झाला आहे, सोमवारी पनवेल मनपा हद्दीत ५, पनवेल ग्रामिण हद्दीत ३ तर अलिबाग येथे करोनाचा एक रुग्ण आढळून आला आहेत. सविस्तर बातमी वाचा

20:16 (IST)05 May 2020
पनवेलमध्ये आठ नवे करोनाबाधित

पनवेलमध्ये मंगळवारी आठ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. उलवा, करंजाडे, पालीदेवध, कळंबोली, तळोजा, कामोठे व नवीन पनवेल येथील हे रुग्ण असून पोलीस कर्मचारी, त्यांचे कुटूंबातील सदस्य, बेस्ट चालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी, कर्करोग झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत १३९ करोनाबाधित रुग्ण आढळले असून ९१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ४८ रुग्ण उपचारानंतर ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. सध्या पनवेल पालिका क्षेत्रात ५२ प्रतिबंधित क्षेत्र आहेत.

20:06 (IST)05 May 2020
पुण्यात दररोज १,५०० करोनाग्रस्त रुग्णांच्या तपासणीचे लक्ष्य - विभागीय आयुक्त

पुणे शहरात करोना विषाणूंचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना करण्यात येत असून सध्याच्या स्थितीत सहाशे ते साडेसहाशे करोनाग्रस्त रुग्णांच्या चाचण्या होत आहेत. येत्या आठवड्याभरात हेच प्रमाण १,५०० वर नेण्याचे प्रशासनाचे लक्ष्य आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी मंगळवारी दिली. सविस्तर वृत्त वाचा

20:01 (IST)05 May 2020
करोनाच्या समूह संक्रमणाने अकोलेकरांवर चिंतेचे काळे ढग

अकोला शहरात करोनाचा प्रकोप चांगलाच वाढला आहे. नव्याने रुग्ण आढळून येण्यासोबतच मृत्यूंच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली. शहरासह जिल्ह्यात करोना रुग्ण वाढीचा वेग गतिमान असून, मागील आठ दिवसांत करोनाबाधितांची मोठी वाढ झाली. समूह संक्रमणामुळे अकोलेकरांवरील चिंतेचे काळे ढग अधिक गडद झाले आहेत.

अकोला जिल्ह्यात करोनाबाधितांच्या संख्येने पंचाहत्तरी गाठली. त्यापैकी सात रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये एकाने आत्महत्या केली, तर सहा जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. यातील बहुतांश रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा करोना तपासणी अहवाल सकारात्मक आला. त्यामुळे समूह संक्रमणाचे प्रमाण प्रचंड वाढले. शहरात करोना नियंत्रणात आहे, असे वाटत असतांनाच गत आठ दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली.

19:34 (IST)05 May 2020
मध्य प्रदेशात अडकेली वर्ध्यातली मुलं घरी परतणार; शरद पवारांची शिष्टाई कामी

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची शिष्टाई अखेर कामी आली. यामुळे लॉकडाउनमध्ये मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये अडकलेल्या ४८ वर्ध्यातील तरुणांचा परतीच्या प्रवासाचा मार्ग खुला झाला. सविस्तर वृत्त वाचा

19:11 (IST)05 May 2020
विप्रो पुण्यात उभारणार ४५० बेडचं विशेष कोविड रुग्णालय; राज्य शासनासोबत सामंजस्य करार

जागतिक माहिती तंत्रज्ञान, सल्लामसलत व व्यवसाय प्रक्रिया सेवा कंपनी असलेल्या विप्रो लिमिटेड कंपनीने पुण्यात ४५० बेडचं विशेष कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी कंपनीने राज्य शासनासोबत सामंजस्य करारही केला आहे. हे विशेष कोविड रुग्णालय पुण्याच्या हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये सुरु करण्यात येणार आहे. सविस्तर बातमी वाचा

17:18 (IST)05 May 2020
राज्यातील विद्यापीठं, महाविद्यालयं, सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसांत होणार जाहीर - सामंत

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील विद्यापीठं, महाविद्यालयं आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसांत जाहीर करण्यात येईल. यामध्ये एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. या परीक्षांसंदर्भात नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालावर मंगळवारी राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सविस्तर चर्चा करण्यात आली. सविस्तर वृत्त वाचा

17:03 (IST)05 May 2020
देशभरात ३ हजार ९०० नवे करोना रुग्ण, १९५ मृत्यू, संख्या ४६ हजार ४०० च्याही पुढे

देशभरात करोनाचे ३ हजार ९०० नवे रुग्ण गेल्या २४ तासात पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे देशातल्या करोनाग्रस्तांची संख्या ४६ हजार ४३३ इतकी झाली आहे. देशभरात गेल्या २४ तासात १९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

16:23 (IST)05 May 2020
पुण्यात ११ वर्षीय मुलासह तीन जणांचा करोनामुळं मृत्यू

पुणे जिल्ह्यात आज करोनाच्या संसर्गाने तीन जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये ११ वर्षीय चिमुकल्याचाही समावेश आहे. यामुळे पुणे विभागातील मृतांचा आकडा ११८वर पोहोचला. तर करोनाबाधितांची एकूण संख्या २,१३१वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

15:36 (IST)05 May 2020
EMI साठी आणखी तीन महिन्यांचा दिलासा मिळणार?

देशात सध्या करोनानं थैमान घातलं आहे. आर्थिक स्थितीवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांकडून तीन महिने ईएमआय न घेण्याच्या सुचना बँकांना केल्या होत्या. त्यानंतर बँकांनी ग्राहकांना तीन महिने ईएमआय स्थगित करून ईएमआयच्या कालावधीत तीन महिन्यांची वाढ करण्याची घोषणा केली होती. परंतु अद्यापही करोनाचं संकट सुरूच असल्यानं तसंच लॉकडाउनचा कालावधीही वाढल्यानं पुन्हा एकदा तीन महिन्यांसाठी हा दिलासा देता येईल का यावर रिझर्व्ह बँक विचार करत आहे. इंडियन बँक असोसिएशनकडून ईएमआय मोरेटोरिअमला पुढे वाढवण्यासाठी अनेक सुचना मिळाल्या असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तसंच रिझर्व्ह बँक यावर विचारही करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

14:07 (IST)05 May 2020
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहनांच्या रांगा; अडकलेले प्रवाशी निघाले घराकडे

राज्य शासनानं परवान्यासह अडकलेल्या परराज्यातील नागरिकांना प्रवासाची मुभा दिल्याने आज मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या. या मार्गावर वाहनांची आणि प्रवाशांची तपासणी केली जात असल्याने या रांगा लागल्या आहेत. 

12:58 (IST)05 May 2020
जुलैमध्ये जेईई मेन्स तर ऑगस्टमध्ये जेईई अ‍ॅडव्हान्स होणार

आयआयटीमध्ये प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. आता १८, २०, २१, २२ आणि २३ जुलैला जेईई मेन्स आणि जेईई  अ‍ॅडव्हान्स ऑगस्टमध्ये होणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी या परिक्षांबाबत घोषणा केली आहे.

12:33 (IST)05 May 2020
पिंपरी-चिंचवड शहरात ९ जण करोना बाधित

पिंपरी-चिंचवड शहरात ९ जण करोना बाधित आढळले असून यात दीड महिन्याच्या आणि चार वर्षाच्या चिमुकल्यांचा समावेश आहे. शहरातील करोना बाधितांची एकूण संख्या-१३२ वर पोहचली असून आत्तापर्यंत ५५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पाच जणांचा मृत्यू करोनामुळे झालेला आहे.

11:23 (IST)05 May 2020
“केंद्राच्या सूचना असल्या तरी घाई करु नका”, आशिष शेलार यांचा ठाकरे सरकारला सल्ला

लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली असून सोमवारी अनेक ठिकाणी मद्यविक्रीला सुरुवात करण्यात आली. अनेक ठिकाणी मद्यविक्री दुकानाबाहेर मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पहायला मिळालं. मद्यविक्री सुरु झाल्याने रखडलेल्या अर्थव्यवस्थेला थोडा हातभार लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्यात परिस्थितीनुसार मद्यविक्री दुकाने सुरु केली जावीत असा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने आशिष शेलार यांनी हा सल्ला दिला आहे. (सविस्तर वृत्त)

11:03 (IST)05 May 2020
उपराजधानी नागपुरात रुग्णसंख्या १६१ वर

नागपुरात सतरंजीपुरा येथील आणखी एका ४५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. यासोबत शहरातील एकूण रुग्णसंख्या १६१ वर पोहोचली आहे.

09:52 (IST)05 May 2020
मुंबईत गणेशोत्सव साजरा करण्यासंबंधी मोठा निर्णय

गणेशोत्सव आणि महाराष्ट्राचं एक वेगळं नातं आहे. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवादरम्यान खासकरुन मुंबई, पुणे येथे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पहायला मिळते. पण करोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणं महत्त्वाचं असल्याने गणेशोत्सव साजरा होणार की नाही याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे.अनेकांना गणेश चतुर्थीपर्यंत परिस्थिती सामान्य होईल असा विश्वास वाटत आहे. दुसरीकडे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीदेखील गणेशोत्सव कोणत्याही परिस्थितीत साजरा होईल असा आत्मविश्वास व्यक्त करत आहे. मात्र यावेळी गणेशोत्सव नेहमीप्रमाणे साजरा न होता अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. (सविस्तर वृत्त)

09:41 (IST)05 May 2020
अलिबाग : रामराज येथे आणखीन एक करोनाबाधित रुग्ण

अलिबागमधील रामराज येथे आणखीन एक रुग्ण सापडला आहे, रात्री उशिरा त्याचा अहवाल प्राप्त झाला. खोपलीतील एका कंपनीत तो कामाला होता, इथेच त्याला करोनाचा संसर्ग झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा तपास सुरू आहे.

09:40 (IST)05 May 2020
प्रकाश राज यांचं सातत्याने मदतकार्य सुरु; गावी परतणाऱ्यांना केली मदत

सरकारवर खुलेपणानं टीका करणारे आणि समाजातील प्रत्येक गंभीर प्रश्नावर बेधडकपणे आपलं मत मांडणारे अभिनेते प्रकाश राज सध्या अनेकांना मदत करण्यात व्यस्त आहेत.  त्यांनी ३१ मजुरांना घरी परतण्यासाठी मदत केली असून ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. पुढे वाचा...

09:38 (IST)05 May 2020
‘ब्रह्मास्त्र’ टीमच्या वेतनात कपात? करण जोहरने केला खुलासा

सध्या देशभरात लॉकडाउन सुरु असल्यामुळे अनेक क्षेत्रातील कामकाज ठप्प झालं आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्यांना अनेक संकटांना समोरं जावं लागत आहेत.  यामध्येच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या टीममधील कर्मचाऱ्यांच्या वेतनातही कपात होत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र या चर्चांना दिग्दर्शक करण जोहरने पूर्णविराम दिला आहे. पुढे वाचा...

09:16 (IST)05 May 2020
चीनच्या प्रयोगशाळेतून करोनाचा फैलाव ? अमेरिकेच्या आरोपावर WHO म्हणतं…

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी चीनच्या प्रयोगशाळेतूनच करोना व्हायरसचा फैलाव झाला असल्याचे आमच्याकडे सबळ पुरावे असल्याचं म्हटलं होतं. तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करोनाच्या फैलावासाठी वारंवार चीनला दोषी ठरवत असून जाहीरपणे आरोप करत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना...(वाचा सविस्तर)

09:14 (IST)05 May 2020
दारुवर 70% ‘स्पेशल करोना व्हायरस टॅक्स’, दिल्ली सरकारचा निर्णय

लॉकडाउनमुळे गेला महिनाभर देशभरात दारू विक्रीची दुकाने बंद होती. मात्र, सोमवारपासून ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधील दारू विक्रीला अटीशर्तींसह परवानगी देण्यात आली. त्यानंतर सर्वत्र दारुच्या दुकानांबाहेर तळीरामांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न झाल्यामुळे अनेक ठिकाणी दुकानं बंद करावी लागली. दिल्लीमध्येही असंच चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर आता दिल्लीच्या केजरीवाल सरकारने दारुवर ‘स्पेशल करोना टॅक्स’ लावण्याचा निर्णय घेतला आहे. (वाचा सविस्तर)

09:09 (IST)05 May 2020
देशातील करोनाबाधितांची संख्या 46 हजार 433 वर

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशात अद्यापही वाढतच आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता 46 हजार 433 वर पोहचली आहे. यामध्ये 32 हजार 134 जणांवार सध्या उपचार सुरू आहेत. तर 12 हजार 727 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 हजार 568 जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

08:41 (IST)05 May 2020
औरंगाबाद शहरातील करोनाबाधिताची संख्या ३२१

औरंगाबाद शहरातील करोनाबाधिताची संख्या ३२१ झाली असून आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे.

08:39 (IST)05 May 2020
‘या’ राज्यात पहिल्याच दिवशी १०० कोटी पेक्षा जास्त रक्कमेची दारू विक्री

लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात दारू विक्रीला परवानगी मिळताच वेगवेगळयां राज्यांमध्ये दारूच्या दुकानांबाहेर रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. दारू खरेदीसाठी दुकानांबाहेर झुंबड उडाल्याने सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी झाली. वाचा सविस्तर बातमी.

08:25 (IST)05 May 2020
नाशिक जिल्ह्यात आणखी पाच जण पॉझिटिव्ह

राज्यातील करोनाबाधितांची संख्या अद्यापही वाढताना दिसत आहे. आज सकाळी आलेल्या तपासणी अहवालानुसार नाशिक जिल्ह्यात पाच नव्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये मालेगावमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

07:48 (IST)05 May 2020
भारतीयांना मायदेशी आणण्याचं ऑपरेशन सुरु, नौदलाच्या तीन युद्धनौका रवाना

करोना व्हायरसमुळे जगातील अनेक देश लॉकडाउनमध्ये आहेत. त्यामुळे हजारो भारतीय त्या-त्या देशांमध्ये अडकून पडले आहेत. अशा परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याची मोहिम सुरु झाली आहे. वाचा सविस्तर बातमी.

07:21 (IST)05 May 2020
धारावीतील करोनाबाधितांची संख्या ६३२

धारावीत अन्नपुरवठा करणाऱ्या करनिर्धारण व संकलन विभागातील निरीक्षकाचा करोनामुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता याच परिसरात काम करणाऱ्या आणखी एका निरीक्षकाला करोनाची बाधा झाली आहे. दरम्यान, धारावीमध्ये सोमवारी ४२ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले असून धारावीतील करोनाबाधितांची संख्या ६३२ वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत २० धारावीकरांनी यामुळे प्राण गमावले आहेत.

07:21 (IST)05 May 2020
औषध पुढील आठवडय़ात उपलब्ध

विषाणूरोधक रेमडेसीवीर हे औषध करोना विषाणूवर उपयुक्त असल्याने त्याच्या वापरास अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने मंजुरी दिली असून हे औषध पुढील आठवडय़ात रुग्णांसाठी उपलब्ध केले जाईल असे सांगण्यात आले. या औषधाची निर्मिती करणाऱ्या गिलीड सायन्सेस या औषध कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅन ओडी यांनी म्हटले आहे, पुढील आठवडय़ात औषध रुग्णांना उपलब्ध करून दिले जाईल. अमेरिकेतील कुठली शहरे जोखमीची आहेत हे सरकार ठरवेल व नंतर गरजेनुसार हे औषध उपलब्ध केले जाईल.

07:20 (IST)05 May 2020
करोनाबाधित चार सेवेकरी फरार

नांदेड शहरातील गुरुद्वारा भागातील लंगरसाहिब येथे कार्यरत असलेले व करोनाबाधित चार सेवेकरी फरार झाल्याने नांदेड जिल्हा प्रशासन हादरले आहे. नांदेड शहरातील गुरुद्वारा भागातील लंगरसाहिब येथे ९७ जणांच्या लाळेचे नमुने घेण्यात आल्यानंतर त्यातील २० जणांना करोना झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, लाळेचे नमुने घेतल्यानंतर त्यांचे संस्थात्मक विलगीकरण केले गेले नाही. ही मंडळी पुन्हा निघून गेली. रुग्णांचे अहवाल आल्यानंतर त्यातील १६ जणांना परत आणण्यात आले. मात्र, चार जण दोन दिवसांनंतरही गायब आहेत. यांनी योग्य पत्तेही दिले नव्हते. त्यामुळे यांना शोधण्याचे काम करण्यासाठी आता पोलीस प्रशासनाला कामाला लावण्यात आले आहे. त्यामुळे नांदेडमध्ये धोका वाढला आहे. नांदेड प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या प्रकारावर बोलण्यास तयार नाहीत. मात्र, विभागीय आयुक्तांनी हा धक्कादायक प्रकार खरा असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला.

07:19 (IST)05 May 2020
मुंबई, पुणे आणि ठाणे बंदच

टाळेबंदीची मुदत वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानुसार महाराष्ट्र सरकारने सोमवारपासून टाळेबंदीबाबत सुधारित अधिसूचना जाहीर केली असून, मुंबई महानगर प्रदेश, पुणे-पिंपरी-चिंचवड, मालेगाव महानगरपालिका क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात टाळेबंदी अंशत: शिथिल केली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे आणि ठाणे ही प्रमुख शहरे बंदच राहणार आहेत

07:17 (IST)05 May 2020
दिवसभरात सर्वाधिक रुग्ण बरे!

गेल्या चोवीस तासांत करोनाचे १,०७४ रुग्ण बरे झाले असून एकदिवसात बरे झालेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या आहे. करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता २७.५२ टक्के झाले आहे. एकूण ११,७०६ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी सोमवारी दिली. देशभरात एकूण रुग्णांची संख्या ४२,८३६ इतकी झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये २,५३३  रुग्णांची भर पडली आहे. २९,४५३ रुग्ण वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. तर, चोवीस तासांमध्ये ८३ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यू १३८९ झाले आहेत. रुग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण वाढत असले तरी त्याची तीव्रता कमी झाली आहे. १२ दिवसांमध्ये रुग्ण दुप्पट होत आहेत. टाळेबंदी लागू करण्यापूर्वी हे प्रमाण तीन टक्के होते, असे अगरवाल यांनी सांगितले.