दत्तात्रय भरोदे

करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहापूर तालुक्यातील प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना वारंवार देऊनही अनेकजण करोनाला गांभीर्याने घेत नसल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. करोना आटोक्यात यावा त्याचा फैलाव होऊ नये यासाठी करोनाचे नियम न पाळणाऱ्या ग्रामस्थांची आता ‘सामाजिक आरोग्य शत्रू व करोना मित्र’ म्हणून नोटीस बोर्डावर जाहीर प्रसिद्धी करण्यात येणार आहे. दंडात्मक कारवाई बरोबरच करोनाचे नियम न पाळणाऱ्या ग्रामस्थांची जाहीर प्रसिद्धी केल्यास करोनाचे संक्रमण रोखण्यास मदत होणार आहे. शहापुरचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी याबाबत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना सूचित केले असून करोनाचे नियम धाब्यावर बसवणारे तालुक्यातील ग्रामस्थ आता याकडे किती गांभीर्याने घेतात हे पहाणे औत्सुक्याचे ठरेल.

शहरी भागासह ग्रामीण भागातही करोनाने हातपाय पसरले असून दिवसागणिक करोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे यांसह लग्न कार्यात २५ तर अंत्यविधी साठी २० ग्रामस्थच उपस्थित राहू शकतात असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात आले आहे. त्यानुसार वेळोवेळी करोनाच्या नियमांबाबत जाहीरही करण्यात आले आहे. काही दिवसांपासून करोना रुग्णांची वाढणारी संख्या रोखण्यासाठी प्रशासन खबरदारी घेत असताना अनेकजण करोनाला गांभीर्याने घेत नसल्याने रुग्णांची संख्या वाढत आहे. करोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, सॅनिटायझर वापरणे व शारीरिक अंतर पाळण्याचे निर्देश देण्यात आले असताना या सूचनांचे अनेक ठिकाणी पालन होत नसल्याने प्रशासनाने कारवाई करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक ठिकाणी किंवा दुकानात विना मास्क फिरणे, सोशल डिस्टन्सिंग न ठेवणे सॅनिटायझरचा वापर न करणे या करोनाच्या नियमांचा तालुक्यातील ग्रामस्थांकडून उल्लंघन होत असल्याचे प्रकर्षांने दिसून येत आहे. या कारणांमुळे करोना आटोक्यात येण्या ऐवजी त्याचे संक्रमण वाढत आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी करोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच त्यांची नावे सामाजिक आरोग्य शत्रू व करोना मित्र म्हणून नोटीस बोर्डावर जाहीरपणे प्रसिद्ध करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. त्यादृष्टीने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी कामाला लागले असल्याने लवकरच याचे परिणाम समोर येणार आहेत. दरम्यान करोना रोगापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क, सिनेटायझरचा वापर करावा व शारीरिक अंतर राखून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन गटविकास अधिकारी अशोक भवारी यांनी केेले आहे.