महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी बसेस राज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजूर, कामगारांच्या मदतीला धावत आहेत. आतापर्यंत ११ हजार ३७९ बसेसद्वारे सुमारे १ लाख ४१ हजार ७९८ स्थलांतरीत मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक यासारख्या राज्यांच्या सीमेपर्यंत या एसटी बसेस धावल्या आहेत.

यातील काही स्थलांतरीत मजुरांनी पुढील प्रवासासाठी श्रमिक रेल्वेचा पर्याय निवडला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून जसे इतर राज्यातील स्थलांतरीत मजूर आणि कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवले जात आहे तसेच इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना राज्यात आणण्याचे ही काम केले जात आहे.

श्रमिक रेल्वेने २ लाखाहून अधिक मजूर आपल्या राज्यात परतले
महाराष्ट्रात अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी सुरु केलेल्या श्रमिक रेल्वे सेवेच्या माध्यमातून आतापर्यंत १९१ रेल्वेगाड्यातून २ लाख ४५ हजार ०६० स्थलांतरीत कामगारांना सुखरूप त्यांच्या राज्यात पोहोचवण्यात आले आहे. परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्यात व्यवस्थित पाठविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांच्या तिकिटासाठी ५४ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला गेला आहे.

रोज धावताहेत २५ रेल्वेगाड्या
करोनाच्या प्रादुर्भावानंतर महाराष्ट्रात अडकलेल्या इतर राज्यातील कामगार आणि मजुरांना त्यांच्या गावी जायचं होतं. त्यांना सुखरूपपणे त्यांच्या राज्यात परतता यावे, त्यांचे हाल होऊ नयेत यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यास केंद्र शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आता राज्याच्या विविध शहरातून परराज्यातील स्थलांतरीत मजुरांसाठी आणि कामगारांसाठी रोज २५ रेल्वे गाड्या धावत आहेत. बिहार, राजस्थान, उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, झारखंड, आंध्रपदेश, ओरिसा, जम्मू या राज्यातील मजूर आता या श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून घरी परतू लागले आहेत. यात प्रामुख्याने उत्तरप्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेशच्या स्थलांतरीत मजुरांची संख्या अधिक आहे.