करोनाचा प्रभाव वाढत असल्याने लॉकडाउन जाहीर करण्यात आलं असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांचा नवा उच्चांक गाठला आहे. जिल्ह्यात एकाच दिवसात ४७ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्हा रूग्णालय १७, कळंबणी (खेड) १३, दापोली ग्रामीण रूग्णालय १२, कामथे (चिपळूण) उपजिल्हा रूग्णालय आणि संगमेश्वर ग्रामीण रूग्णालय प्रत्येकी २ आणि मंडणगड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. रत्नागिरी कारागृहातील आठ कैदी, दोन पोलीस, एक ज्येष्ठ पोलीस अधिकारी, एक खासगी डॉक्टराचाही यात समावेश आहे. काही दिवसांपूर्वी कारागृहातील एका पोलीस कर्मचार्‍याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्याच्याकडून इतरांना संसर्ग झाला असावा असा अंदाज आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ६६१ इतकी झाली आहे.

करोनाचा संसर्ग वाढल्यामुळे येत्या १ ते ८ जुलै हा आठवडाभर रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात पुन्हा कडक टाळेबंदी करण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली होती. दरम्यान रत्नागिरी पोलिस अधीक्षकांनाही करोनाची लागण झाली असून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चांगली असल्याचं सांगण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात ११ जणांना करोनाची बाधा झाली आहे.

८ जुलैपर्यंत असलेल्या या टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा किंवा वैद्यकीय गरजेव्यतिरिक्त सर्व व्यक्तींना घरातून बाहेर पडण्यास सक्त मनाई आहे . सर्व प्रकारची प्रवासी वाहतुक, दुचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहने बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा पुरवणारी दुकाने किंवा आस्थापना वगळून अन्य सर्व दुकाने आणि आस्थापना बंद राहणार आहेत .

सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमा होता येणार नाही. त्याचबरोबर, कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणी प्रवास करतेवेळी मास्कचा वापर बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी जाणे आवश्यक असल्यास किमान ६ फूट शारीरिक अंतर ठेवणेही आवश्यक आहे.

या टाळेबंदीच्या काळात जिल्ह्याच्या पाच सीमा सील करण्यात येणार असून आंबा घाट, कुंभार्ली घाट, कशेडी, हातीवले आणि म्हाप्रळ या ठिकाणी पोलिस पथके नेमण्यात आली आहेत. गेल्या तीन महिन्यांचा अनुभव लक्षात घेता, या ठिकाणी दोन पथके तैनात केली जाणार आहेत. मुंबईकडून येणाऱ्यांना कशेडीआधी एक किलोमीटर अंतरावर एक पथक राहणार आहे. हे पथक विनापास येणाऱ्या वाहनधारकांना परत पाठवण्यासाठी असून दुसरे पथक प्रवेश परवान्याची तपासणी करून वाहनधारकांना प्रवेश देण्यासाठी आहे.