News Flash

देवेंद्रजी, ही वेळ ‘ब्लेमगेम’ची नाही; फडणवीसांना अशोक चव्हाण यांचं उत्तर

काय केला होता फडणवीसांनी आरोप?

राज्यात करोनाचा संसर्गानं थैमान घातलं आहे. तर दुसरीकडं करोनाच्या उपाययोजनांवरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. करोनासंदर्भात काम करताना मंत्रिमंडळांमधील नेत्यांमध्ये विसंवाद असल्याची टीका केली होती. त्यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. ‘राज्यावर संकट असताना ही ‘ब्लेमगेम’ची वेळ नाही. नंतर निवडणुका लागल्यावर हे राजकारण करता येईल, आम्हीही उत्तरं देऊ,’ असं अशोक चव्हाण यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी एका मुलाखतीत माहिती दिली. यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केल्या जाणाऱ्या आरोपासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. मंत्रिमंडळातील नेत्यांमध्ये विसंवाद असल्याच्या फडणवीस यांच्या आरोपाला चव्हाण यांनी उत्तर दिलं. “मला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं आहे की, ही ब्लेमगेमची वेळ नाही. आपल्याला राजकारण करायला खूप वेळ आहे. करोनाचं संकट संपल्यावर ते करू. विधानसभा निवडणुका लागल्यावर ते करू. त्यावेळी आम्ही तुम्हाला उत्तरं देऊ. देशानं पाकिस्तानशी युद्ध केलं तेव्हा पूर्ण देश एकत्र होता. मोदींनी सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेतला, तेव्हा देश एकत्र होता. हा सुद्धा एक लढा आहे आणि एकत्रितपणे लढला पाहिजे, असं मला वाटतं. आम्हालाही काही गोष्टी दिसताहेत. कोण काम करत. कोण फक्त फोटो काढून व्हायरलं करतंय. पण, आम्ही काही बोलत नाही, कारण ही वेळ नाही. आता आपला दुश्मन करोना आहे. त्याच्याशी एकत्रितपणे लढणं गरजेचं आहे. त्यासाठी सकारात्मक सूचनांचं स्वागत आहे,’ असं अशोक चव्हाण म्हणाले.

उद्धव ठाकरे उत्तम प्रशासन सांभाळत आहेत –

मुख्यमंत्र्यांच्या कामाविषयी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले,’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्यवस्थित काम करत आहेत. ते कधीही मंत्री नव्हते, तरीही उत्तम प्रशासन सांभाळत आहेत. जर त्यांच्या कामात काही उणिवा राहिल्या तर त्या आम्ही भरून काढू. केंद्र सरकारकडून राज्याला देय असलेला जीएसटीचा परतावा आलेला नाही. सर्व उद्योगधंदे बंद आहेत. राज्याला पैशांची गरज आहे. जिल्ह्यांना या पैशातून मदत करता येईल, असंही चव्हाण यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 2:00 pm

Web Title: coronavirus lockdown ashok chavan reply to opposition leader devendra fadnavis bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ३ हजारांच्या पार, एकाच दिवशी वाढले १६५ पॉझिटिव्ह रुग्ण
2 Coronavirus: सोलापूरात एकाच दिवशी १० करोनाबाधित आढळले; नर्समुळे ९ जणांना लागण
3 करोना विरोधी लढाईचा गडचिरोली पॅटर्न!
Just Now!
X