News Flash

“करोना रूग्णांची आकडेवाडी कमी-अधिक दाखवून फायदा नाही”, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना पत्र

"मुंबईतील करोना चाचण्यांची संख्या ५० टक्क्यांहून कमी करण्यात आल्या आहेत"

राज्यात एकूण चाचण्यांची संख्या कायम ठेवताना मुंबईतील चाचण्यांची संख्या मात्र ५० टक्क्यांहून अधिक संख्येने कमी करण्यात आल्या आहेत आणि आता राज्यात कोरोनाबळींची संख्या झपाट्याने वाढत आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंबंधी पत्र लिहिलं आहे. मुंबईत मृत्यू प्रमाणपत्रात नैसर्गिक मृत्यू किंवा अन्य कारणे देण्यात येत असल्याच्या प्रकाराकडेही त्यांनी या पत्रातून लक्ष वेधलं आहे. १० हजार चाचण्यांची क्षमता असताना केवळ ३५०० ते ४००० चाचण्याच केवळ मुंबईत होत आहेत. करोना रूग्णांची आकडेवाडी कमी-अधिक दाखवून फायदा नाही, तर करोना प्रादुर्भावाला अटकाव आवश्यक आहे. असे केले तरच कोरोनाच्या वादळापासून आपली सुटका लवकर होणे शक्य आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, “१ मे २०२० रोजी महाराष्ट्रातील एकूण चाचण्यांमध्ये मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण हे ५६ टक्के होते. याचा अर्थ अर्ध्याहून अधिक चाचण्या या करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या मुंबईत होत होत्या. १५ मे २०२० रोजी हे प्रमाण ४०.०५ टक्क्यांवर आणण्यात आले आणि आता ३१ मे २०२० रोजीची आकडेवारी पाहिली तर एकूण महाराष्ट्रातील चाचण्यांच्या तुलनेत मुंबईतील चाचण्यांचे प्रमाण हे २७ टक्क्यांवर आले आहे. म्हणजेच पूर्वी होणार्‍या चाचण्यांपैकी ५० टक्क्यांहून कमी झाल्या आहेत. करोनाचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या मुंबईत चाचण्यांची कमी होणारी संख्या ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. एकीकडे चाचण्यांची संख्या कमी होणे आणि दुसरीकडे करोनाबळींच्या संख्येने नवीन उच्चांक गाठले जात आहेत. २७ मे २०२० रोजी त्या कालखंडापर्यंतच्या सर्वाधिक १०५ बळींची नोंद झाली होती. २९ मे २०२० रोजी ही संख्या ११६ वर पोहोचली आणि आता ३ जून २०२० रोजी तर १२२ बळी असा नवीन उच्चांक स्थापित झाला. मुंबईच्या बाबतीत विचार केला तर आतापर्यंतचे सर्वाधिक ६४ बळी ३० मे रोजी गेले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून प्रत्येकी ४९ बळी एकट्या मुंबईत आहेत”.

“दुसरीकडे अनेकांच्या मृत्यू प्रमाणपत्रातून ‘करोना’ किंवा ‘करोना संशयित’ हा शब्द वगळण्यात आल्याचे सुद्धा अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. भांडुपमधील एक ६५ वर्षीय वृद्ध आत्माराम मोने, विलेपार्ले येथील ४१ वर्षीय इसम यांची उदाहरणे आपल्यापुढे आलीच आहेत. परिणामी त्यांच्या अंत्यसंस्कारांमध्ये लोकांची गर्दी आणि त्यातून करोना पसरल्यास संभाव्य धोके अतिशय गंभीर आहेत. काल मुंबई निसर्ग वादळातून वाचली. एनडीआरएफ, एसडीआरएफ यासारख्या संस्थांनी अतिशय चांगल्या समन्वयातून स्थिती हाताळली. ते सारेच कौतुकास पात्र आहेत. पण, करोनाच्या घोंघावत असलेल्या वादळाची सुद्धा आपल्याला तितक्याच गांभीर्याने दखल घ्यावी लागेल,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- राज्यात ५०० डॉक्टरांना करोनाचा संसर्ग; सायन रुग्णालयातील संख्या सर्वाधिक

“मुंबईत चाचण्यांची संख्या वाढवावीच लागेल. करोना बळी स्पष्टपणे दर्शविले, तरच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण होईल आणि परिणामी करोना आणखी पसरण्यापासून रोखेल. मुंबईमध्ये चाचण्या वाढविण्याचा आग्रह असण्याचे आणखी एक कारण म्हणजे, १ मे ते २४ मे दरम्यान झालेल्या चाचण्यांमध्ये पात्र नमुन्यांपैकी युनिक पॉझिटिव्ह नमुने ३२ टक्के तर ३१ मे रोजी ते जवळपास ३१ टक्के आहे. जेव्हा संक्रमणाचा दर इतका अधिक असतो, तेव्हा नमूने तपासणी पूर्वीपेक्षा किमान दोन पटींनी वाढविणे आवश्यक असते. येथे मात्र ते ५० टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी करण्यात आले आहेत. मात्र, १० हजार चाचण्यांची क्षमता असताना केवळ ३५०० ते ४००० चाचण्याच केवळ मुंबईत होत आहेत. करोना रूग्णांची आकडेवाडी कमी-अधिक दाखवून फायदा नाही, तर करोना प्रादुर्भावाला अटकाव आवश्यक आहे. असे केले तरच कोरोनाच्या वादळापासून आपली सुटका लवकर होणे शक्य आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2020 5:01 pm

Web Title: coronavirus lockdown bjp devendra fadanvis letter to cm uddhav thackeray sgy 87
Next Stories
1 #MissionBeginAgain: ठाकरे सरकारकडून ‘या’ सहा गोष्टींवरील निर्बंध शिथील
2 मुदत संपलेल्या दीड हजार ग्रामपंचायतींवर नेमणार प्रशासक; मंत्रिमंडळाचा निर्णय
3 Unlock 1.0 : दुकानं उघडण्यास राज्य सरकारची सशर्त परवानगी; नवी नियमावली जाहीर
Just Now!
X