29 October 2020

News Flash

औरंगाबाद रेल्वे दुर्घटना: मृत मजुरांच्या कुटुंबाला प्रत्येकी पाच लाखांची मदत, उद्धव ठाकरेंची घोषणा

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेत १६ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेत १६ मजुरांची दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख मुख्यमंत्री सहायता निधीतून देणार असल्याची घोषणा केली आहे. जालना येथे काम करणारे मजूर भुसावळकडे चालत प्रवास करत असताना थकून रुळावर झोपल्याने त्यांच्या अंगावरून मालगाडी गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादजवळील करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात पहाटे सव्वा पाचच्या सुमारास घडला.

मजुरांच्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही दिले आहेत. परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

“गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागातून विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहे. त्यातून सुमारे एक लाख लोक आपापल्या गावी सुखरूप पोहचले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत राज्यात अडकलेले सर्व श्रमिक व्यवस्थित त्यांच्या घरी पोहचतील असे नियोजन झाले असून रेल्वेशी सातत्याने समन्वय सुरु आहे. नुकतीच मुंबईहून रेल्वे सोडण्याचा निर्णयही झाला असून त्यामुळेही अनेक मजूर घरी परततील. मात्र जीवावर उदार होऊन, स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका,” असं आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी केले आहे

“परराज्यातील सर्व मजुरांची निवारा व्यवस्था त्या त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने केली आहे. त्याठिकाणी अगदी  शेवटचा मजूर घरी जात नाही आम्ही त्यांची जेवणाची आणि वैद्यकीय उपचाराची सोय करतो आहोत, त्यामुळे आपली निवारा केंद्रे सोडून लगेच बाहेर पडू नका. रेल्वेच्या वेळापत्रकाविषयी आपल्याला रेल्वे व सरकारमार्फत व्यवस्थित माहिती दिली जाईल,” असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- धक्कादायक! औरंगाबादमध्ये १६ मजूरांचा मालगाडीखाली चिरडून मृत्यू

दरम्यान लोको पायलटने ट्रॅकवर कामगारांना पाहिल्यानंतर मालगाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने दुर्घटना घडली अशी माहिती रेल्वेने दिली आहे. “कामगारांना ट्रॅकवर पाहिल्यानंतर लोको पायलटने मालगाडी थांबवण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने बदनापूर आणि करमाड स्थानकांदरम्यान दुर्घटना घडली. जखमींना औरंगाबाद सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत,” अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

आणखी वाचा- “स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका”, औरंगाबाद दुर्घटनेनंतर उद्धव ठाकरेंचं भावनिक आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशात जाण्यासाठी जालन्यातील स्टील उद्योगात काम करणाऱ्या कामगारांनी पायी चालत जाण्याचा निर्णय रात्री घेतला. करमाडपर्यंत आल्यानंतर थकल्यामुळे ते रुळावर झोपले. यावेळी जालनाकडून येणाऱ्या मालवाहतूक रेल्वेखाली सापडल्यामुळे १६ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मजुरांची नावे आणि अपघाताचे इतर तपशील अद्याप समजू शकलेले नाही.

आणखी वाचा- “शक्य ती सर्व मदत करु”, औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली असून शोक व्यक्त केला आहे. तसंच रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “औरंगाबादमध्ये रेल्वे अपघातामुळे झालेल्या मृत्यूंमुळे आपण दु:खी आहोत. मी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यासोबत चर्चा केली असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शक्य ती सर्व मदत दिली जाणार आहे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 11:45 am

Web Title: coronavirus lockdown cm uddhav thackeray announce five lakh help to victims of aurangabad railway accident sgy 87
Next Stories
1 औरंगाबादला करोनाचा विळखा; २४ तासांत ९० जणांना संसर्ग, रुग्णसंख्या ४६८
2 “शक्य ती सर्व मदत करु”, औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल
3 औरंगाबाद दुर्घटना: कामगार रुळावर झोपलेले पाहून मालगाडी थांबवण्याचा केला होता प्रयत्न, रेल्वेची माहिती
Just Now!
X