धवल कुलकर्णी

राज्य शासन करोनाच्या संकटाचा मुकाबला करत असताना, मंत्री व प्रशासन यांच्यामधील समन्वयाचा अभाव आणि प्रशासनामधील त्रुटीमुळे हे प्रयत्न तोकडे पडत असल्याची कबुली काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.

“बर्‍याचदा गोंधळ होत आहे. कधीकधी नीट समन्वय साधला जात नाही. प्रत्यक्ष वस्तुस्थिती आणि नियमावली याच्यामध्ये अंतर आहे. सरकार काम करत आहे पण प्रशासन मात्र नियमावर बोट ठेवून गडबड करते. प्रशासन आणि मंत्री यांच्यात एकवाक्यता नाही हे मान्य करावे लागेल,” असे राऊत म्हणाले.

पुढे त्यांनी सांगितले की, “रेशनचे धान्य जरी वितरित करण्यात येत असले तरीसुद्धा यामध्ये अनेक सुधारणांची गरज आहे. त्याबाबत मी सरकारला पत्र लिहीत आहे. एनडीआरएफच्या नियमांप्रमाणे तयार अन्न द्यावं असं असलं तरी सुद्धा अनेक लोकांची अशी मागणी आहे की आम्हाला शिजवलेले जेवण न देता धान्याची कीट देण्यात यावेत. जेणेकरून आम्ही स्वतःचे जेवण घरीच बनवू”.

त्याचबरोबर डॉक्टरांच्या अशा तक्रारी आहेत की त्यांना स्वतःच्या सुरक्षेसाठी पीपीई कीट मिळाले नाहीत. पत्रकारांच्या सुरक्षेचे प्रश्न सुद्धा आहेत. यापैकी बहुतेक प्रश्न मार्गी लागले आहेत तर उर्वरित प्रश्न मार्गी लावण्याच्या बेतात आम्ही आहोत अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे.