देशात करोनाचा उद्रेक झालेला असताना आयोजित करण्यात आलेल्या तबलिकी मरकजवर देशभरातून टीका होऊ लागली आहे. २५ जणांना करोनाची लागण झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला होता. त्यानंतर केंद्र आणि दिल्ली सरकारनं तातडीनं कारवाई करत ही जागा रिकामी केली होती. या घटनेवर अभिनेता आदिनाथ कोठारे यानेही नाराजी व्यक्त केली आहे. ‘सध्याच्या स्थितीत असं काही करणं म्हणजे देशावर दहशतवादी हल्ला करण्यासारखंच आहे,’ अशा शब्दात त्याने नाराजी बोलून दाखवली आहे.

दिल्लीत झालेल्या तबलिकी मरकजच्या कार्यक्रमात देशभरातून मुस्लिम नागरिक सहभागी झाले होते. यात विदेशी नागरिकांचाही समावेश होता. जवळपास ८ हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यातील काही जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर देशभरातून यावर टीका होत आहे.

या घटनेवर अभिनेता आदिनाथ कोठारे आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘आजच्या परिस्थितीत गर्दी जमा होईल असे कार्यक्रम आयोजित करणे हे एक प्रकारे देशावर दहशतवादी हल्ला करण्यासारखेच आहे. मग ते धार्मिक असो की अधार्मिक. इतकं बेजबाबदार वागल्याबद्दल आपल्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. कृपा करा, घरी थांबा,” असं त्यानं म्हटलं आहे.

“यापेक्षा चांगली दुसरी जागा नाही”

धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करत नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आणि करोनाचा फैलाव करणाऱ्या दिल्लीमधील निजामुद्दीन मरकजचे प्रमुख मौलाना साद फरार आहेत. पोलिसांनी एफआयआर दाखल केल्यानंतर मौलाना साद फरार आहेत. इंडिया टुडेकडे ती ऑडिओ क्लिप आहे. “मशिदीत एकत्र गोळा झाल्यामुळे तुम्ही मरणार असे तुम्हाला वाटत असेल तर, मी तुम्हाला सांगेन कि, यापेक्षा दुसरी चांगली जागा असू शकत नाही” असे या कथित ऑडिओ क्लिपमध्ये मौलाना साद यांनी म्हटले आहे.