– संदीप आचार्य / निशांत सरवणकर

दिनेश बारचा नियमित ग्राहक होता… करोनामुळे लॉकडाऊन झाल्यापासून त्याचे दारू पिणे बंद झाल्याने तो कमालीचा अस्वस्थ झाला होता. अखेर हिंमत करून तो नेहमीच्या बारपाशी गेला. तेथे आसपास घुटमळत असलेल्या बारच्या कर्मचाऱ्याने दिनेशला बरोबर हेरले आणि  बारमागच्या किचनकडे येण्याचा इशारा केला. १३०० रुपयांच्या ब्लेंडर प्राईडसाठी तब्बल ३,५०० रुपये मोजून तो अखेर ‘ सोय’ झाली म्हणत खुशीत घरी गेला. अशी अनेक पिअक्कड मंडळी दारूसाठी हवी तेवढी रक्कम मोजून वेगवेगळ्या ठिकाणच्या बारमधून दारू खरेदी करीत लॉकडाऊन ‘साजरा’ करीत आहेत. लॉकडाऊनमुळे वाईन शॉप व बार बंद झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी हातभट्टीचा धंदाही पुन्हा जोरात सुरू झाला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून सर्वात जास्त अडचण होत आहे ती तळीरामांची! घसा ‘ओला’ करण्यासाठी हे तळीराम कितीही रक्कम मोजायला तयार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस कितीही लक्ष ठेवून असले तरी त्यांचा डोळा चुकवून चौपट दराने  मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यात अनेक ठिकाणी दारुची विक्री सर्रास सुरू आहे. ब्लेंडर प्राईड, रॉयल स्टॅग,ओल्ड मंकपासून ब्लॅक लेबल व रेड लेबलच्या दारुच्या बाटल्या किमान चौपट दराने विकल्या जात आहेत. वाईन शॉपमध्ये साडेतीन हजार रुपयांना मिळणारी ब्लॅक लेबल आज १२ हजार रुपयांना विकली जात आहे.

साधारणपणे ६०० ते १३०० रुपयांना मिळणाऱ्या  दारुच्या बाटल्या दीड हजारापासून साडेचार हजार रुपये किमतीला मिळत आहेत. ब्लॅक लेबल व रेडलेबलपासून सिंगल माल्टच्या दारूसाठी तळीराम हवे ते दर मोजायला तयार आहेत. विक्री करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या बारमधील मंडळी करताना दिसतात. त्यातही दमणमधून बनावट दारू वेगवेगळ्या कसरती व करामती करून आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. एका ठिकाणी रिकाम्या गॅस सिलिंडरचा तळ कापून त्यामध्ये दारुच्या बाटल्या लपवून आणल्याचे दिसून आले. आता सरकारने शेतमाल, अंडी, मांस आदींच्या विक्री व वाहतुकीला परवानगी दिल्याने बेकायदेशीर दारू वाहतुकीला रोखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

दमण तसेच राज्याबाहेरून येणारी दारुची वाहतूक रोखण्यासाठी सर्व चेकनाके तसेच महत्वाच्या ठिकाणी आमची भरारी पथके लक्ष ठेवून असल्याचे उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांनी सांगितले. आमच्यापुढे आज खरे आव्हान आहे ते हातभट्टी दारुचे.  यापूर्वी हातभट्टी दारूने अनेकांचे बळी घेतले आहेत. लॉकडाऊनमुळे मद्यविक्रीची सर्वच दुकाने तसे बार बंद झाल्याचा फायदा घेत अनेक ठिकाणी हातभट्टीचा धंदा सुरू झाला आहे. यातूनच उद्या विषारी दारुचे बळी पडू शकतात हे लक्षात घेऊन आम्ही हातभट्टीची दारू बनविणऱ्याविरुद्घ जोरदार कारवाई सुरू केल्याचेही उमप यांनी सांगितले. आतापर्यंत  ७१५ गुन्हे दाखल केले असून जवळपास दोन कोटी रुपये किमतीची दारू जप्त केली आहे. २७७ लोकांना याप्रकरणी अटकही करण्यात आली असून पोलिसांच्या सहकार्याने कारवाईचा वेग वाढवला जाईल, असेही आयुक्तांनी सांगितले.

उत्पादन शुल्क विभाग जरी कारवाई करत असले तरी चौपट दराने मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसारख्या शहरी भागात दारुची चौपट ते दहापट दराने विक्री होत आहे. दारुबरोबरच सिगारेट व तंबाखूची विक्री मागच्या दाराने जोरात सुरू आहे. २०० ते ४०० रुपयांना सिगारेटचे एक पाकिट विकले जात आहे तर तंबाखूची  सात रुपयाला मिळणारी ओमपुडी वा गायछाप पुडी शहरी भागात ३० ते ४० रुपयांना विकली जात आहे.

तळीराम दारूसाठी हवी ती किंमत मोजायला तयार असल्याने धोका पत्करून अनेक ठिकाणी दारुची विक्री केली जात आहे. लॉकडाऊनमुळे  पोलीस बंदोबस्तात अडकल्याचे लक्षात घेऊन जागोजागी स्थानिक झोपडपट्टी दादांनी तसेच ग्रामीण भागात हातभट्टी बनविण्याचे काम जोरात सुरू झाले आहे.