करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन अजून दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. यामुळे लॉकडाउनचा कालावधी वाढला असून १७ मे पर्यंत लॉकडाउन सुरु राहणार आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना झोनप्रमाणे निर्बंध शिथील करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी रेड झोनमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये कालावधी वाढवण्याचेही सुतोवाच दिले होते.

“रेड झोन म्हणजे जागृत ज्वालामुखी, ऑरेंज झोन म्हणजे निद्रिस्त ज्वालामुखी आणि ग्रीन झोन म्हणजे तो ज्लालामुखी पुन्हा पेटेल असं वाटत नाही. पण ग्रीन झोनमध्ये जर कोणी करोना रुग्ण आला तर पुन्हा हाहाकार माजू शकतो. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. “ऑरेंज झोनमध्ये म्हणजे जिथे संख्या वाढत नाही आहे पण अजूनही रुग्ण आहेत तिथे काही परिसर सोडले तर उरलेल्या जिल्ह्यात काय सुरु करु शकतो याचा निर्णय झाला आहे. ग्रीन झोनमध्ये आपण आधीच शिथिलता आणत आहोत,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

३ मे नंतर झोनप्रमाणे मोकळीक देऊ, मात्र घाई-गडबड करू नका असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. यानिमित्ताने राज्यातील कोणता जिल्हा कोणत्या झोनमध्ये येतो हे आपण जाणून घेऊयात.

रेड झोन (१४) :
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, पालघर, नाशिक, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव

ऑरेंज झोन (१६) :
रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड

ग्रीन झोन (६) :
उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा