News Flash

मद्यप्रेमींची प्रतिक्षा वाढली, घरपोच मद्यविक्री एक दिवस लांबणीवर

मद्यविक्रीची होम डिलिव्हरी करण्यास म्हणजेच घरपोच सेवा पुरवण्यास महाराष्ट्र सरकारने सशर्त संमती दिली आहे

संग्रहित छायाचित्र

घरपोच मद्यविक्री करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मद्यप्रेमींना दिलासा मिळाला आहे. मात्र ही सेवा घेण्यासाठी त्यांना अजून एक दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. गुरुवारी म्हणजे १४ तारखेला सकाळी १० वाजल्यापासून ही सेवा सुरु कऱण्यात येणार होती. पण आता हा निर्णय एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना आता १५ तारखेची वाट पहावी लागणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी १४ तारखेला सकाळी १० वाजल्यापासून मद्याची घरपोच सेवा देण्यास सुरुवात होईल अशी माहिती दिली आहे. मात्र आता नव्याने देण्यात आलेल्या माहितीनुसार, क्षेत्रिय स्तरावरील अधिकाऱ्यांकडून आदेशाची अमलबजावणी करण्यासाठी डिलिव्हरी बॉय मिळवणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करणे, ओळखपत्र देणे अशा प्राथमिक तयारीसाठी आणखी एक दिवस लागेल असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आदेशाची अमलबजावणी १४ तारखेऐवजी १५ तारखेला सकाळी १० वाजल्यापासून करण्यात येणार आहे.

मद्यविक्रीची होम डिलिव्हरी करण्यास म्हणजेच घरपोच सेवा पुरवण्यास महाराष्ट्र सरकारने सशर्त संमती दिली आहे. लॉकडाउनमध्ये जीवनावश्यक सेवा वगळता सारी दुकानं बंद करण्यात आली. मात्र केंद्र सरकारने ३ मेनंतर दिलेल्या निर्देशांनुसार काही सेवा सुरु करण्यात आल्या. ज्यामध्ये मद्यविक्रीचा परवाना असलेली दुकानं उघडण्याची सशर्त संमती देण्यात आली. मात्र त्या अटींचं उल्लंघन होऊ लागल्याने मुंबई-पुणे आणि इतर शहरांमध्ये मद्यविक्री बंद करण्यात आली. आता राज्य शासनाने मद्याची घरपोच डिलिव्हरी देण्यासाठी सशर्त संमती दिली आहे.

मात्र यावेळी काही अटी आणि शर्थीही लागू करण्यात आल्या आहेत. “फक्त परवाना असणाऱ्या मद्य दुकानांना ही सेवा देता येणार आहे. सोबतच ज्यांच्याकडे परमिट आहे त्यांनाच ही सेवा घेता येणार आहे. याशिवाय घरपोच सेवा देण्याची जबाबदारी मद्य दुकानाच्या मालकावर असणार आहे. सोबतच डिलिव्हरी बॉयची वैद्यकीय तपासणी आवश्यक असणार आहे,” अशी माहिती कांतीलाल उमाप यांनी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परमिट ऑनलाइन मिळेल याची सुविधाही उपलब्ध असल्याचं कांतीलाल उमाप यांनी सांगितलं आहे.

“डिलिव्हरी करणाऱ्यांना ओळखपत्र दिलं जाणार असून बंधनकारक असणार आहे. यासाठी मद्य दुकानदारांनी डिलिव्हरीसाठी पाठवण्यात येणाऱ्यांची माहिती देणं आवश्यक आहे,” अशी माहिती कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, कंटेनमेंट तसंच रेड झोनमध्ये ही सेवा मिळणार नाही. ज्या जिल्ह्यात दुकानं उघडी आहेत तिथेच ही सेवा लागू होणार आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद यांसारख्या रेड झोनमध्ये ही सेवा मिळणार नसल्याचं कांतीलाल उमाप यांनी सांगितलं आहे. काही जिल्ह्यात मद्याची दुकाने उघडलेली नाही, तिथे ही सेवा सुरु करता येणार नाही. “स्थानिक प्रशासनाने वेगळा निर्णय़ घेतला तर त्याठिकाणी ही सेवा सुरु करता येईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. सदर आदेशात बदल करण्याचा किंवा तो मागे घेण्याचा अधिकार हा राज्य सरकारकडे असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 4:22 pm

Web Title: coronavirus lockdown maharashtra liquor home delivery sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मालेगाव : कर्तव्यात कसूर करणाऱ्या ४७ प्रशासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
2 ट्रकमधून १०० माणसं नेतात मग खासगी बससाठी नियम का? मनसेचा अनिल परब यांना सवाल
3 सातारा : दारूसाठी मद्यप्रेमी भर उन्हात रांगेत, दुकानदाराने उधळली फुलं
Just Now!
X