News Flash

केसांसोबत खिशालाही कात्री लागणार, महाराष्ट्र सलून असोसिएशनचा दुप्पट दरवाढीचा निर्णय

केस कापण्यासाठी आणि दाढीसाठी मोजावे लागणार दुप्पट पैसे

याशिवाय लॉकडानमध्ये शिथीलता देत २८ जूनपासून सलून, ब्युटी पार्लर सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे सलून चालक आणि ब्युटी पार्लर्सना काही ठराविक गोष्टींसाठीच परवानगी दिली आहे. यामध्ये केस कापणे, केसांना डाय करणे, वॅक्सिंग यांनाच परवानगी आहे. त्वचेला स्पर्श होईल अशा सेवा देण्यावर निर्बंध आहे. (संग्रहित: Express Photo)

लॉकडाउनमुळे पुरुषांचे वाढलेले केस आणि दाढी असं चित्र घराघरात पहायला मिळत आहे. लॉकडाउन उठल्यानंतर सर्वात आधी जाऊन केस कापणारं असं वाक्य आज प्रत्येक पुरुषाच्या तोंडी आहे. पण लॉकडाउननंतर केस कापण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी तुम्हाला दुप्पट, तिप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. कारण लॉकडाउनमुळे आर्थिक फटका बसल्याने महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आपला जुना लूक पुन्हा मिळवण्यासाठी खिशालाही थोडी कात्री लावावी लागणार आहे.

लॉकडाउनचा सर्वच क्षेत्रांना खूप मोठा फटका बसला आहे. यामुळे लॉकडाउन उठवल्यानंतर जेव्हा सर्व काही सुरळीत होईल तेव्हा विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा एकदा व्यवस्थित करण्याचं आव्हान सर्व क्षेत्रावंर असणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने दाढी-कटिंगसह इतर सेवांचा दर तब्बल दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सलून, ब्युटी पार्लर बंद ठेवण्यात आली आहे.

नवा दर काय असणार ?
महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनने केलेल्या दरवाढीनुसार, आता केस कारण्यासाठी १०० ते १२० रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी केस कापण्यासाठी ६० ते ८० रुपये दर होता. तर दाढी करण्यासाठी जिथे आधी ४० ते ५० रुपये मोजावे लागत होते तिथे ८० रुपये मोजावे लागणार आहेत.

सलून जेव्हा सुरु होतील तेव्हा त्यांनाही करोनाची लागण होऊ नये यासाठी सुरक्षेची पुर्ण खबरदारी घ्यावी लागणार आहे. पीपीई किट तसंच इतर साहित्य खरेदी करावं लागणार असल्याने त्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. यासोबत अनेक सलून हे भाड्याच्या ठिकाणी सुरु असल्याने त्याचा आर्थिक भारदेखील त्यांच्यावर असणार आहे. यामुळेच हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र सलून आणि पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिद यांनी सांगितलं आहे की, “काही भागांमध्ये सलून सुरु झाले असले तरी खर्चही खूप आहे. त्यात सुरक्षेसाठी पीपीई किट घ्यायचं आहे. सॅनिटायजिंगची व्यवस्थाही करावी लागणार आहे. वाढणारा खर्च लक्षात घेता दुप्पट दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या तीन महिन्यांपासून सलून व्यवसाय अडचणीत असून आर्थिक आव्हानं आहेत. लोकांनी सहकार्य करावं तसंच ज्या भागांमध्ये सलून बंद आहेत तिथे सुरु कऱण्यास सरकारने परवानगी द्यावी अशी आमची विनंती आहे”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 5:11 pm

Web Title: coronavirus lockdown maharashtra salon and parlor association to double the rate sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ३ जून रोजी मुंबई, पश्चिम किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता : IMD
2 ठाकरे सरकारचा मराठी बाणा; सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा अनिवार्य
3 “जे परीक्षा न देताच मुख्यमंत्री झाले त्यांनी…;” निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
Just Now!
X