News Flash

खासगी रुग्णालयात होणारी रुग्णांची लूटमार थांबवण्यासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना भरमसाट बिलं देऊन लूटमार केल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत

संग्रहित

राज्यात एकीकडे करोनाचे रुग्ण वाढत असताना काही खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना भरमसाट बिलं देऊन लूटमार केल्या जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत राज्य सरकारकडे हा ताबा असणार आहे. याशिवाय राज्य सरकारने उपचार खर्चाची मर्यादाही ठरवून दिली आहे.

रात्री उशिरा राज्य सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे. यानुसार खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटांचा ताबा तसंच रुग्णाला किती बिल आकारलं जाणार हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारकडे असणार आहे. दरम्यान २० टक्के खाटांसाठी दर आकारण्याचा अधिकार रुग्णालयांकडे राहणार आहे

निर्णयानुसार वॉर्ड, विलगीकरण बेडसाठी चार हजार रुपये आकारले जाणार आहे. तसंच व्हेंटिलेटरशिवाय असणाऱ्या आयसीयू बेडसाठी ७५०० तर व्हेंटिलटर सपोर्ट असणाऱ्या आयसीयू बेडसाठी ९००० रुपये आकारले जाणार आहेत. याशिवाय राज्य सरकारने इतर २७० प्रक्रिया आणि शस्त्रक्रियांसाठीचे दरही ठरवले आहेत. यामध्ये कॅन्सर उपचाराचाही समावेश आहे. यामध्ये डॉक्टरांच्या फीचाही समावेश असणार आहे. हॉस्पिटलची तयारी असेल तर ते अतिरिक्त रक्कम डॉक्टरांना देऊ शकतं.

धर्मदाय विश्वस्तांकडून चालवल्या जाणाऱ्या सर्व रुग्णालयांचा या निर्णयात समावेश असणार आहे. प्रसूतीसाठी रुग्णालयं ७५ हजारापेक्षा जास्त बिल आकारु शकत नाही. तर सिझर असेल ८६,२५० पर्यंत बिल आकारु शकतं. गुडघ्याच्या ऑपरेशनसाठी १ लाख ६० हजार रुपये तर अँजिओग्राफीसाठी रुग्णालय १२ हजारापेक्षा जास्त बिल आकारु शकत नाही. अँजिओप्लास्टी करण्यासाठी १.२ लाखांपेक्षा जास्त बिल आकारलं जाऊ शकत नाही असं आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान रुग्णांवर उपचार करताना दर्जा काय राखला जावा असंही आदेशात सांगण्यात आलं आहे. राज्यात सध्या करोनाचे ४१ हजाराहून अधिक करोना रुग्ण असून एकट्या मुंबईत २५ हजार रुग्ण आहेत.

करोनाच्या लढाईत खासगी रुग्णालयांना सहकार्य करण्याची विनंती वारंवार सरकारकडून करण्यात येत होती. तथापि त्यांचे सहकार्य मिळणे तर दूरच बहुतेक पंचतारांकित रुग्णालयांनी करोनाच्या दोन महिन्यात रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूटमार केल्याच्याच तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेऊन आजपर्यंत संबंधित रुग्णालयांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. विधानसभेचे विरोधी पक्षनेत देवेंद्र फडणवीस तसेच विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या लुटमारीविरोधात आवाज उठवला आहे. भाजपा नेते किरिट सोमय्या यांनीही काही रुग्णालयातील प्रकरणे बाहेर काढली असली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 3:15 pm

Web Title: coronavirus lockdown maharashtra takes control of 80 percent of private hospital beds sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 टि्वटरवॉर: #महाराष्ट्रद्रोहीBJP विरुद्ध #MaharashtraBachao हॅशटॅगद्वारे नेटकरी भिडले
2 नालासोपाऱ्यात मासे पकडण्यासाठी तलावात उतरलेले तीन जण बुडाले
3 पालघर : दांडी नवापूर खाडीत आढळले हजारो मृत मासे
Just Now!
X