लॉकडाउन शिथील झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये १५ जून २०२० पासून ऑनलाइन तसंच डिजिटल माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यास मान्यता दिली आहे. तर करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसंच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान शाळा सुरु झाल्यानंतर शाळेत करोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला तर काय करायचं ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

राज्य सरकारकडून नियमासंबंधी नियमावली जाहीर करण्यात आली असून यामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यानुसार, भविष्यात करोनाचा रुग्ण आढळल्यास किंवा इतर कारणांमुळे शाळा बंद करावी लागल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होणार नाही यासाठी ऑनलाइन शिक्षणाचे नियोजन करावे असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे.

आणखी वाचा- “एकवेळ शाळा सुरू झाल्या नाही तरी…”; मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाला दिल्या महत्त्वाच्या सूचना

आरोग्य विभागावरही विद्यार्थांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आरोग्य विभागाने आवश्यकतेप्रमाणे शिक्षकांचे आणि मुलाचे थर्मल स्क्रिनिंग, वैद्यकीय तपासणी करुन घेण्यासाठीचे नियोजन करावे. किमान पाच ते कमाल १० शाळांकरिता फिरते आरोग्य तपासणी केंद्र कार्यरत ठेवावे असे निर्देश देण्यात आले आहेत.

आणखी वाचा- राज्यात पुढील महिन्यापासून शाळा सुरु, असं असेल प्रत्येक वर्गाचं टाइमटेबल

ग्राम करोना प्रतिबंधक समिती, शिक्षकांवर मोठी जबाबदारी
शाळा सुरु करण्यासाठी आता सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समित्यांची सभा आयोजित केली जाईल, गावांमधील कोविड प्रतिबंध समिती तसेच स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल, शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाण्याची सोय आदी कामे केली जातील. गटागटाने पालक सभा घेऊन पालकांच्या मनातली भीती कमी करण्यात येईल. बाल रक्षक व शिक्षकांनी शाळाबाह्य होण्याची शक्यता असलेल्या तसेच स्थलांतरितन मजुरांच्या मुलांच्या घरी जाऊन त्यांचे मन वळवायचे आहे, सरल प्रणाली अद्ययावत करणे व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक भरणे, ग्राम पंचायतीच्या मदतीने टीव्ही, रेडीओ यांची व्यवस्था करणे जेणे करून कुठलीच सोय नसलेल्या मुलांना शिक्षणासाठी याची मदत होईल, गुगल क्लास रूम, वेबिनार डिजिटल प्रायोगिक तत्वावर सुरु करणे, ई शैक्षणिक साहित्य निर्मिती, सायबर सुरक्षा, दीक्षा मोबाईल अॅपचा उपयोग, शाळेच्या स्पीकरवरून विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती देत राहणे अशा बाबींवर चर्चा झाली.