News Flash

“लॉकडाउनआधी महाराष्ट्रात काय दारुबंदी होती का?”, शिवसेनेच्या टीकेला राज ठाकरेंचं प्रत्युत्तर

मद्यविक्रीलाही परवानगी देण्याचा विचार करावा अशी मागणी राज ठाकरेंनी केल्यानंतर शिवसेनेकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती

लॉकडाउन जाहीर करण्याआधी महाराष्ट्रात दारुबंदी होती का ? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला केला आहे. राज ठाकरे यांनी राज्यात मद्यविक्रीची दुकाने सुरु करावीत अशी मागणी केल्यानंतर शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेला राज ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या टीकेला उत्तर देताना म्हटलं आहे की, “काही जणांना वाटलं की मी तळीरामांची बाजू घेतली. यामध्ये तळीरामांचा काय संबंध येतो. प्रश्न असा आहे की तुमच्याकडे तात्काळ पैसे कुठून येणार आहेत. काय मार्ग आहेत तुमच्याकडे ? हाच मार्ग आहे दुसरा कोणताच पर्याय नाही. याऐवजी कारखाने उघडा सांगतायत….मग उघडा. मी काही दारुचे गुत्थे सुरु करा सांगितलं नाही. महाराष्ट्रात लोकांना तुम्ही परवाने दिले आहेत. महाराष्ट्रात लॉकडाउनच्या आधी दारुबंदी नव्हती. ही दुकानं सुरुच होती. हे खातं किती महत्त्वाची आहे ते संबंधितांना माहिती आहे. राज्याने या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे”.

टाळेबंदीमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्य चालवण्यासाठी महसुलाची गरज असून, नियमांचे पालन करून मद्यविक्रीलाही परवानगी देण्याचा विचार करावा असं राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. शिवसेनेने राज ठाकरेंच्या मागणीवर प्रश्न उपस्थित करत ही जी रंगीत-संगीत मागणी केली त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? की ‘तळीरामां’च्या कोरडय़ा घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली? अशी विचारणा केली होती.

राज ठाकरे यांनी यावेळी महाराष्ट्रासमोर खूप मोठं आर्थिक संकट उभं राहणार असल्याचं सांगितलं आहे. नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, मालिका हे सुरु होणार की नाही. लोक थिएटरमध्ये जाणार आहे की नाही. करोनाबद्दल बोलताना त्याच्या भोवतालचा विचारही केला पाहिजे असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 5:31 pm

Web Title: coronavirus lockdown mns president raj thackeray on liquor sale shivsena sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “आम्ही पुन्हा येऊ हा प्रयत्न फसला”, जयंत पाटलांचा विरोधकांना टोला
2 “उद्धव ठाकरेंचे ते शब्द ऐकून समाधान वाटले”, लतादीदींनी व्यक्त केल्या भावना
3 गडचिंचले हत्याकांड प्रकरणी आणखी पाच आरोपींना अटक
Just Now!
X