News Flash

“तोच तणाव, गडबड आणि दबाव….जणू माझीच अंतिम वर्षाची परीक्षा होती”

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर राज्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना

करोनापासून कधी मुक्तता मिळेल, याबाबत अनिश्चिततेचा फटका पदवी-पदव्युत्तरच्या अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना बसू नये, यासाठी परीक्षांऐवजी आतापर्यंत मिळवलेल्या गुणांची सरासरी काढून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबली तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती होती. त्यामुळे अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना त्यांनी आतापर्यंतच्या सत्रांत (सेमिस्टर) मिळवलेल्या गुणांची सरासरी काढून उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. ज्या विद्यार्थ्यांना श्रेणी वाढवण्यासाठी परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये परीक्षा घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

उच्च शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी हे पालक-विद्यार्थी-शिक्षक या सर्वच वर्गांच्या संपर्कात होते. पहिल्यांदाच मंत्रीपद भूषवत असल्याने हे प्रकरण हाताळताना आपपल्यावर खूप मोठं दडपण होतं असं प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं आहे. प्राजक्त तनपुरे यांनी विद्यार्थ्यांसाठी यानिमित्ताने एक खुलं पत्र लिहिलं आहे.

काय लिहिलं आहे पत्रात –
मुलांनो,
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी अंतिम परीक्षांबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आणि मीच परीक्षा पास झालो की काय अशी भावना आली. खरंच लॉकडाऊन सुरू झाल्यापासूनचा काळ मला माझ्या अंतिम वर्षाच्या परीक्षेसारखा वाटला. तेच टेंशन, तीच गडबड, तेच प्रेशर मला जाणवलं. सतत विविध माध्यमातून मी तुमच्याशी बोलत राहिलो. कोणी शहरात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी गावी गेले होते, कोणी कोरोनाच्या भीतीने परीक्षा केंद्रात जायला घाबरत होते, अभ्यासू विद्यार्थी परीक्षेसाठी तयार होते, कोणी परीक्षेबाबत पसरलेल्या अफवांना बळी पडत होते. भीती सारखी असली तरी प्रत्येकाच्या मनातील संभ्रम वेगळा होता. सुवर्णमध्य गाठणं दिवसेंदिवस कठीण होत होतं. मानसिकरित्या, आरोग्याच्यादृष्टीने तुम्हाला कसलीच अडचण येऊ नये ही हुरहूर कायम मनात होती. त्यात तुमच्या भविष्याची चिंता अधिक तीव्रतेने जाणवत होती. त्या सर्व गोष्टींचा सारासार विचार करत आम्ही निर्णय घेतला.

आणखी वाचा- ‘त्या’ विद्यार्थ्यांना तात्पुरते पदवी प्रमाणपत्र द्या, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश

आता तुम्हाला सरासरी मार्क्स मिळतील. मान्य आहे की याने माझे काही मित्र दुखावलेही जातील. मात्र आपण त्यावरही मार्ग काढू. पण खरं सांगू का मित्रांनो, या कागदावरच्या परीक्षा होत राहतील, मात्र खरी परीक्षा काय असते ते आपल्याला जीवनात येणारे चढउतार शिकवत असतात. आता त्याच एका नैसर्गिक आपत्तीच्या परीक्षेतून आपण जात आहोत. ही परीक्षा खूप अवघड आहे पण कठीण नाही. पुढे येणाऱ्या सर्व संकटांना खंबीरपणे सामोरे जाण्याचा धडा आपल्याला यातून मिळणार आहे. चला तर मग धैर्याने, एकीने आणि सकारात्मकतेने आपण पुढे जाऊयात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 11:18 am

Web Title: coronavirus lockdown ncp minister of state prajakt tanpure letter to students sgy 87
Next Stories
1 मोदी पंतप्रधान आहेत हे देशाचे अहम भाग्यच, पण ‘या’ चुका कशा दुरुस्त करणार?- शिवसेनेचा सवाल
2 पुढील चार दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
3 वैद्यकीय सेवेसाठी ४ हजार डॉक्टर
Just Now!
X