News Flash

“तरुणांनो जबाबदारी घ्या, मिळेल ते काम करा”; रोहित पवारांचं आवाहन

रोहित पवारांचं फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तरुणांना आवाहन

Photo Courtesy: Facebook

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि युवा आमदार रोहित पवार यांनी तरुणांना पालकांवर जबाबदारी न टाकता जबाबदारी घेत मिळेल ते काम करा असं आवाहन केलं आहे. “आज खासगी क्षेत्रांत रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. हे आणखी किती काळ चालेल माहित नाही. म्हणून कोणत्याही कामाला लहान-मोठं न समजता मिळेल तिथे कामाला सुरुवात करायला पाहिजे,” असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे. रोहित पवार यांनी यासंबंधी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

काय लिहिलं आहे फेसबुक पोस्टमध्ये –
“करोनाला हरवण्यासाठी लॉकडाउन केल्याने गेले काही महिने आपण घरात आहोत. पण आता परिस्थिती बदलतेय व लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणलीय. तरीही लोकांमध्ये अजून भीतीचं वातावरण आहे. पण योग्य काळजी घेऊन आपल्याला आता घराबाहेर पडावं लागेल. कारण गेल्या दोन-तीन महिन्यात आर्थिक संकटाचा डोंगर दररोज नवनवी उंची गाठतोय. आपण असंच घरात बसून राहिलो तर या संकटाची उंची एवढी वाढेल की मग त्यावर मात करणंही आपल्याला कठीण होऊन बसेल,” अशी भीती रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

“मुलांनी आता पालकांवर जबाबदारी न टाकता त्यांची काळजी घेऊन आणि स्वतः पुढं येऊन जबाबदारी घ्यायला पाहिजे. कारण वयोमानानुसार शुगर, किडनी, हार्ट, मधुमेह, दमा, रक्तदाब अशा प्रकारचे आजार पालकांना असू शकतात. त्यामुळे अशा पालकांनी तसंच गर्भवती महिला व ५५ वर्षांपुढील नागरिक यांनी स्वतःची काळजी घेऊन मुलांना नोकरीसाठी पाठवणं फायद्याचं होऊ शकतं. पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या ठिकाणी नोकरीला गेल्यानंतर करोना प्रतिबंधक नियम काटेकोर पाळून पुन्हा घरी जाणं टाळायला पाहिजे,” असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे.

“आज खासगी क्षेत्रांत रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. हे आणखी किती काळ चालेल माहित नाही. म्हणून कोणत्याही कामाला लहान-मोठं न समजता मिळेल तिथे कामाला सुरुवात करायला पाहिजे. पण आपण असेच घरात बसून राहिलो तर अडचणी वाढू शकतात. कंपन्यांमध्ये तरुणांना बोलावलं तर ते लगेच कामावर जॉईन होण्यास तयार नसतात. काहीजण सवडीने किंवा दोन महिन्यांनी किंवा करोना संपल्यावर जॉईन होऊ असं सांगतात. पण मला वाटतं कामाच्या बाबतीत जर आपण अशी कारणं देत बसलो तर ते आपल्याच नुकसानीचं होईल,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

“म्हणून उलट कोरोनाच्या भितीला झुगारून देऊन काम करावं लागेल. पण याचा अर्थ असाही नाही की पुन्हा पहिल्यासारखंच रहायचं. उलट यापुढं आपलं सार्वजनिक जीवनातील वर्तन, वावर हे अधिक जबाबदारीने ठेवावं लागणार आहे. नियम आणि शिस्त याची लक्ष्मणरेषा कोणालाही ओलांडता येणार नाही. फेरफटका मारण्यासाठी किंवा सहज चक्कर मारण्यासाठी बाहेर जाण्याच्या सवयीला मुरड घालून अनावश्यक बाहेर पडून गर्दीचा एक भाग होणं टाळावं लागेल. ‘मला स्वतःला करोना झाला आहे म्हणून त्याचा दुसऱ्याला संसर्ग होऊ नये’ व ‘इतर सर्व लोकांना कोरोना झाला असल्याने त्याचा संसर्ग मला व्हायला नाही पाहिजे’, असं प्रत्येकाने समजून काळजी घ्यावी लागणार आहे. पण त्याऐवजी आपण घाबरून घरात बसलो तर आर्थिक संकटाशी लढतानाच आपण मोडून पडू की काय, याचीच अधिक भीती वाटते,” असं रोहित पवारांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2020 2:13 pm

Web Title: coronavirus lockdown ncp rohit pawar facebook post urge youngsters to come forward and work sgy 87
Next Stories
1 उस्मानाबादमध्ये महिना अखेरीस सुरू होणार कोविड चाचणी केंद्र
2 …तर आर्थिक संकटाशी लढतानाच आपण मोडून पडू की काय याचीच अधिक भीती वाटते- रोहित पवार
3 लग्नाच्याच दिवशी पोलिसांनी वधू-वराविरोधात नोंदवला FIR, महाराष्ट्रातील घटना
Just Now!
X