लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत असून लॉकडाउन वाढवला जाणार की नाही याबाबत अद्याप राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र राज्य सरकारच्या निर्णयाची वाट न पाहता अकोल्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्री बच्चू कडू संचारबंदी जाहीर केली असून १ ते ६ जून दरम्यान ही संचारबंदी लागू असणार आहे. अकोला करोनाचा हॉटस्पॉट ठरत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
“सार्वजनिक स्तरावर क्वारंटाइन करण्यासाठी मोठी तयारी केली जात आहे. प्रत्येक विभागाचं मूल्यांकन केलं जाईल. मूल्यांकनात काही चुकीचं आढळलं तर कारवाई केली जाईल. मेडिकल कॉलेजमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग केली जाणार आहे. १ ते ६ तारखेपर्यंत जनता कर्फ्यू जाहीर कऱण्यात आला आहे. सगळं काही बंद असणार आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने संक्रमण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.
“क्वारंटाइन करणे, रेड झोनमधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न याला प्राधान्य दिलं जाणार आहे. संचारबंदीत मेडिकल तसंच शेतीच्या काही कामांना सवलत देणार आहोत. नियमांचं उल्लंघन कऱणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,” अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. अकोला विदर्भातील करोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. अकोल्यात करोनाचे ५०८ रुग्ण सापडले असून २८ जणांचा मृत्यू झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 28, 2020 5:29 pm