News Flash

लोकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिला सल्ला; म्हणाले…

राज ठाकरे यांना एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे

राज्यात करोनाचा कहर कायम आहे. रुग्ण बरे होत असल्याच्या दिलासादायक घटना समोर येण्याबरोबरच रुग्णांचा आकडाही झपाट्यानं वाढत आहे. विशेषतः मुंबई आणि पुण्यामध्ये अनेक वसाहती आणि परिसर करोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर सील करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात भीतीचं सावट कायम आहे. अगदी हिच बाब मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर टाकली आहे. त्याचबरोबर लोकांच्या मनातील करोना आणि करोनाच्या रुग्णांविषयीची भीती दूर करण्यासाठी सल्लाही राज यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

राज्यातील करोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. वाढती रुग्ण संख्या कमी करून ही चिंता कमी करण्याचे प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहेत. वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यातील करोनाच्या स्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा सगळ्यांवर लक्ष ठेवून आहेत. मनसेचे कार्यकर्तेही विविध माध्यमातून मदत करत आहेत. राज ठाकरेही सोशल मीडियातून जनतेशी संवाद साधत आहे. राज यांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह प्रसार माध्यमं आणि लोकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
लोकांच्या मनातील करोनाची भीती दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना काही सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर

राज ठाकरे यांचं निवेदन

सस्नेह जय महाराष्ट्र,

करोनाशी निव्वळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व राज्यातील प्रशासनं दोन हात करत आहेत. बहुसंख्य नागरिक देखील प्रशासनाच्या निर्देशांचं काटेकोर पालन करत आहेत आणि त्यामुळे या आजाराचा जलदगतीने होणारा प्रसार आपण बऱ्यापैकी रोखू शकलो आहोत आणि आजारातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या देखील आश्वासक आहे. याबद्दल या लढाईत उतरलेल्या प्रत्येकाचं जेवढं कौतुक करावं ते कमीच आहे.

कल्याणमध्ये तर ६ महिन्याची मुलगी या आजारातून बरी होऊन घरी आली. तिच्यासारखे हजारो जण या आजारावर मात करून बाहेर पडलेत हे दिलासादायक आहे. पण या आकडेवारीला ना सरकारी पातळीवर पुरेशी प्रसिद्धी दिली जात आहे ना माध्यमांमध्ये यावर चर्चा होताना दिसत आहे. कालच मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून ही बाब त्यांच्या देखील निदर्शनास आणून दिली.

करोनातून ठणठणीत बरे झालेल्यांचा आकडा मोठा आहे. त्याला देखील योग्य प्रसिद्धी दिली गेली, तर नागरिकांचा आपल्या डॉक्टरांवरचा, आरोग्य कर्मचाऱ्यांवरचा विश्वास अधिक वाढेल आणि सातत्याने भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या नागरिकांना देखील काहीसा दिलासा मिळेल. अर्थात आजार नियंत्रणात आहे हे दाखवलं गेलं, तर नागरिक लगेच बाहेर पडतील असा जर समज असेल तर तो चुकीचा आहे आणि ३ मे पर्यंतच्या लॉकडाऊनचं लोकं पालन करतील याविषयी शंका नाही.

याच्याशी निगडित दुसरा भाग म्हणजे एखाद्याला करोनाची लागण झाली आहे किंवा तशी शक्यता आहे, असं जरी आढळलं तरी त्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार समोर येत आहेत. हा प्रकार चुकीचा तर आहेच पण तो आपल्या सर्वांना नुकसानकारक ठरेल. या आजाराच्या नुसत्या शंकेनं सुद्धा जर एखाद्या व्यक्तीला वाळीत टाकण्याचे प्रकार घडत असतील तर लोकांचा कल त्याची लक्षणं लपवण्याकडे राहिल आणि पर्यायानं लॉकडाऊनसकट केलेल्या अनेक उपाययोजना निष्प्रभ ठरतील. हा आजार संसर्गजन्य आहे हे मान्य पण टी.बी. सारखे अनेक आजार हे संसर्गजन्य असताना देखील आपण त्या रुग्णांना वाळीत टाकलं नाही तर आत्ताच हे का?

यावर एकच उपाय म्हणजे या आजारावर मात केली जात आहे, रुग्ण ठणठणीत बरे होऊन बाहेर पडत आहेत याची आकडेवारी देणारं एक ‘न्यूज बुलेटिन’ आठवड्यातून एकदा सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्र सरकारनं जारी करावं. माध्यमांनी देखील या मुद्द्याच गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचवाव !

माझं पुन्हा एकदा जनतेला आवाहन आहे की घाबरून जाऊ नका, पुरेशी काळजी घ्या आणि समाजमाध्यमांवर येणाऱ्या गोष्टींची नीट खातरजमा करा. त्यावर सरसकट विश्वास ठेऊन कोणतीही आततायी कृती करू नका. या सगळ्यांवर मात करून लवकरच जनजीवन पूर्ववत व्हावं हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.

आपला नम्र

राज ठाकरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2020 3:25 pm

Web Title: coronavirus lockdown raj thackeray gave suggestions to uddhav thackeray bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 देवेंद्रजी, ही वेळ ‘ब्लेमगेम’ची नाही; फडणवीसांना अशोक चव्हाण यांचं उत्तर
2 महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ३ हजारांच्या पार, एकाच दिवशी वाढले १६५ पॉझिटिव्ह रुग्ण
3 Coronavirus: सोलापूरात एकाच दिवशी १० करोनाबाधित आढळले; नर्समुळे ९ जणांना लागण
Just Now!
X