वारकरी संप्रदायातील महत्वाची मानली जाणारी चैत्र वारीसाठी राज्य तसेच शेजारील राज्यातील भाविकांनी पंढरीत येऊ नये. करोनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक पाहून चैत्र वारीसाठी कोणीही दिंडी तसेच वैयक्तिक देखील पंढरीत येऊ नये. असे आवाहन वारकरी संप्रदाय पाईक संघाचे अध्यक्ष ह.भ.प.देवव्रत महारज वासकर आणि महारजमंडळीनी केले आहे. चैत्र वारीचा मुख दिवस म्हणजेच चैत्र एकादशी ४ एप्रिल रोजी आहे.

“ माझ्या जीवाची आवडी ..पंढरपुरा नेईन गुढी” या अभंगाप्रमाणे लाखो वारकरी सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेले असतात.वारकरी संप्रदायात आषाढ,कार्तिक,माघ आणि चैत्र या चार वारीला अनन्यसाधारण महत्व आहे.दरवर्षी न चुकता वारीसाठी पंढरीला येणारे भाविक आहेत या चारही वारी साठी राज्यातून भाविक मोठ्या श्रद्धेने दिंडी घेवून पायी पंढरीला येतात. पंढरीचा वारकरी वारी चुको नेदी हरी…वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र आहे.

मात्र सध्या देशावर करोनाचे संकट घोंघावत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनता कर्फ्यु पुकारला आहे.करोना हा जनसंपर्कातून पुढे फैलावतो.त्यामुळे सरकारने लोकाना एकत्र येऊ नये असे आवाहन केले आहे.मात्र दि. ४ एप्रिल रोजी चैत्र एकादशी आहे. या वारीसाठी राज्यातून तसेच शेजारील कर्नाटक ,आंध्रप्रदेश येथून भाविक येतात.चैत्र वारीसाठी पंढरीत जवळपास ३ ते ४ लाख भाविक येत असतात.

या पार्श्वभूमीवर वारकीरी संप्रदाय पाईक संघटनेचे ह.भ.प.देवव्रत महारज वासकर , जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज ह.भ.प.चैतन्य महारज देहूकर,श्रीसंत नामदेवरायांचे वंशज ह.भ.प.निवृत्ती महारज नामदास,ह.भ.प.रामकृष्ण हनुमंत महारज वीर,ह.भ.प.भाऊसाहेब महराज गोसावी यांच्या उपस्थितीत बैठक घेवून वारकर्यांनी पंढरीत येऊ नये असे आवाहन केले आहे.असे असले तरी शेकडो वर्षाची परंपरा खंडित होणार आहे.पंढरीचे श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. आता महारज मंडळीने अतिशय जड अंतकरणाने वारीसाठी न येण्याचे आवाहन नक्कीच प्रेरणादायी आहे.

दिंडी पंढरीत आणू नका : वासकर महारज
वारकरी संप्रदाय हा सकल मानवकल्याणाचा विचार मांडणारा संप्रदाय आहे. तर आपल्या कोणत्याही कृत्याने स्वतःच्या अथवा दुसर्याच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ ण्या या साठी चैत्र शुद्ध वारी करीता पंढरीच्या दिशेनं दिंडी अथवा वैयक्तिक कृपया येऊ नये अशी बंधू आणि भागीनिना विनंती आहे असे आवाहन ह.भ.प. देवव्रत महारज वासकर यांनी केले आहे.