५ एप्रिल रोजी झालेल्या दिवे लावण्याच्या कार्यक्रमावरून आणि त्या वेळी देशात घडलेल्या घटनांवरून शिवसेनेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधानांनी दिवे लावण्याचं आवाहन केलेलं असताना लोकांनी गर्दी केली. त्याचबरोबर फटाकेही फोडले. यावरून शिवसेनेनं पंतप्रधानांना टोलाही लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामनाच्या अग्रलेखात शिवसेनेनं दिवे लावण्याऐवजी लोकांनी केलेल्या गर्दीवरून पंतप्रधान मोदींना दोष दिला आहे. “पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतरही अखेर जे व्हायचे तेच झाले. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी पंतप्रधानांनी जी उपाययोजना सांगितली त्यात सर्वप्रथम त्यांनी घराच्या गॅलरीत येऊन टाळ्या आणि थाळ्या वाजवायला सांगितल्या व रविवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील सर्व दिवे बंद करून पणत्या, मेणबत्त्या लावाव्यात असे आवाहन केले. पण लोकांनी रविवारी काय केले ते पाहण्यासारखे आहे. काहीतरी गडबड निश्चित आहे. पंतप्रधानांच्या भावना लोकांपर्यंत नीट पोहोचत नाहीत असे दिसते. अन्यथा रविवारी देशात अनेक ठिकाणी जे दिव्य प्रताप झाले ते घडले नसते. लोकांनी काळोख केला हे खरे, पण त्या काळोखात लोक पुन्हा `झुंड’ करून रस्त्यांवर उतरले. हातात मेणबत्या, टॉर्च, मोबाईलच्या बॅटऱ्या नाचवत थयथया नाचू लागले. त्यामुळे कोरोनाशी लढताना ज्या ‘सोशल डिस्टन्सिंग’ची सगळय़ात जास्त गरज आहे त्याची ऐशीची तैशी झाली. पंतप्रधानांनाही हा तमाशा नक्कीच अपेक्षित नसावा,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“कोरोनामुळे आज हजारो रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत. काहींनी त्यांचे प्राणही गमावले आहेत. अशा वेळी परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता लोक रस्त्यांवर घोळक्याने फिरतात, घोषणा देतात, फटाके फोडतात, आतिषबाजी करतात हा सगळाच प्रकार हास्यास्पद म्हणावा लागेल. पंतप्रधान नक्की काय सांगत आहेत ते समजून न घेता जनता अशी मनमानी करते. त्यास युद्ध म्हणता येणार नाही. हा सरळ सरळ आत्मघात आहे. लोक मशाली आणि दिवट्या घेऊन रस्त्यांवर उतरले. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पोलीस सकाळपासून रस्त्यावर येणाऱ्या लोकांना थांबवत होते. त्यांच्याशी वाईटपणा घेत होते. पण रविवारी रात्री नऊ वाजता पंतप्रधान मोदी यांच्याच आदेशाने लोक रस्त्यावर उतरले. त्यामुळे कायदा व नियम मोडून पडले. याचा सरळ अर्थ आम्ही असा काढला की, पंतप्रधानांना जे सांगायचे आहे त्याचा विपरीत अर्थ काढून लोक आपापली सोय पाहत आहेत. दुसरे असे की, पंतप्रधानांचा लोकांशी नीट संवाद होत नाही. शेवटचा अर्थ असा की, जे घडते आहे तसे `उत्सवी’ वातावरण पंतप्रधानांनाच हवे आहे,” असं सांगत शिवसेनेनं मोदींवर टीका केली.

आणखी वाचा- लॉकडाउन शिथिल होईल असं कुणीही डोक्यात ठेवू नये; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं स्पष्ट

‘मरकज’वर खापर फोडणारे शिस्तीचे कोणते दिवे पाजळत आहेत?

“पानिपतच्या युद्धात आपला पराभव झाला होता तो अफवा, नियोजनशून्यता यामुळे. सदाशिवराव भाऊंचे रणंगणावर नेमके काय झाले? ते हरवले की ईश्वरलोकी गेले हा संभ्रम कायम राहिला. कोरोना युद्धाची स्थिती ‘पानिपत’सारखी होऊ नये. जनतेचा सदाशिवराव भाऊ होऊ नये. हाती मशाली आहेत, त्यात स्वत:चेच कपडे जळू नये. पंतप्रधानांनी स्पष्ट सांगावे; जे सांगितले तेच घडावे. उलट वागणाऱ्यांना अद्दल घडवावी. फक्त `मरकज’वालेच नियम मोडतात असे नाही! मरकजवाल्यांवर कोरोना संक्रमणाचे खापर फोडणारे तरी शिस्तीचे कोणते दिवे पाजळत आहेत,” असा सवाल शिवसेनेनं भाजपा सरकारला केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus lockdown shiv sena criticised prime minister narendra modi bmh
First published on: 07-04-2020 at 08:06 IST