करोनाचं संकट संपल्यावर मैदानात या आणि हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा असं आव्हान शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजपा नेत्यांना दिलं आहे. राज्य सरकार करोनाशी लढा देत असताना विरोधक मात्र घाणेरडं राजकारण करत असल्याचा आरोपही गुलाबराव पाटील यांनी केला आहे. सोबतच सरकार स्थिर असून विरोधकांकडून सरकार पडणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचंही ते म्हणाले आहेत. जळगावमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.

राज्यावर एकीकडे करोनाचं संकट असताना राजकीय वातावरणही चांगलंच पेटलं आहे. भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून शाब्दिक चकमक रंगली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे. त्यानंतर भाजपा नेत्यांनीही उत्तर देण्यास सुरुवात केली असून आरोप-प्रत्यारोप तसंच आव्हानांची मालिकाच सुरु झाली आहे.

गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे की, “करोनासारख्या कठीण काळात विरोधकांकडून महाविकास आघाडीचे सरकार पाडणार असल्याची चर्चा रंगवली जात आहे. उगाच संभ्रम निर्माण केला जात आहे. मध्यप्रदेशात ज्या पद्धतीने वातावरण निर्माण करण्यात आलं होतं त्याच पद्धतीने महाराष्ट्रात वातावरण निर्मिती सुरु आहे,” असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

“करोनाशी लढा देताना राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून विरोधकांकडून होणारे आरोप चुकीचे आहेत. विरोधकांनी उद्धव ठाकरेंना सल्ला देण्याऐवजी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा. मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर ज्या पद्धतीने तडफडतो, त्याच पद्धतीने विरोधक सत्ता गेल्यामुळे तडफडत आहेत,” असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.