करोनाच्या पार्श्वभुमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३ मे रोजी संपत असून यानंतर लॉकडाउन वाढवला जाणार की शिथील करणार यासंबंधी चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबद्दल बोलताना काही ठिकाणी लॉकडाउन वाढवणार असल्याचे सुतोवाच दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांना महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे की, “३ मे नंतर काय करायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही काय करायचं ? किती वेळ घरी बसायचं ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अर्थचक्र रुतलं आहे. बेरोजगारी वाढणार असं सांगितलं जात आहे. हे खऱं आहे, नाही असं म्हणणं योग्य नाही. पण अर्थासोबत संपत्ती जर म्हणाल तर प्रत्येक राष्ट्राची आणि राज्याची महत्त्वाची आणि खऱी संपत्ती त्यांची जनता असते. त्यांना प्राथमिकता दिली पाहिजे. नागरिक वाचले पाहिजेत. ते सैनिक आहेत. ते वाचले तर हा गाडा चिखलातून काढून पुढे नेऊ शकतो”.

“रेड झोन म्हणजे जागृत ज्वालामुखी, ऑरेंज झोन म्हणजे निद्रिस्त ज्वालामुखी आणि ग्रीन झोन म्हणजे तो ज्लालामुखी पुन्हा पेटेल असं वाटत नाही. पण ग्रीन झोनमध्ये जर कोणी करोना रुग्ण आला तर पुन्हा हाहाकार माजू शकतो. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. रेड झोनमध्ये मुंबई आणि मुंबईचा परिसर आहे. कल्याण आणि पनवेलपर्यंत जो काही परिसर येतो तो आहे. पुणे आणि आजुबाजूचा परिसर तसंच नागपूर, औरंगाबादमधील काही ठिकाणं आहेत. या ठिकाणी आकडे वाढत आहेत. त्यामुळे काही करणं हिताचं नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- टाळेबंदी म्हणजे एकप्रकारचा गतीरोधक; करोनाची साखळी तोडण्यासाठी फायदा : मुख्यमंत्री

“ऑरेंज झोनमध्ये म्हणजे जिथे संख्या वाढत नाही आहे पण अजूनही रुग्ण आहेत तिथे काही परिसर सोडले तर उरलेल्या जिल्ह्यात काय सुरु करु शकतो याचा निर्णय झाला आहे. ग्रीन झोनमध्ये आपण आधीच शिथिलता आणत आहोत,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. “तसंच परराज्यात जे जाऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यांच्यासाठी आपण सोय करत आहोत पण लगेच झुंबड करु नका. अन्यथा ती परवानगीही काढून टाकली जाईल,” असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा- महाराष्ट्र करोना व्हायरसची श्रृंखला तोडण्यात बराच यशस्वी : उद्धव ठाकरे

“महाराष्ट्र करोनाविरोधतली लढाई लढतो आहे, खंबीरपणे ही लढाई महाराष्ट्र लढतो आहे. महाराष्ट्राच्या पराक्रमाच्या गाथा या कित्येक वर्षांच्या आहेत. कोणत्याही क्षेत्रात महाराष्ट्र कमी नाही. अंधश्रद्धा निर्मूलन, क्रांतिकारी विचार हे सगळं रुजवणारा आणि जपणारा हा महाराष्ट्र आहे,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. “मी करोनाविरोधातल्या लढाईत जिंकणार हे मला माहित आहे. कारण महाराष्ट्र माझ्या साथीला आहे. आपण करोना व्हायरसची श्रृंखला तोडण्यात आपण यशस्वी झालो आहोत” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. “लॉकडाउनपेक्षा मी थोडा वेगळा शब्द वापरेन जो सिंगापूरच्या पंतप्रधानांनीही वापरला होता सर्किट ब्रेकर्स..अर्थात हे गतिरोधक आहेत. व्हायरसची श्रृंखला तोडण्यासाठी हे गतिरोधक आवश्यक आहेत” असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.