17 January 2021

News Flash

“लॉकडाउन उठवला जाऊ नये”, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

"लॉकडाउन कायम ठेवत काही निर्बंध शिथील केले पाहिजेत "

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना काळात बोलावलेल्या मुख्यमंत्र्यांच्या एका बैठकीत चर्चा करताना उद्धव ठाकरे. (संग्रहित छायाचित्र)

लॉकडाउन उठवला जाऊ नये अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. लॉकडाउन कायम ठेवत काही निर्बंध शिथील केले पाहिजेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. यासोबत उद्धव ठाकरे यांनी राज्यात पोलिसांना विश्रांती देण्याची गरज असून केंद्रीय पोलीस दलाला राज्यात पाठवावं अशी विनंती पंतप्रधानांकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीची माहिती देत आपलं म्हणणं मांडलं.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं की, “शेतकऱ्यांसाठी आम्हाला कर्जाची गरज आहे. स्थलांतरित कामगार राज्य सोडून जात आहे. यावेळी करोनाचे विषाणू ते आपल्या घरी नेणार नाहीत याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आपण स्थलांतरित कामगारांना राज्य सोडून जाण्याची जबरदस्ती करु नये. शक्य असेल तर त्यांनी येथेच थांबावं. लॉकडाउन उठवला जाऊ नये. तो कायम ठेवून काही निर्बंध शिथील केले जावेत”. अत्यावश्यक सेवेसाठी लोकल सेवा सुरु केली जावी अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

लॉकडाऊनच्या बाबत पंतप्रधानांनी निश्चित व ठोस अशी दिशा दाखवावी, आम्ही सर्व राज्यं त्याप्रमाणे अंमलबजावणी करूत असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. “गेल्या दोन महिन्यांपासून सर्व जण अडकले आहेत. परराज्यातील मजुरांना घराची ओढ लागली आहे. इतर राज्यांतले महाराष्ट्रीय परत येत आहेत. हे मजूर विविध झोन्समधून ये जा करीत आहेत, अशा वेळी सर्वांनी व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे, अन्यथा संसर्ग वाढण्याचा धोका देशाला आहे. महाराष्ट्राने साडे पाच लाख मजुरांच्या निवारा व नाश्ता, भोजनाची व्यवस्था चोखपणे ठेवली तसेच इतर राज्यांशी समन्वय ठेऊन मजुरांना पाठवणे सुरु केलं आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

“आपण एप्रिल मध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखला. आता असं सांगण्यात येते की मे महिन्यात या रोगाचा उच्चांक येईल, तो जून , जुलैमध्येही येऊ शकतो असेही बोललं जात आहे. वुहानमध्ये परत करोनाचा प्रादुर्भाव सुरु झालाय असे मी वाचले. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा इशारा दिला आहे. अशा वेळी लॉकडाऊन बाबत काळजीपूर्वक कार्यवाही व्हावी,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

“मुंबईत उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करावी. मात्र फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठीच ती असावी व केवळ ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी,” अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली.

पिक कर्ज मिळावे
“महाराष्ट्रात करोनापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना सुरु होती. मात्र काही जिल्ह्यांमध्ये विशेषत: विदर्भात निवडणुकांमुळे तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही. आता खरीप हंगाम सुरु झाला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळालेला नाही त्यांना पिक कर्ज मिळावे म्हणून रिझर्व्ह बँकेला केंद्रामार्फत सुचना द्याव्यात, सुमारे १० लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

आवश्यकता भासल्यास मनुष्यबळ द्यावे
“केंद्रीय पथकांनी मुंबई-पुणे येथे भेटी दिल्या असून उपयुक्त सूचना केल्या आहेत. आमचे पूर्ण सहकार्य असेल. डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अहोरात्र काम करीत आहेत. विशेषत: पोलिसांना मधूनमधून विश्रांती देण्याची गरज आहे , त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्थेचे काम आहे, ते आजारी पडून चालणार नाही त्यामुळे आवश्यकता भासेल तसे केंद्र सरकारने त्यांचे मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरचा ताण कमी होईल. त्याचप्रमाणे केंद्रीय संस्था, पोर्ट ट्रस्ट, लष्कराची रुग्णालये व आयसीयू बेड्स सुविधाही मिळाल्यास पुढे कोरोनाशी लढतांना त्याचा उपयोग होईल,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2020 7:22 pm

Web Title: coronavirus lockdown should not be lifted maharashtra cm uddhav thackeray pm narendra modi sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 २६/११ हल्ल्याचे साक्षीदार श्रीवर्धनकर यांच्यासाठी धावून आले फडणवीस, केली आर्थिक मदतीची घोषणा
2 नाशिक : आमोदे फाटा चेक पोस्टवरील पोलिसांवर गावगुंडाचा हल्ला
3 Lockdown: शेकडो मैल दूर असलेल्या डॉक्टर आईच्या कार्याला चिमुकलीचा सलाम
Just Now!
X