रवींद्र जुनारकर, चंद्रपूर
चंद्रपूर शहरातील बल्लारपुर बायपास मार्गावरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली असून एका व्यक्तीचा हृदयविकारने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दोघेही २२ आणि २३ मे पासून संस्थात्मक विलगीकरण कक्षात होते. सदर घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

“४० वर्षीय व्यक्ती अभियांत्रिकी महाविद्यालयात एक फ्लॅटमध्ये स्वतंत्र खोलीत होता. त्याने कपडे वाळत टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन महिन्यांपासून तो बेपत्ता होता. कुटुंबाने तशी तक्रार केली होती. नागपूर येथून आल्यानंतर तो मानसिक तणावात होता. यातूनच त्याने आत्महत्या केली,” अशी माहिती राहुल कर्डीले यांनी दिली आहे.

दुसरीकडे २२ मे पासून क्वारंटाइन असलेल्या ४८ वर्षीय व्यक्तीला सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. सदर व्यक्ती मध्य प्रदेशातून आली होती. म्हणून त्यांना विलगीकरणात ठेवलं होतं. या व्यक्तीला क्षयरोग झाला होता. मागील चार वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. यामुळे ते तणावात होते. दोघांचे नमुने घेतले असून करोना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पण या दोन मृत्यूमुळे सर्वाना धक्का बसला आहे.