देशातील सर्वात जास्त करोनाबाधित महाराष्ट्रात आहेत. गुरुवारी महाराष्ट्रात करोनाबाधितांच्या संख्या तीन हजारांच्या पुढे गेली. तीन हजारापेक्षा जास्त रुग्ण असणारं महाराष्ट्र पहिलंच राज्य ठरलं आहे. सोबतच मुंबईतील करोनाबाधितांची संख्या दोन हजारांच्या पुढे गेली आहे. गुरुवारी मुंबईत १७७ नव्या रुग्णांची भर पडली. राज्य सरकारने करोना रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याचं प्रमाण कमी झालं असून रुग्ण उपचार घेऊन बरे होण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं सांगितलं आहे.
गुरुवारी राज्यात २८६ करोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह आढलळल्याने संख्या ३२०२ वर पोहोचली आहे. तर सात जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९४ झाली आहे. मृतांमधील चार जण मुंबई आणि तिघे पुण्यातील होते. यामधील चार रुग्णाचं वय ६० च्या पुढे होतं, तर इतर जण ४० च्या पुढचे होते. यामधील सहा जणांना अस्थमा, उच्च रक्तदाब, डायबेटिस सारखे त्रास होते अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
दरम्यान राज्यातील सर्वात जास्त रुग्ण असणाऱ्या मुंबईतही रुग्णांची संख्या २०६३ झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सार्वजनिक आणि खासगी ठिकाणांवर ५६ हजार ६७३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामधील ५२७६२ लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. महाराष्ट्रात सध्या २९७ सक्रीय कंटेनमेंट झोन आहेत.
डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या एकूण ५६६४ सर्व्हे टीम असून आतापर्यंत २० लाख लोकांचं स्क्रिनिंग करण्यात आलं आहे. उपचारानंतर तीन हजार लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात एकूण ७१,०७६ लोकांना होम क्वारंटाउन करण्यात आलं आहे.
देशातील १७० ‘हॉटस्पॉट’मध्ये मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील ११ जिल्हे
देशात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्णांची महाराष्ट्रात आहे. तर राज्यातील एकूण रुग्णांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण मुंबईत आहेत. करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मुंबईत सर्वाधिक आहे. तर त्या पाठोपाठ पुण्याचा क्रमांक आहे. मात्र, मुंबई पुण्याबरोबरच केंद्र सरकारनं राज्यातील ११ जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटच्या यादीत केला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलडाणा, मुंबई उपनगर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटच्या यादीत करण्यात आलेला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 8:52 am