राज्यात करोना रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावू लागला आहे. नागरिकांकडून करोनासंबंधी नियमांचं योग्य पालन होत नसल्याने करोनाची आकडेवारी वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक शिस्तपालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल असा अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर मंगळवारी उद्धव ठाकरेंनी महत्वाची बैठक बोलावली आहे.
मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे मुंबईतील स्थितीचा आढावा घेणार आहेत.
Maharashtra CM Uddhav Thackeray to hold a meeting today with BMC Commissioner and officials, to review the COVID19 situation pic.twitter.com/M2lmU9vWYd
— ANI (@ANI) February 23, 2021
राज्यातील वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक शिस्तपालन करतात की नाही, हे तपासून टाळेबंदी लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
मुंबईतील सर्व रुग्णालये सज्ज
मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव मुंबईत झपाटय़ाने होत असून दरदिवशी नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या हजारापर्यत पोहोचली आहे. यादृष्टीने रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंह सोमवारी बैठक आयोजित केली होती. यात पालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालये, प्रयोगशाळांचे प्रतिनिधी सहभागी होते. लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल करू नये. दाखल रुग्ण आणि उपलब्ध खाटा याची माहिती देणारे डॅशबोर्ड आणि रुग्णालयातील फलक वेळोवेळी अद्ययावत केले जावेत, अशा सूचना यावेळी रुग्णालयांना देण्यात आल्या.
खासगी रुग्णालयांत ८० टक्के खाटा राखीव
खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा अजूनही करोनाबाधितांसाठी राखीव आहेत. मधल्या काळात रुग्णसंख्या कमी झाल्याने या खाटा कमी करण्याचा प्रस्ताव आम्ही मांडला होता. परंतु आता रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने ही मागणी मागे घेतली आहे. खासगी रुग्णालयातील सर्व खाटा सोईसुविधांसह सज्ज आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या कितीही वाढली तरी उपचार वेळेत दिले जातील, असे खासगी रुग्णालयाचे समन्वयक आणि बॉम्बे रुग्णालयाचे कन्सल्टंट फिजिशियन डॉ. गौतम भन्साली यांनी सांगितले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 23, 2021 10:45 am